सालाबादप्रमाणे यंदाही जुलै आणि आता ऑगस्टमध्ये बरसलेल्या पावसात मुंबईची तुंबई झालीच. त्यामुळे मुंबई महानगरपालिका पूरस्थिती रोखण्यासाठी विविध उपाययोजनांचा सातत्याने दावा करीत असली तरी यंदाही पालिकेने केलेल्या सर्व उपाययोजना फोल ठरल्या आहेत. त्यामुळे यावर्षीही मुंबईही बुडत्यांचे शहरच ठरले आहे.
.
मुंबई आणि आसपासच्या परिसरात जुलै महिन्यात जोरदार पाऊस बरसला. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचले. रस्ते जलमय झाले. वाहतूक मंदावली. लोकल सेवा विस्कळीत झाली आणि जे जे काही पावसाळ्यात म्हणून घडते, ते ते सगळे यंदाही न चुकता घडलेच!
त्यातच मुंबईमधील नद्या या जलवाहिनी नाही, तर कचरावाहिन्या बनल्या आहेत. त्यातच यंदाही समुद्रात मोठ्या प्रमाणावर कचरा वाहून आल्याच्या तक्रारी आल्या. बदलापूरहून वाहणार्या उल्हास नदीने दि. १३ जुलैच्या पावसात धोक्याची पातळी ओलांडली. कुळगाव-बदलापूर नगरपालिकेने नदीकिनार्याच्या भागातून ३०० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी म्हणजे नदीपल्याडच्या ‘बीएसयुपी’ गृहप्रकल्पात स्थलांतरीत केले होते. अशीच काहीशी गत इतरही नद्यांची.
दरवर्षी दोन मिमी बुडणारी मुंबई
पर्यावरण तज्ज्ञांनी बजावले आहे की, भूगर्भशास्त्राच्या आधारे मुंबई शहरातील अनेक ठिकाणच्या पूरपरिस्थितीमुळे जमीन खाली दबल्यामुळे वर्षाला सरासरी दोन मिमीपर्यंत मुंबईची जमीन खाली जात आहे. यावर नगरपालिका वा भूगर्भतज्ज्ञांकडून कोणतेही उपाय नियोजित नाहीत.त्यामुळे वेळीच यावर काही उपाय शोधला नाही तर हे शहर दरवर्षी असेच बुडणे सुरूच राहील. या बाबतीत जगात ९९ देशांतील जमिनी समुद्राच्या पातळीखाली बुडण्याच्या नोंदी आहेत.
तज्ज्ञांनी हा विषय अभ्यासलाही आहे व त्यांच्या माहितीनुसार, चीनमधील तिआन्जीन शहर हे जगातील वेगाने म्हणजे वर्षाला ५.२ सेंमी समुद्राखाली बुडत आहे. सेमारंग ३.४४ सेंमी, जकार्ता ३.४४ सेंमी, शांघाय २.९४ सेंमी, हो-ची-मिन्ह २.८१ सेंमी, हॅनॉय २.४४ सेंमी खाली जात आहे. उपग्रहाच्या ‘इन्सार’ पद्धतीने तपासल्यानंतर मुंबईतील काही भागही असेच खाली खचत असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये भायखळा, कुलाबा, चर्चगेट, काळबादेवी, कुर्ला, अंधेरी (पू), मुलुंड, नाहूर (पू), दादर, वडाळा, ताडदेव, भांडुप, ट्रॉम्बे, गोवंडी अशा ठिकाणी वर्षाला दोन मिमी ते ९३ मिमी बुडत असल्याचे आकडेवारी सांगते.
मुंबईत पूरस्थिती टाळण्यासाठी पालिकेने काय केले?
मुंबई महानगरपालिकेने ३५ ठिकाणी पाणी तुंबण्याच्या जागांवर यावर्षी लक्ष केंद्रित केले. इतर ९० ठिकाणी पावसाळा संपल्यानंतर पालिका उपाययोजना करणार असल्याचे समजते. तसेच यंदा नव्याने काही भुयारी टाक्या पाणी साचविण्याकरिता बांधल्या आहेत. दरवर्षी तुंबणार्या ठिकाणांवर ४८७ ठिकाणी उपसा पंपदेखील बसविले. नालेसफाई केली. विविध रस्त्यांवर लोखंडी जाळ्या बसविल्या व ड्रेनेज चेंबर बांधले.
