भोपाळ : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खलघाट येथे एक भीषण अपघात झाला आहे . प्रवाशांनी भरलेली बस नर्मदा नदीत कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
सकाळी 10 वाजण्याचा सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही बस इंदूरहून अंमळनेरकडे निघाली होती. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचे वर्तविले जात आहे.घटना प्रसंगी बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह 50 हून अधिक लोक प्रवास करत होते. अपघातग्रस्त बस ही महाराष्ट्र राज्य परिवहनची असून, तर 10 ते 12 प्रवासी बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र महामंडळाची ही बस सकाळी 7.30 च्या सुमारास इंदूूरहून अमळनेरकडे निघाली होती. त्यावेळी बसमध्ये अचानक काही तांत्रिक बिघाड झाला आणि बस थेट खलघाट संजय सेतू पुलावरून 25 फूट नर्मदा नदीत कोसळली. यामध्ये बसमधील 13 जणांचा मृत्यू झाला असून 15 जणांना वाचवण्यात यश आल्याचे शिवराज सरकारमधील कॅबिनेट मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले आहे. बसमध्ये महाराष्ट्रातील कितीजण होते याची आकडेवारी अद्याप मिळू शकलेली नाही
.दरम्यान, एसटी बसचा अपघाताची माहिती मिळताच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी घटनास्थळी एसडीआरएफला दाखल होण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच या दुर्घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या बसमध्ये ५० ते ६० प्रवासी होते, अशी प्राथमिक माहिती आहे. प्रशासनाकडून सध्या मृतांची ओळख पटवली जात आहे. दरम्यान, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एसटी महामंडळ जळगाव तसेच धुळे विभागाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून मदत नियंत्रण कक्ष कार्यान्वित
राज्य परिवहन महामंडळाच्या धार विभागात झालेल्या अपघातासंदर्भात घटनास्थळी स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून मदत कार्य केले जात आहे. जळगाव जिल्हा प्रशासन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आवश्यक मदत सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. घटनास्थळी मदतीसाठी ०९५५८९०९१ आणि जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष ०२५७-२२२२३१८० तसेच ०२५७-२२१७१९३ हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.