सुरत: गुजरातमध्ये सूरत येथे नैसर्गिक शेती परिसंवादामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक ग्रामपंचायतीमधील 75 शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीशी जोडण्याचे सूरतचे यश संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते नैसर्गिक शेती परिसंवादामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलत होते. या कार्यक्रमाला हजारो शेतकरी आणि सूरतमध्ये नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करून यशस्वी झालेले इतर सर्व हितधारक सहभागी झाले होते. गुजरातचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल देखील या परिसंवादात सहभागी झाले होते. नैसर्गिक शेतीचे सूरत मॉडेल संपूर्ण देशासाठी आदर्श बनेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने देश अनेक लक्ष्ये साध्य करण्याच्या दिशेने काम करत आहे. येणाऱ्या काळात त्यामुळे खूप मोठे परिवर्तन घडून येईल. देशाच्या प्रगतीचा पाया आणि वेग यामागे ‘ सबका प्रयास’ ची भावना आहे आणि आपल्या विकासाच्या यात्रेचे ती नेतृत्व करत आहे. म्हणूनच गरिबांच्या आणि वंचितांच्या कल्याणाच्या योजनांमध्ये ग्राम पंचायतींना महत्त्वाची भूमिका सोपवली आहे.
पंतप्रधान म्हणाले, की स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रत्येक पंचायतीमधून 75 शेतकर्यांची निवड केली आणि त्यांना प्रशिक्षण आणि इतर संसाधनांची मदत करत ठोस भूमिका बजावली.त्यामुळे 550 पंचायतींमधील 40 हजारांहून अधिक शेतकरी नैसर्गिक शेतीत गुंतले आहेत,असे चित्र सर्वत्र दिसू लागले आहे.ही एक उत्तम सुरुवात असून अतिशय उत्साहवर्धक आहे. नैसर्गिक शेतीचे हे सुरत मॉडेल संपूर्ण देशासाठी आदर्श ठरू शकते.
पंतप्रधानांनी यावेळी 'जल जीवन मिशन' प्रकल्पाचे उदाहरण दिले, जिथे लोकांना महत्त्वाची भूमिका देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे “डिजिटल इंडिया मिशनचे अभूतपूर्व यश हे खेडेगावात बदल घडवणे सोपे नाही असे म्हणणाऱ्यांना देशानेच दिलेले उत्तर आहे. आमच्या गावखेड्यांनी दाखवून दिले आहे की खेडी केवळ बदल घडवून आणू शकत नाहीत तर बदलाचे नेतृत्वही करू शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. नैसर्गिक शेतीबाबतचे जनआंदोलन येत्या काळातही मोठे यश मिळवेल, असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.