तसेचस शहरातील अनेक पूरसमस्येच्या ठिकाणी वैयक्तिक अभ्यासातून मायक्रो प्लानिंग करून उपाययोजना करण्यात आल्या. एकूण ३८६ ‘फ्लडिंग स्पॉट’मधील २८३ ठिकाणांवर पालिकेने कामे केली.तसेच पुरासारख्या आपत्तीला तोंड देण्यासाठी पालिकेने स्वत:ची ‘सीडीआरएफ’ टीम उभारली आहे. कोणत्याही दुर्घटनेनंतर जलदगतीने बचावकार्य सुरू करून जीवितहानी होऊ नये, म्हणून पालिका प्रयत्नशील असते. याशिवाय पालिकेचे अग्निशमन दल आणि ‘एनडीआरएफ’ पथके पण बोलावली होती.
मॅनहोलची झाकणे चोरीला!
पालिकेने विविध प्रभागांमधील झाकणे चोरीला गेल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये रीतसर तक्रार दाखल केली आहे. मॅनहोलवरील चोरीला गेलेल्या झाकणांची संख्या २३९ इतकी आहे. ही झाकणे चक्क रद्दीवाल्यांकडे विकली जातात. अशाप्रकारे झाकणे चोरीला गेल्यामुळे रस्त्यांवर पाणी तुंबल्यानंतर कोणीही मॅनहोलमध्ये सहज पडू शकतो. हा धोका टाळण्याकरिता पालिकेने ताबडतोब तपास करून ती झाकणे मॅनहोलवर बसवायला हवीत. शीव रेल्वे स्थानकाजवळ रुळावर पाणी साचू नये म्हणून रेल्वेने संरक्षक भिंत बांधली होती व बेकायदा गटारे बंदही केली होती.
अज्ञात नागरिकाकडून ती तोडून पुन्हा १२ गटारे बांधण्यात आली. मुख्य रस्त्यावरील गटाराचे पाणी लोकवस्तीमध्ये येत असल्याने चेंबूरच्या अण्णाभाऊ साठे परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होत होती. सोसायटीने अनेक तक्रारी केल्या तरी पालिकेने त्याकडे दुर्लक्ष करू नये व सुधारणा करावी, अशीच स्थिती अनेक ठिकाणी आहे.
आपत्ती व्यवस्थापन
मुंबई महानगरपालिकेतील आपत्ती व्यवस्थापनाचे संचालक पद गेले सात महिने रिक्तच होते. त्यामुळे पालिकेने संचालक पदावर लवकरात लवकर नेमणूक करणे गरजेचे आहे. या विभागाच्या सध्याच्या यंत्रणेवर १९१६ क्रमांकावर एकाच वेळी ६० कॉल घेण्याची क्षमता आहे. ६० पेक्षा अधिक कॉल आल्यास ते परळच्या आपत्कालीन कक्षाकडे हस्तांतरित केले जातात. मुंबईच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची ही देशातील गणना अत्याधुनिक मानली जाते.
हिंदमाता व गांधी मार्केटमध्ये जलमुक्तीचा पालिकेचा दावा
दरवर्षी पावसाळ्यात जलमय होणार्या किंग्ज सर्कल येथील गांधी मार्केट व हिंदमाता परिसरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी आठ ते दहा तास लागत होते. उदंचन केंद्रामुळे हा निचरा झटपट होऊ लागला आहे. हिंदमाता व गांधी मार्केट परिसरात यंदा पाणी साचले नाही, असा दावा पालिकेने केला आहे. मात्र, नागरिकांनी यंदाही पाणी तुंबल्याच्या तक्रारी केल्या होत्याच.
गांधी मार्केटमध्ये उदंचन क्षमता, पाणलोट क्षेत्र, भरती-ओहोटीच्या वेळा इत्यादींचे अवलोकन करून लघु उदंचन केंद्र उभारण्यात आले आहे. उदंचन केंद्रामुळे उपसा ताशी १८ हजार घनमीटर वा प्रती मिनिटाला तीन लक्ष लीटर या क्षमतेने पाण्याचा झटपट निचरा करत आहे.
पाणी साठवण टाक्या परळ येथील सेंट झेवियर्स मैदानाखाली १.०५ कोटी लीटर व दादर परिसरातील प्रमोद महाजन कला उद्यानाखाली १.६२ कोटी लीटर भूमिगत टाक्या बांधण्याचे, तसेच हिंदमाता उड्डाण पुलाखाली व खाशाबा जाधव मार्ग येथे उदंचन व्यवस्था केंद्र उभारण्याचे ठरले होते. भूमिगत टाक्यांचे पहिल्या टप्प्याचे काम २०२१ मध्ये पूर्ण झाले आहे. सेंट झेवियर मैदानावरील १.८१ कोटी लीटर टाकीचे व प्रमोद महाजन उद्यानातील १.९९ कोटी लीटर टाकीचे दुसर्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे. २०२२ वा २०२३च्या पावसाळ्यात ही कामे झाल्यावर पावसाळ्यात त्यांचा नक्की उपयोग होईल, असा पालिकेचा दावा आहे.
