नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर महिला क्रिकेटपटू मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे पुरूष क्रिकेटपटू आणि महिला क्रिकेटपटू यांच्या समान मानधनाचा मुद्दा नेहमी चर्चेत असतो. यावर तोडगा म्हणून न्यूझीलँड क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे.
भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी असला तरी देशाचे क्रिकेट प्रेम अफाट आहे. जगभरातही या क्रिकेट खेळाला प्रचंड प्रेम मिळतं. आता क्रिकेट (Cricket) खेळ हा पुरुषांसोबत महिला (Women) देखील आवडीने खेळतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर महिला क्रिकेटपटू मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे पुरूष क्रिकेटपटू आणि महिला क्रिकेटपटू यांच्या समान मानधनाचा मुद्दा नेहमी चर्चेत असतो. यावर तोडगा म्हणून न्यूझीलँड क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार न्यूझीलँडच्या पुरूष आणि महिला क्रिकेटपटूंना एक समान मानधन मिळणार आहे.
न्यूझीलँड क्रिकेट (NZC) आणि खेळाडू संघामध्ये पाच वर्षांचा ऐतिहासिक करार झाला आहे. क्रिकेट विश्वाच्या इतिहासात पहिल्यांदा असा करार झाला आहे. या करारानुसार न्यूझीलँडच्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना सर्व क्रिकेट फॉरमेट आणि टुर्नामेंटमध्ये समान मानधन देण्यात येणार आहे. या करारानंतर न्यूझीलँड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेविड वाइट यांनी प्रतिक्रिया दिली. डेविड वाइट म्हणाले की,'मी या महत्वपूर्ण करारापर्यंत पोहचू शकलो, त्यामुळे खेळाडू आणि मोठ्या क्रिकेट संघांचे आभार मानू इच्छितो. हा करार आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. हा करार न्यूझीलँड क्रिकेट बोर्डाच्या क्रिकेट संघ आणि क्रिकेटपटूंना लागू होईल.
दरम्यान, डेविड वाइट यांच्या म्हणण्यानुसार आता वाइट फर्न यांना वार्षिक एक लाख ६३ हजार २४६ न्यूझीलँड डॉलर मानधन मिळेल. नवव्या स्थानावरील खेळाडूला एक लाख ४८ हजार ९४६ न्यूझीलँड डॉलर मानधन मिळेल. तर १७ व्या स्थानावरील खेळाडूला एक लाख ४२ हजार ३४६ न्यूझीलँड डॉलर मानधन मिळेल. तसेच देशपातळीवर खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटूंना १९ हजार १४६ न्यूझीलँड डॉलर मानधन मिळेल.सहाव्या स्थानावरील खेळाडूला १८ हजार ६४६ न्यूझीलँड डॉलर मिळेल. १२ व्या क्रमांकाच्या खेळाडूला १८ हजार १४६ न्यूझीलँड डॉलर मानधन मिळेल.