महाराष्ट्रकर्ते - देवेंद्र फडणवीस

    दिनांक : 22-Jul-2022
Total Views |
 
घराणेशाहीतून मोठ्या झालेल्या अनेक राजकीय बड्यांचे, जातीयवादाच्या आधारावर महाराष्ट्रात राजकारण करणार्‍यांचे आणि नावाला लोकशाही मानणार्‍या, अशा सर्वांचे राजकारण संपवत खर्‍या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातील महाराष्ट्र साकार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सज्ज आहेत, यात शंका नाही. देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकिर्द नि:संकोचपणे हा महाराष्ट्र आणि कालांतराने हा देश सुवर्णाक्षरात लिहून ठेवेल.
 
महाराष्ट्राचे राजकीय पटल कायमच वैविध्यपूर्ण आणि रोमांचक कहाण्यांनी रंगलेले राहिले आहे. १९६० नंतर महाराष्ट्राला एक स्वतंत्र ओळख मिळाली आणि महाराष्ट्राच्या राजकीय रंगभूमीवर अनेक नायक-नायिका आले. जवळपास सगळ्याच राजकीय पक्षाच्या नायकांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर जातीपातीच्या राजकारणाची छटा आणली आणि स्वतःचा पक्ष याचाच वापर करून वाढवला. अनेक पक्षांनी महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाच्या विचाराला तोडून मोडून स्वतःला परवडेल अशा पद्धतीने लोकांसमोर मांडून लोकांकडून मतांचा जोगवा मागितला. याच कारणास्तव अनेक वर्षं महाराष्ट्रासारख्या विशाल राज्याकडे असलेली क्षमता संपूर्णपणे वापरता आली नाही.
 
पण, या सगळ्या राजकीय चक्रव्युव्हाला तोडत २०१४ मध्ये महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर ’देवेंद्र गंगाधरराव फडणवीस’ या सूर्याचा उदय झाला. फडणवीस यांच्याविषयी बोलताना महाराष्ट्रातील अनेक नेते त्यांना २०१४ साली अनुभवहीन मानत होते. परंतु, त्यांचा राजकीय इतिहास पाहिला, तर खर्‍या अर्थाने रोमांचक आहे. वयाच्या २२व्या वर्षी देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकिर्द नागपूरमधून एक नगरसेवक म्हणून सुरू झाली आणि त्यांचे नेतृत्वगुण पाहून त्यांना महापौरपदी बसवण्यात आले. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे भारतातील दुसरे सर्वांत तरुण महापौर होते. प्रशासनाची ओळख, विकासकामे करवून आणण्यासाठी लागणार्‍या अडचणी आणि या सगळ्या उपर अभ्यासूपणाचा राजकारणात होणारा वापर या सगळ्या विषयी शिकता शिकता देवेंद्र फडणवीस त्यांच्यासमोर येणार्‍या पुढील आव्हानांसाठी सज्ज होत होते.
 
१९९९ साली केंद्रामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृतवाखाली ‘एनडीए’चे सरकार स्थापन झाले आणि त्याच वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, देवेंद्र फडणवीस, दोन वेळा महापौरपदाची धुरा सांभाळल्यानंतर पहिल्यांदा विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले व ते आजतागायत विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेले नाहीत. त्यांचे नेतृत्वगुण पाहून २००१ साली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ही जबाबदारी देण्यात आली. हळूहळू करत संघटनात्मक कामांची जबाबदारी त्यांच्यावर वाढत गेली आणि २०१० साली त्यांना भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि इथून महाराष्ट्राच्या जनतेला देवेंद्र फडणवीस हे नाव परिचयाचे होऊ लागले.
 
राजकीय रणनीतीचा गाढा अभ्यास, जनतेमध्ये असलेली लोकप्रियता आणि निर्णय घेण्याचे अलोट धैर्य, अशा अनेक गुणांचा संगम देवेंद्र फडणवीस यांच्यात होता व यामुळेच २०१३ साली वयाच्या ४१व्या वर्षी त्यांनी महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्षपद स्वीकारले आणि भाजपला महाराष्ट्रात सुगीचे दिवस आणले. २०१४च्या आधी भारतीय जनता पक्षाने एकदाही ७० आमदारांचा आकडा पार केलेला नव्हता. कायम ५० ते ६०च्या घरात खेळणार्‍या भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली १००चा आकडा पार करत १२२ पर्यंत मजल मारली. महाराष्ट्राने आणि भारताने देवेंद्र फडणवीस या जादुगाराची जादू पहिल्यांदाच पाहिली आणि या विजयामुळे अनेक प्रस्थापित नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकली. २०१४ मध्ये झालेल्या विजयामुळे भाजपने शिवसेनेसोबत सरकार स्थापन झाले आणि देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
 
स्वकर्तृत्वावर, स्वबळाने वयाच्या ४३व्या वर्षी मुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांना महाराष्ट्रातील अनेक प्रस्थापित नेत्यांकडून जातीयवादी टोमणे ऐकावे लागले. पण, शिवरायांचा सच्चा मावळा आणि संघ स्वयंसेवक म्हणून फडणवीसांनी हिंदुत्व केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्रासारख्याराज्याला प्रगतिपथावर केवळ अग्रेसरच नाही,तर सर्वांत पुढे नेऊन ठेवण्यासाठी प्रयास सुरू केले.
 
