पाने का सडली? घोडा का अडला? आणि भाकरी का करपली? या तीन प्रश्नांचे उत्तर एकच आहे म्हणजे न फिरविल्यामुळे! शरद पवारांनी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना केलेले हे विधान. विधान बरोबर असले आणि भारतीय तत्वज्ञानाच्या जातीकथातून ते येणारे असले तरी राजकारणात त्याला स्थान नसते. खुद्द पवारांनाही स्वत:च्या पक्षात हे करता आले नाही. त्यामुळे आता त्यांचा पक्षही नेतृत्वाची खुर्ची अन्य कार्यकर्त्यांमध्ये न फिरवता आल्याने केवळ पवार कुटुंबीयांमध्येच जाऊन फसला आहे. हा सगळा कलम पुन्हा ताजा करण्याचे कारण म्हणजे सध्या बिहारमध्ये जे सुरू आहे ते राजकीय नाट्य. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन भाजपपासून काडीमोड घेण्याची घोषणा केली आहे. राजकारणाला अशी एक नाट्यमय छटा असते. त्यामुळे अशा काडीमोडापूर्वी एक कांगावादेखील करावा लागतो. मग ते वडिलांना दिलेले वचनही असू शकते. कारण, या वचनाची साक्ष काढायला त्या महापुरूषाकडे कोण जाणार? आता बिहारमध्येही तसेच सुरू आहे. नितीश कुमार हे अद्याप महाराष्ट्राइतके ‘मेलोड्रामाटिक` झालेले नसले तरी त्यांची वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे. अमित शाहंना दिल्लीतून बिहार चालवायचा आहे, हा कांगावा आता बिहारी अस्मिता जागविण्यासाठी सुरू झाला आहे. त्यामुळे भाजपशी काडीमोड घेताना आणि आपल्या मतदारांना पुन्हा सामोरे जाण्यापूर्वी जी काही म्हणून रडारड करून घेता येईल, ती करून घेतली जाणार आहे.
नितीश तसे धूर्त! कधी काळी ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही होते. लालूंच्या काळात भ्रष्टाचार आणि बजबजपुरीसाठी प्रसिद्ध असलेल्या बिहारमध्ये त्यांनी त्यांचे पारडे सदैव उजवे राखले. भ्रष्टाचारांच्या प्रकरणात स्वत:चे नाव येऊ दिले नाही. जॉर्ज फर्नांडिससारख्या नेत्यांना ते वयोमानामुळे विजनवासात गेले असतानाही राज्यसभा देऊन त्यांनी स्वत:ची प्रतिमा उज्वल राखली. मात्र, आत भाजपला मात देण्यासाठी ते जे काही करीत आहेत, ती स्वत:च्या विचारांना आणि पक्षीय विचारसरणीला देखील धक्का देणारे आहे. नेहरुंची धोरणे फसल्यानंतर या देशात काँग्रेसप्रणित समाजवादी विचाराला जे काही पर्याय उभे राहिले, त्यात जनता दल हा एक महत्त्वाचा प्रवाह. लालू यादव, नितीश कुमार, मुलायमसिंह हे सगळेच या पर्यायी विचारातून पुढे आलेले लोक. राममनोहर लोहियांच्या विचारांचा वारसा सांगणारे. सत्तेपुढे विचार वगैरे काही चालत नसते. पर्यायाने या सगळ्या मंडळींना नंतर सत्तेची चटक लागली आणि घराणेशाहीचा रोगही जडला. नितीश यांचे तसे नव्हते. मात्र, राजकारण हे नेहमी वृक्षासारखे असते, जर ते वाढत नसेल, तर ते मरणपंथाला लागलेले असते. नितीश कुमारांचे राजकारण हेही तसेच!
