दक्षिण दिग्विजय व्हाया तेलंगण...

    दिनांक : 08-Jul-2022
Total Views |
तेलंगणमध्ये केसीआर यांना धक्का देण्यासाठी भाजप सज्ज झाल्याचे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीद्वारे स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी आंध्र प्रदेशात सुनील देवधर यांच्याद्वारे जगनमोहन रेड्डी, तर तामिळनाडूमध्ये प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांच्या नेतृत्वाद्वारे एकाचवेळी द्रमुक व अण्णाद्रमुकला आव्हान देण्याची तयारी भाजपने केली आहे.
 
 
modiji
 
 
 
महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडत असताना गेल्या आठवड्यात भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी दि. ३ आणि ४ जुलै रोजी तेलंगणमधील हैदराबाद येथे पार पडली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्यासह सर्व महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. अनेक वर्षांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दक्षिण भारतातील राज्यात आणि त्यातही तेलंगणमध्ये होत असल्याने त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. भाजपचे धोरण ठरविण्यामध्ये पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा, त्यात मांडल्या जाणार्‍या ठरावांचा अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. त्यातही हैदराबादमध्ये भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीही होणे यास तेलंगणमधील सध्याची राजकीय परिस्थिती, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे धोरण आणि भाजपची राज्यात सुरू असलेली घोडदौड यांची पार्श्वभूमी लाभली आहे. केवळ तेलंगणाच नव्हे, तर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमधील पुढील राजकीय परिस्थितीत दिशा देण्यासाठी कार्यकारिणीची बैठक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.
 
भाजपने दक्षिण भारतामध्ये यश मिळविण्यासाठी आता तेलंगणवर लक्ष केंद्रित केले आहे. यापूर्वी झालेल्या हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपने आपली सर्व शक्ती निवडणूक प्रचारामध्ये उतरविली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे या निवडणुकीकडे जातीने लक्ष घालत होते. भाजपने प्रचारामध्ये देशभरातील राष्ट्रीय ते स्थानिक नेते उतरविला होता. एका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्षाची एवढी मोठी यंत्रणा भाजपने उतरविल्याबद्दल खिल्लीदेखील उडविण्यात आली होती. अर्थात, ही खिल्ली उडविण्यात वातानुकूलित खोल्यांमध्ये बसून राजकीय पांडित्याचा आव आणणारेच आघाडीवर होते. मात्र, भाजपच्या रणनीतीस तेलंगण राष्ट्र समिती आणि ‘एमआय’चे असदुद्दीन ओवेसी यांनी अतिशय चांगल्याप्रकारे ओळखले होते. पुढे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपने तेथे मिळविलेले यश तेलंगण राष्ट्र समिती आणि ‘एमआयए’ या दोघांसाठीही धक्कादायक होता. त्याचवेळी तेलंगणमध्ये आता विधानसभा निवडणुकीतही यश मिळविणे शक्य असल्याचा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात नक्कीच निर्माण झाला होता.
 
त्याचीच पुढची आवृत्ती म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये तेलंगण राज्यातील सद्यस्थितीविषयी पक्षाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेले वक्तव्य हे राज्यातील भाजप पक्षसंघटनेचा हुरुप वाढविणारे ठरले आहे. नड्डा यांनी आपल्या संबोधनामध्ये केसीआर यांच्या नेतृत्वाखाली तेलंगण राज्य तब्बल साडेचार लाख कोटी रुपयांच्या तोट्यात असल्याचे सांगितले. राज्याच्या या आर्थिक स्थितीचे मुख्य कारण केसीआर सरकारमधील भ्रष्टाचार असल्याचे नड्डा म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री शाह यांनीदेखील केसीआर यांच्या घराणेशाहीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “तेलंगणमध्ये एकीकडे बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत असताना मुख्यमंत्र्यांना केवळ आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनविण्याची चिंता लागून राहिली आहे.”
 
भाजप केवळ तेलंगणमधील पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करत नसून २०२४च्या लोकसभा निवडणुकीतही मोठे यश मिळविण्यासाठी अधिक जागा जिंकण्याकडे लक्ष देत आहे. यासाठी भाजपने प्रवास मंत्री अभियानाअंतर्गत रणनीती आखली आहे. भाजपच्या रणनीतीच्या केंद्रस्थानी तेलंगणमध्ये स्थायिक झालेल्या अन्य राज्यांतील नागरिकांसाठी विशेष योजना आखण्यात येत आहे. भाजपच्या पक्षसंघटनेतील एका ज्येष्ठ मराठी नेत्याने त्याविषयी माहिती दिली. त्यानुसार, हैदराबादचा विचार केल्यास या शहरामध्ये सुमारे २० ते २१ टक्के लोकसंख्या ही स्थलांतरितांची आहे. त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, ओडिशा, बंगाल, बिहार, ईशान्य भारत आणि उत्तर प्रदेशातील. पक्ष या राज्यांतील वरिष्ठ नेत्यांना किंवा ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे, त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावून त्यांचे कार्यक्रम आयोजित करणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या काळातही अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आता हा उपक्रम लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
 
