शिवसेनेचे गोत्र बदलले त्याचे काय?

    दिनांक : 21-Jul-2022
Total Views |
आज ज्या खासदारांच्या गोत्रावरुन शिवसेना टीका करते, त्या शिवसेनेलाच गेल्या अडीच वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोत्राची लागण झाली. म्हणूनच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसलाही लाजवेल असे हिंदूविरोधी काम उद्धव ठाकरेंनी व त्यांच्या शिवसेनेने करून दाखवले.
 
 
 
thakare
 
 
 
हेमंत गोडसे, कृपाल तुमाने, सदाशिव लोखंडे, श्रीरंग बारणे, राजेंद्र गावीत, संजय मंडलिक, धैर्यशील माने असे खासदार ‘हिंदुत्व’ वगैरे मुद्द्यांवर बोलतात, हे आश्चर्यच आहे. त्यांचे मूळ व कूळ शिवसेनेचे किंवा हिंदुत्वाचे नव्हतेच. शिवसेनेकडून विजयाची संधी असल्यानेच ते भगव्याचे तात्पुरते शिलेदार बनले नाहीतर यांचे गोत्र काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच आहे, हे काय कोणाला माहीत नाही? पण भाजपही आता मूळच्या हिंदुत्ववाद्यांपेक्षा अशा बाह्य जात-गोत्र-धर्मवाल्यांचा भरणा झाला आहे,” अशा शब्दांत शिवसेनेने ‘सामना’ मुखपत्रातून एकनाथ शिंदे गटात गेलेल्या खासदारांवरुन आगपाखड केली. पण, आज उद्धव ठाकरेंच्या गटाची शिवसेना ज्या खासदारांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे, त्यातले अनेक खासदार २०१९ साली शिवसेनेकडून दुसर्‍यांदा निवडून आलेले आहेत. म्हणजे, त्यांनी शिंदे गटात भाग घेण्याच्या आधी किमान तीन आणि कमाल आठ वर्षे ते शिवसेनेतच होते. शिवसेना स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेते. ‘ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे आम्हीच एकमेव’ असा दावा करते. आमचेच हिंदुत्व अस्सल आणि भाजपचे हिंदुत्व कमअस्सल असा आरोप करते. त्या शिवसेनेला उपरोल्लेखित खासदारांच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोत्राची आठवण आजच का यावी? शिवसेनेत सामील होताना या खासदारांचे गोत्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नव्हते का? तर नक्कीच तसे होते.
 
पण, त्यांना शिवसेनेत प्रवेश देताना शिवसेनापक्षप्रमुखांनाही आनंदाच्या उकळ्याच फुटल्या. त्यामागे संबंधित मतदारसंघात आपली ताकद नाही, तर दुसर्‍या पक्षाच्या संघटनेवर पकड असलेल्या नेत्याला अर्थपूर्ण व्यवहार करत उचलावे, त्याच्या व आपल्या कार्यकर्त्यांची आणि मतदारांची बेरीज व्हावी आणि त्याने निवडून यावे, हेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे गणित होते. तरी शिवसेना तेव्हा त्यांचा प्रचार करताना हिंदुत्वाचाच जप करत होती. म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्यांचे गोत्र हिंदुत्वाचे होते आणि तेच भाजप नव्हे, तर शिवसेनेच्याच एकनाथ शिंदे गटात गेले, तर त्यांचे गोत्र पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, असे शिवसेनेचे म्हणणे. ते पाहता शिवसेना हिंदुत्वाची वॉशिंगमशीन आहे का, हा प्रश्न पडतो. दुसर्‍या कुठल्याही पक्षातून या आणि तिकडच्या हिंदुत्वविरोधी विचारांचा मळ काढून हिंदुत्ववादी व्हा अन् आमच्याविरोधात गेल्यावर पुन्हा हिंदुत्वविरोधी विचारांचा मळ चिकटवून घ्या, अशी काही करामती लॉन्ड्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सुरू केली आहे का? यातलाच पुढचा मुद्दा म्हणजे, सुरुवातीला नावे घेतलेल्या खासदारांशी भाजपचा तसा काही संबंध नाही. कारण, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही, तर ते शिवसेनेच्याच शिंदे गटात आहेत. त्यामुळे त्यांचे नाव घेऊन भाजप मूळ हिंदुत्ववाद्यांपेक्षा बाह्य जात-गोत्र-धर्मवाल्यांचा भरणा झाल्याची शिवसेनेची टीका निव्वळ द्वेषभावनेतून उपजलेली. तसेच, शिवसेनेने भाजपच्या हिंदुत्वाची काळजी करण्याची काहीही गरज नाही.
 