बिहारसारख्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळूनही त्यांना त्यांच्या कुवतीचा अथवा त्यांच्यापेक्षा अधिक कुवतीचा एकही नेता उभा करता आला नाही. इतक्या वर्षांनंतर त्यांच्या भोवतीच पक्षाचे नेतृत्व फिरत राहिले. त्यांचा ‘मांझी प्रयोग`ही तितकाच फसला. खरंतर नितीश कुमार भाजपसोबतच जाऊन आपल्या पक्षाची बुडती नौका सावरू शकतात. त्यातून बाकी काही झाले नाही तरी त्यांच्या पक्षाचे व त्यांचे अस्तित्व साबूत राहू शकते. मात्र, भाजपद्वेष्ट्यांच्या पर्यायांना जसे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे बळी पडले होते, तसेच आता त्यांचेही झाले आहे. ज्यांना पर्याय म्हणून आपला जन्म झाला, आज त्यांच्यासोबत जाण्याचे त्याचे धोरण सुरू झाले आहे. नितीश यांना सगळ्यात जवळचा पर्याय हा आता लालूंच्या पक्षाचा वाटतो. भ्रष्टाचार, बजबजपुरी, अराजक, गुन्हेगारांचे राजकारणावरचे वाढलेले वर्चस्व या आणि अशा कितीतरी कारणांमुळे बिहारी जनतेने लालूंना नाकारून नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपदी बसविले होते. हिंदी भाषिक राज्यांच्या कक्षेत उत्तर प्रदेश हे लोकसंख्येच्या दृष्टीने सगळ्यात मोठे राज्य असले तरी बिहारचे राजकीय अस्तित्व नेहमीच वेगळे राहिले. त्याचे कारण काँग्रेसला पर्याय देण्याचा बिहारचा इतिहास आणि वर्तमान.
गफलत कुठे झाली तर बिहार काँग्रेसला पर्याय देऊ शकतो, तसा तो भारतीय जनता पक्षालाही देऊ शकतो, असा गोड गैरसमज रजनीश कुमार, बरखा दत्तसारख्या लोकांनी निर्माण केला. जो पूर्णपणे नितीश कुमारांच्या अंगाशी आला. नितीश व मोदी यांच्यातले नाते पूर्वीइतके घट्ट राहिले नाही. असेही वाजपेयी व मोदी यांच्या नेतृत्वशैलीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. मोदी-शाहंचे धोरण विस्ताराचे, तर वाजपेयींचे धोरण समन्वयाचे. ती त्या वेळेची गरजही होती. नितीश कुमारांच्या बाबतीत जे आधी घडले नाही, ते आता घडावे म्हणून भाजपद्वेष्ट्यांनी उच्छाद मांडला. त्यांना वाटते, बिहारमध्ये तर बिहारमध्ये भाजप सत्तेच्या बाहेर जाईल. यासाठी नितीश ज्या अनैसर्गिक युतीच्या दिशेने पुन्हा चालू लागले आहेत, तेच राजकीय वास्तव आहे, असे प्रवाह निर्माण केले जात आहेत. महाराष्ट्रातही असेच झाले होते. भाजपशी फारकत घेतल्यानंतर उद्धव ठाकरे तमाम भाजपद्वेष्ट्यांचे मेरूमणी झाले होते. बेतास बेत वकुब असलेले उद्धव ठाकरे यानंतर ‘बेस्ट सीएम` म्हणून गौरवलेही गेले. मात्र, या अनैसर्गिक प्रयोगाची जी काही किंमत शिवसेनेला मोजावी लागली, ती भयंकर आहे. आता तर पक्षाचे अस्तित्व म्हणूनच शिवसेनेसमोर प्रश्न उभे राहिले आहेत. नितीश कुमारांचेही तसेच होईल.
भ्रष्टाचार, निकालात न निघणारे प्रश्न, धोरण लकवा, अधिकाऱ्यांची मनमानी अशा एक ना अनेक प्रश्नांनी महाराष्ट्र ग्रासला होता, तशीच स्थिती बिहारची होणार आहे. अनागोंदीचे प्रतीक असलेल्या लालूंची मुले, गोंधळलेली काँग्रेस, बुणग्यांसारखे वागणारे डावे आणि या सगळ्यांच्या शीर्षस्थानी असलेले नितीश कुमार, अशी ही विचित्र आघाडी असेल. आपल्या भविष्यासाठी नितीश कुमारांनी बिहारी जनमताशी चालविलेला जो काही हा खेळ आहे, त्याची मोठी किंमत नंतर त्यांना भोगावी लागेल. त्यांच्या पक्षाची शिवसेनाच होईल आणि आज ‘मातोश्री`च्या छोटेखानी हॉलला ‘शिवतीर्थ` समजून आणि ‘मातोश्री`च्या गॅलरीला व्यासपीठ समजून उद्धव ठाकरे बरळत असतात तशीच काहीशी स्थिती नितीश कुमार यांची होईल. त्यापेक्षा त्यांनी युती धर्म पाळावा व आपली शिवसेना होऊ देऊ नये!