त्याचप्रमाणे तेलंगणमधील सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये केंद्र सरकारचे मंत्री पाठवण्याची योजनाही भाजपने आखली आहे. तेलंगणामध्ये १७ लोकसभा मतदारसंघ आहेत. भाजपने १७ मतदारसंघांची विभागणी चार क्लस्टरमध्ये केली असून, त्याचे नेतृत्व केंद्रीय मंत्र्यांकडे दिले आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, पुरुषोत्तम रुपाला, महेंद्रनाथ पांडे आणि बी. एल. वर्मा यांना वेगवेगळ्या क्लस्टरचे प्रभारी बनवण्यात आले आहे. प्रत्येक क्लस्टरमध्ये तीन किंवा चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला असून, प्रत्येक मतदारसंघासाठी एका प्रवास मंत्र्याची नेमणूक करण्यात आली आहे. हे प्रवास मंत्री प्रारंभी आपापल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये तीन दिवस वास्तव्य करणार असून बूथ समित्यांच्या माध्यमातून जाहीर सभा व अन्य कार्यक्रम घेणार आहेत. या आठवड्यापासूनच या मोहिमेस प्रारंभ होणार असून सध्या असे कार्यक्रम दर दोन महिन्यांनी एकदा आणि त्यानंतर दर दोन आठवड्यातून घेण्याचे नियोजन आहे. याद्वारे केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार-प्रसार, योजनांनी लाभार्थ्यांच्या जीवनात घडवून आणलेला बदल मतदारांपुढे मांडला जाणार आहे. या मोहिमेमुळे पक्षाला बूथ स्तरापर्यंत मजबुत करणे, लोकसभा मतदारसंघातील पक्षाची कामगिरी सुधारण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठीचा अहवाल केंद्रीय नेतृत्वास सादर केला जाणार आहे. यामुळे तेलंगणमधील पक्षाचा अगदी शेवटच्या पातळीवरील कार्यकर्ताही सक्रिय होणे शक्य होणार असून, जनतेच्या मनातही भाजपचे स्थान तेलंगण राष्ट्र समितीला पर्याय म्हणून उभे करणे शक्य होणार असल्याचेही भाजप पक्षसंघटनेतील ज्येष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले.
 
भाजपने आपले लक्ष तेलंगणसह आंध्र प्रदेशावरही केंद्रित केले आहे. तेथे काँग्रेसला नमवून सत्तेत आलेले ‘वायएसआर’ काँग्रेसचे सर्वेसर्वा जगनमोहन रेड्डी यांच्यापुढील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. एकीकडे केंद्र सरकारसोबत जुळवून घेण्याचे धोरण दाखविणारे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात हिंदूविरोधी कृत्यांना मोकळे रान मिळत असल्याचा भाजपचा आरोप आहे. त्याचप्रमाणे राज्यातील कायदा व सुव्यवस्थादेखील फार बरी नसल्याचे भाजपचे सांगणे आहे. आंध्र प्रदेशातही भाजपने अगदी शून्यपासून सुरुवात केली आहे. तेथे सुनील देवधर यांच्यासारख्या मुत्सद्दी, धुरंधर आणि पक्षसंघटनेमध्ये ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असलेल्या कुशल संघटकाकडे पक्षाची धुरा दिली आहे.
 
आंध्र प्रदेशप्रमाणेच तामिळनाडूमध्येही भाजपचे अवघे 38 वर्षांचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई कुप्पुसामी हे सत्ताधारी द्रमुक आणि त्यांच्या घराणेशाहीविरोधात उभे राहिले आहेत. ‘आयआयएम लखनऊ’चे विद्यार्थी आणि भारतीय पोलीस सेवेतील (भापोसे) माजी अधिकारी असलेले अण्णामलाई हे तामिळनाडूनध्ये भाजपचा चेहरा म्हणून उदयास आले आहेत. पंचायत आणि नगरपरिषदांच्या झालेल्या निवडणुकीत भाजपच्या चंचुप्रवेशासाठी अण्णामलाई यांच्या रणनीतीस यश आले आहे. महाराष्ट्रात झालेल्या सत्तानाट्ट्याच्या पार्श्वभूमीवर अण्णामलाई यांना महाराष्ट्रातील ठाकरे कुटुंब आणि तामिळनाडूमधील करुणानिधी कुटुंबातील साम्य अतिशय प्रभावीपणे तामिळ मतदारांपुढे मांडले. ते म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा मुलगा बिंदुमाधव ठाकरे हे चित्रपटसृष्टीत यशस्वी होण्याचा प्रयत्न करत होते, मात्र ते त्यांना फारसे जमले नाही. त्याचप्रमाणे करुणानिधी यांचा मोठा मुलगा एम.के मुथू यांनी चित्रपटांमध्ये काम करण्याची योजना आखली होती. परंतु, त्यांची योजना पूर्ण झाली नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा दुसरा मुलगा जयदेव ठाकरे. तो कुटुंबापासून दूर आहे.
 
करुणानिधी यांचा दुसरा मुलगा एम. के. अलागिरी हेदेखील पक्षाबाहेर आहेत. ठाकरे यांचा तिसरा मुलगा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली, त्याप्रमाणेच करुणानिधी यांचा तिसरा मुलगा एम. के. स्टॅलिन हेदेखील त्यांच्या (बाळासाहेब ठाकरे यांच्या) मुलाप्रमाणेच मुख्यमंत्री बनले. उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांना राजकीय महत्त्वाकांक्षा आहे, त्याचप्रमाणे स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी यांचीही राजकीय महत्त्वाकांक्षा आहे. दोघेही आपापल्या पक्षांचे युवा नेते आहेत.” या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्येही एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे राजधर्माचे पालन करणारा नेता पुढे येण्याची गरजही अण्णामलाई यांनी व्यक्त केली. तामिळनाडूनध्ये अण्णामलाई यांच्या नेतृत्वाचा भाजपला लाभ होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्याचवेळी द्रमुक पक्षातील अंतर्गत कलह आणि अण्णाद्रमुक पक्षातील नेतृत्वाचा वाद तर थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपला येथे आपले सकारात्मक अस्तित्व निर्माण करण्याची स्पष्ट संधी उपलब्ध झाली आहे.
 
पार्थ कपोले