महाराष्ट्राच्या शेतकरी वर्गासाठी त्यांनी अनेक कल्याणकारी योजना आखल्या व राबवल्या. ‘जलयुक्त शिवार’ या त्यांच्या योजनेला महाराष्ट्राच्या जनतेने उदंड प्रतिसाद दिला. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये शेतासाठी आणि वापरासाठी कायम पाणी असावं, यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यातून आलेली ही कल्पना महाराष्ट्रातील २२ हजारांपेक्षा जास्त गावांसाठी जीवनदायिनी ठरली. पायाभूत सुविधा अर्थात ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ क्षेत्रामध्ये फडणवीस यांच्या सरकारने असे काही निर्णय घेतले, ज्याच्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग कैकपटीने वाढला. मुंबई जिथे दररोज लाखोंच्या संख्येत सामान्य माणूस लोकल ट्रेनच्या दरवाज्यांना लटकून गर्दीत चेंगरून कामाला जातो, तिथे फडणवीस सरकारने ३०० किलोमीटरचेमेट्रोचे जाळे उभे करण्याचा निर्णय घेतला. समृद्धी महामार्गाची कल्पना त्यांनी मांडली आणि सत्यात उतरवण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरू केले व तो मार्ग आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
 
ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प जो केवळ सरकारी कागदपत्रांपर्यंत मर्यादित होता, तो सत्यात उतरवण्याचे आणि पूर्ण करण्याचे कार्यदेखील २०१४ नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या काळात घडले. देवेंद्र फडणवीस यांनी युवकांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी नवीन आणि सुपीक कल्पना घेता येतील म्हणून ‘चीफ मिनिस्टर फेलोशिप प्रोग्राम’ सुरू केला. युवकांच्या ऊर्जेचा योग्य वापर कसा करावा, याचा पायंडा फडणवीसांनी महाराष्ट्राला आणि भारताला घालून दिला. सुशासनावर भर असलेल्या फडणवीसांनी ’राईट तू सर्व्हिस’ लागू करण्यासाठी त्यांच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत आदेश दिले व यामुळे ३९३ पेक्षा अधिक सरकारी सेवा ऑनलाईन स्वरूपात लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध झाल्या. यामुळे सरकारी कामातील पारदर्शकता वाढली. औद्योगिकरण आणि गुंतवणुकीवर भर देत देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या कार्यकाळाच्या दोन वर्षांतच कमाल करून दाखवली. भारताच्या एकूण ‘एफडीआय’पैकी ५० टक्के ‘एफडीआय’ हा महाराष्ट्रामुळे आला. देशातील व जगातील अनेक उद्योजक महाराष्ट्राला औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाचे ठिकाण मानू लागले व तसे लगतच्या काळात घडलेदेखील.
 
पण या सगळ्या गोष्टी घडत असताना देवेंद्र फडणवीसांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. अनेक मोर्चे निघाले. सुनियोजित पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्यावर राजकीय हल्ले चढवण्यात आले. पण, कुठेही न डगमगता अत्यंत संयमाने त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्यांच्या विरोधात चालून आलेल्या लोकांची मने कायमसाठी जिंकली. महाराष्ट्र त्यांना एक ’लोकनेता’ म्हणून पाहू लागला. प्रशासनिक कामे करत असताना त्यांनी कधीही संघटनेकडे अर्थात पार्टीच्या दायित्वांकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांना जी जबाबदारी दिली त्यांनी ती चोखपणे पार पडली. बिहारचे प्रभारी म्हणून २०२० साली त्यांची नेमणूक करण्यात आली आणि त्या निवडणुकीत ‘एनडीए’ला बहुमत मिळाले व सरकार स्थापन झाले.
 
२०२२ मध्ये त्यांच्याकडे गोवा राज्याची प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आणि तिथेही भाजपचे सरकार बहुमताने स्थापन झाले. अनेक संकटांचा सामना करत, स्वकीयांकडून दगाफटका सहन करत अत्यंत संयमाने २०१९ला हातातून गेलेली सत्ता देवेंद्र फडणवीसांनी २०२२ मध्ये जून महिन्यात परत मिळवली. या सगळ्यात, भारतीय जनता पक्षाला ग्रामपंचायत ते नगरपालिका इथेपर्यंत सर्वांत मोठा आणि सर्वात विश्वासू पक्ष म्हणून स्थापित करण्यात देवेंद्र फडणवीस यांचे योगदान अतुल्य आहे.
 
‘कार्यकर्त्यांचा नेता’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या नेत्याकडून महाराष्ट्राची जनता भरपूर आस लावून बसलेली आहे. घराणेशाहीतून मोठ्या झालेल्या अनेक राजकीय बड्यांचे, जातीयवादाच्या आधारावर महाराष्ट्रात राजकारण करणार्‍यांचे आणि नावाला लोकशाही मानणार्‍या, अशा सर्वांचे राजकारण संपवत खर्‍या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातील महाराष्ट्र साकार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सज्ज आहेत यात शंका नाही. देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकिर्द नि:संकोचपणे हा महाराष्ट्र आणि कालांतराने हा देश सुवर्णाक्षरात लिहून ठेवेल. वयाच्या ५२व्या वर्षांत पदार्पण करण्यासाठी लोकनेते देवेंद्र फडणवीस यांना अनेक शुभेच्छा व उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
 
- मल्हार पांडे