हिंदमाता सिनेमा ते मडके बुवा चौक या दरम्यान अतिवृष्टीच्या वेळी पावसात जमा झालेले पाणी पंपाद्वारे सेंट झेवियरच्या भूमिगत टाक्यामध्ये सोडण्यात येईल. पावसाचा जोर कमी झाल्यावर हे साठविलेले पाणी मडके बुवा चौकापर्यंत अस्तित्वात असलेल्या पर्जन्य जलवाहिनीत सोडण्यात येईल.
परळ येथे हिंदमाता परिसरात पावसाळ्यातील पाणी तुंबण्याच्या समस्या सोडविण्याकरिता पालिका विविध उपाययोजना करत आहे. यंदाच्या पावसाळ्यात काही प्रमाणात यश मिळाल्याचा दावा पालिकेने केला आहे. परंतु, या विविध कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत आहे. भूमिगत टाक्यांचे काम मोठ्या खर्चाचे झाल्यानंतर आणखी एक पर्जन्यजलवाहिनीचे काम केले जाणार आहे व त्याकरिता पालिकेला १५ कोटी, ३१ लाख, २५ हजार रुपये खर्च येणार आहे.
भूमिगत टाक्यांचे पाणी उद्यानांसाठी वापरणार
भूमिगत टाक्यांच्या व्यवस्थेमुळे यंदा हिंदमाता परिसर पावसाळ्यात तुंबला नाही, असा दावा पालिकेने केला आहे. झेवियर्स मैदानातील दोन टाक्यांच्या क्षमता १.०५ कोटी लीटर व १.८१ कोटी लीटर अशा आहेत. हे पाणी सध्या ब्रिटानिका पम्पिंग स्टेशन येथे पाठविण्यात येते. जेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा मिनी पम्पिंग स्टेशनच्या साहाय्याने टाकीमध्ये पाणी साचविण्यात येते. ओहोटी सुरू झाल्यानंतर हे पाणी पंप करून पर्जन्यजलवाहिनीत पाठविले जाते. परंतु,या पाण्याचा उपयोग उद्यानाकरिता वापरता येईल का, याबद्दल विचार सुरू आहेत.
प्रमोद महाजन कला पार्क येथील टाकीचे दुसर्या टप्प्यातील काम लवकरच होणार आहे. पहिली टाकी १.६२ कोटी लीटर व दुसरी टाकी १.९९ कोटी लीटर आहे. रुळाखालची माती कोसळत असल्याने हे काम थांबविण्यात आले आहे. हे काम लवकरच सुरू करण्यात येईल.
पाणी मुरण्यास जागा नाही!
मुंबईत गेल्या पाच वर्षांत ६.०८ किमी लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण केले आहे. आतापर्यंत ८८ किमी लांबीचे काँक्रिट रस्ते झाले आहेत. खड्ड्यांची समस्या निकाली निघाली आहे. पण पावसाळ्यात पाणी मुरण्यास जागा मिळत नाही व पाणी तुंबण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे.
मुंबईतील जलपुराच्या आणखी समस्या
अंधेरी पश्तिमेकडील मोगरा नाल्यामध्ये रात्रीच्या वेळी चक्क डेब्रिज टाकले जात आहेत व या विरोधात पुरेशी कारवाई केलेली दिसत नाही. परिणामी, डेब्रिजची उंची नाल्याच्या संरक्षक भिंतीपेक्षा उंच झाली आहे. सततच्या पावसामुळे विमानतळाजवळील क्रांतिनगरजवळ मिठी नदी भरली आहे. पवई किंवा विहार तलावाचे पाणी सोडल्यास क्रांतिनगरची वस्ती पाण्याखाली जाण्याची भीती आहे. मिठी नदीचे पाणी वस्तीत येऊ नये तेथे भिंत उभारण्याचे काम अजून पुरे झाले नाही.
यंदाच्या पावसाळ्यात पाणी तुंबण्याची ३८६ पैकी ३०६ ठिकाणी कामे केली. पालिका दावा करत आहे की, येथील पुराच्या समस्या सुटल्या आहेत. पण, उर्वरित ८० ठिकाणी २०२३ च्या पावसाळ्याच्या आधी कामे करण्याचे पालिकेने ठरविले आहे. तेव्हा, पालिकेने मुंबईकरांना होणारा हा दरवर्षीचा त्रास होणार नाही, म्हणून दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे.
लेखक - अच्युत राईलकर