भाजप अगदी जनसंघापासून हिंदुत्ववादीच आहे, त्याने शिवसेनेसारखी दुसर्‍या कुठल्या विचारांनी राजकारणाला पडलेल्या मर्यादेच्या दबावाखाली हिंदुत्वाची शाल पांघरलेली नाही. विशेष म्हणजे, गेल्या आठ वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने कणखर भूमिका स्वीकारत हिंदूहिताचे अनेक निर्णय घेतले. त्यावर इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेल्यांच्या मूळ पक्षाच्या विचारांचा प्रभाव पडला नाही. पण, सुरुवातीला सत्तेत राहून आणि नंतर विरोधात जाऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने त्या निर्णयांचा विरोधच केला. तेव्हा शिवसेनेचे हिंदुत्व कुठे होते?
 
शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या बाता किती पोकळ असतात, हे सांगणारी ऐतिहासिक घटना म्हणजे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वविरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी मुख्यमंत्रिपदासाठी हातमिळवणी करणे. स्वातंत्र्यापासून हिंदूंविरोधात दडपशाहीचा वापर करणार्‍या, प्रभु श्रीरामाचे अस्तित्व नाकारणार्‍या, अयोध्येतील श्रीराम मंदिराला विरोध करणार्‍या, देशाच्या साधनसंपत्तीवर हिंदूंऐवजी मुस्लिमांना पहिला अधिकार देणार्‍या, हिंदू दहशतवादाची संकल्पना जन्माला घालणार्‍या, हिंदूंविरोधात मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळणार्‍या, कट्टरपंथी मुस्लिमांपासून दहशतवादी मुस्लिमांना पाठीशी घालणार्‍या, हिंदूंमध्ये जाती-जातीत फूट पाडणार्‍या, मुस्लीम व ख्रिश्चन धर्मांतराला पाठिंबा देणार्‍या, हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या इस्लामी आक्रमकांना गौरवान्वित करणार्‍या, फक्त हिंदूंनाच दंगल-हिंसाचारासाठी जबाबदार धरणार्‍या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज झालेल्या, काश्मीर खोर्‍यातील हिंदूंच्या पलायनासाठी जबाबदार असणार्‍या, हिंदूंच्या प्रथा-परंपरा-देवदेवतांची खिल्ली उडवणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेने संगत केली, त्याचवेळी शिवसेनेची हिंदुत्ववादी प्रतिमा नष्ट झाली.
 
आता उल्लेख केलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिंदूविरोधी पापकर्मांची ही वानगीदाखल उदाहरणे, त्यांची गेल्या ७० वर्षांतल्या हिंदूविरोधी कारवायांची यादी केली, तर शब्दही अपुरे पडतील. तरी शिवसेनेने आपले तथाकथित हिंदुत्व गुंडाळून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केलीच! काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बाळासाहेब ठाकरे काय विचार करायचे, हे जगजाहीर आहे. त्यांची अनेक भाषणे, मुलाखती आजही मुक्त माध्यमांत उपलब्ध आहेत. त्यातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिंदूविरोधी व राष्ट्रघातकी मानसिकतेवर जहाल शब्दांत टीका केलेली ऐकायला मिळते. तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्ववादी विचार बाजूला ठेवत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली, ती शिवसेना आज कोणत्या तोंडाने हिंदुत्वाचे कैवारी असल्याचे दाखवते?
 
उलट आज ज्या खासदारांच्या गोत्रावरुन शिवसेना टीका करते, त्या शिवसेनेलाच गेल्या अडीच वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोत्राची लागण झाली. म्हणूनच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसलाही लाजवेल असे हिंदूविरोधी काम उद्धव ठाकरेंनी व त्यांच्या शिवसेनेने करून दाखवले. अजान पठण स्पर्धा, प्रभादेवी मंदिरासमोर ख्रिश्चन स्मृतिस्तंभ, मशिदींवरील भोंग्यांविरोधात कसलीही कारवाई नाही, हनुमान चालीसा पठण करणार्‍यांवर खटले, कोरोना संपला तरी वारी, दहीहंडी, गणेशोत्सवावर बंदी, पण ईद-ए-मिलादच्या मिरवणुकांना परवानगी, श्रीराम मंदिरात जमीन घोटाळ्याचा आरोप, हिंदूंनाच दंगलखोर ठरवणे, पालघरमधील साधू हत्याकांडाविरोधात ठोस कारवाई नाही, दंगली घडवणार्‍या ‘रझा अकादमी’वर बंदी नाही, मालाडमधील क्रीडा संकुलाला क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव, मदरसा मॉडर्नायझेशनसाठी भरमसाठ निधी, मुस्लीम तुष्टीकरणासाठी मुस्लीम तरुणांना पोलीस व प्रशासकीय सेवेत दाखल होण्यासाठी योजना आणि इतरही कितीतरी हिंदूविरोधी उद्योग शिवसेनेने केले. त्यामुळे शिवसेनेने एकनाथ शिंदेंबरोबर गेलेल्या खासदारांवर वा भाजपवर हिंदुत्वावरुन टीका करण्यापेक्षा जरा आत्मपरीक्षण करावे. तेवढी सुधारणा झाली तर ठीक, अन्यथा शिवसेनेला वेळ येताच जनता उत्तर देईलच!