टार्गेट किलिंगचे प्रकार सुरूच
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताची हत्या केली आहे. शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांना लक्ष्य केलं, ज्यात एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. काश्मीर झोनच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही व्यक्ती राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील आहेत. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शोपियांच्या छोटीपोरा भागात एका सफरचंदाच्या बागेत दहशतवाद्यांनी गोळीबार करून पंडितांना लक्ष्य केलं.
काश्मीर झोनच्या पोलिसांचं म्हणणं आहे की या भागात नाकेबंदी करण्यात आली आहे. यावर्षी शोपियानमध्ये परप्रांतीय मजूर आणि स्थानिक लोकांवर दहशतवादी सतत हल्ले करत आहेत. या महिन्याबद्दल बोलायचं झाले तर, सर्वसामान्यांवर झालेला हा तिसरा हल्ला आहे.
12 ऑगस्ट 2022 रोजी जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथे एका स्थलांतरित मजुराची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेत मोहम्मद अमरेज असं मृताचं नाव असून तो बिहारचा रहिवासी होता. दुसऱ्या घटनेत 4 ऑगस्ट 2022 रोजी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी एका मजुराची हत्या केली होती, तर अन्य दोन जण या हल्ल्यात जखमी झाले होते. या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचं नाव मुहम्मद मुमताज असून तो बिहारमधील साकवा परसा येथील रहिवासी होता.
यापूर्वी मे-जूनमध्येही दहशतवाद्यांनी अनेक हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये 26 दिवसांत 10 घटना घडल्या. यानंतर अनेक मजुरांनी इथून स्थलांतर करण्यास सुरुवात केली. या घटनानंतर पोलीस आणि प्रशासनाने टार्गेट किलिंगबाबत कडक कारवाई करण्याचं सांगितलं होतं आणि लोकांच्या सुरक्षेची हमीही दिली होती. आता पुन्हा एकदा अशा हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.