जळगाव जिल्ह्यात धरणगाव तालुक्यातील डॉ. हेडगेवार नगरला स्वतंत्र गाव म्हणून नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. त्यानिमित्ताने रा. स्व. संघाचे प्रथम सरसंघचालक प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या भाषणांतूनब्रिटिश राजवटीविरोधातील त्यांचे प्रखर विचार आणि राष्ट्रजागरणातील योगदान यांचा आढावा घेणारा हा लेख...
डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी केवळ मातृभूमीची पूजा केली आणि भारताच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली, असे बहुतेक लोक मानतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि कार्यक्षम संघटक म्हणून तर डॉ. हेडगेवार ओळखले जातातच, परंतु, ते एक महान क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी, उत्साही वक्ते आणि एक महान विचारवंतदेखील होते.स्वातंत्र्यलढ्यात संघाने कोणती भूमिका बजावली, असा वारंवार प्रश्न उपस्थितीत करणार्यांनी डॉ. हेडगेवार, त्यांचा संघर्ष, त्यांचा सश्रम कारावास आणि त्यांनी लोकांना ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढण्यासाठी कशा प्रकारे प्रेरित केले, हे सर्वप्रथम जाणून घेतले पाहिजे.
१९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेनंतर, संघाचे स्वयंसेवकच नव्हे, तर अनेक राष्ट्रवादी विचारांचे नेतेमंडळीही डॉ. हेडगेवार यांच्या भाषणातून आणि मैदानी कार्याने प्रेरित झाले. सर्वत्र अडचणी असूनही डॉक्टरांनी लाखो लोकांना ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढण्यासाठी कशी प्रेरणा दिली, हे जाणून घेण्याचा या लेखातून केलेला हा प्रयत्न...
मे १९२१ मध्ये काटोट आणि भरतवाडा येथे डॉ. हेडगेवारांच्या आक्रमक भाषणांना प्रतिसाद म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली. दि. १४ जून, १९२१ रोजी स्मेमी नावाच्या ब्रिटिश न्यायाधीशाने या खटल्याची सुनावणी सुरू केली. काही दिवसांच्या सुनावणीनंतर डॉ. हेडगेवार यांनी या संधीचा उपयोग राष्ट्रीय प्रबोधनासाठी करण्याचे ठरवले आणि स्वत:च स्वत:ची बाजू मांडायचा निर्धार केला.
दि. ५ ऑगस्ट, १९२१ रोजी त्यांनी त्यांचे लिखित विधान वाचून दाखवले, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते, “भारतीयांच्या मनात युरोपीय लोकांविरुद्ध असंतोष, द्वेष आणि देशद्रोहाची भावना निर्माण केल्याचा माझ्यावर आरोप आहे. परकीय सरकार इथल्या स्थानिक नागरिकांना प्रश्न विचारत आहे आणि त्याचा न्याय करत आहे, हा आमच्या महान देशाचा अपमान आहे. आज भारतात वैध सरकार आहे, यावर माझा विश्वास नाही. असे सरकार अस्तित्वात आहे, हा दावा केला जात असेल, तर आश्चर्यच आहे. आज जे काही सरकार अस्तित्वात आहे, ते भारतीयांकडून हिसकावून घेतलेली सत्ता आहे, ज्यातून जुलमी राजवट आपली सत्ता चालवत आहे. आजचे कायदे आणि न्यायालये ही या अनधिकृत व्यवस्थेची कृत्रिम निर्मिती आहे. जगातील बहुतेक देशांमध्ये लोकांची निवडलेली सरकारे आहेत, जी लोकांसाठी बनविली जातात आणि ते सरकार योग्य कायद्यांचे शासक असते. इतर सर्व प्रकारची सरकारे ही केवळ फसवणूक आहेत, जी शोषकांनी हिसकावून घेतली आहेत-शोषकांनी असाहाय्य देशांना लुटण्यासाठी त्यांचा ताबा घेतला आहे.”
डॉक्टर हेडगेवार पुढे म्हणतात की, “मी जे प्रयत्न केले ते माझ्या देशवासीयांच्या हृदयात जगण्यासाठी पुरेसे आहेत. मी माझ्या मातृभूमीबद्दल आदराची भावना जागृत करू शकतो. भारत देशाचे अस्तित्व कायम आहे, हे मी लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. हे भारतीय लोकांसाठी आहे. जर एखाद्या भारतीयाला आपल्या देशासाठी राष्ट्रवाद पसरवायचा असेल आणि देशवासीयांना आपल्या देशाबद्दल चांगले वाटावे, या हेतूने काही बोलले, तर त्याला देशद्रोही ठरवू नये आणि जे राष्ट्रवाद पसरवतात, त्यांना ब्रिटिश सरकार देशद्रोही मानते. म्हणून मला असे म्हणायचे आहे की, तो दिवस दूर नाही जेव्हा सर्व विदेशी लूटमारांना भारत सोडण्यास भाग पाडले जाईल.”
माझ्या भाषणाचा सरकारने काढलेला अर्थ अचूक किंवा सर्वसमावेशक नाही.
आपली बाजू मांडताना डॉ. हेडगेवार पुढे म्हणतात की, “माझ्या विरोधात काही दिशाभूल करणारे शब्द आणि बेताल वाक्ये टाकली गेली आहेत. पण, त्याने काही फरक पडत नाही. युनायटेड किंग्डम आणि युरोपमधील लोकांशी व्यवहार करताना, दोन्ही देशांमधील संबंधांवर नियंत्रण ठेवणारी तत्त्वे विचारात घेतली जातात. हा देश भारतीयांचा आहे आणि आम्हाला आमचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, या विचाराला बळ देण्यासाठी मी ते बोललो. मी माझ्या प्रत्येक शब्दाची पूर्ण जबाबदारी स्वीकारतो. माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवर मी अधिक भाष्य करू इच्छित नसलो तरी, मी माझ्या भाषणात सांगितलेल्या प्रत्येक शब्दाचा बचाव करण्यास तयार आहे आणि मी जे काही बोललो ते खरे असल्याचे घोषित करतो.”