मुंबई : भाजपचे विधानपरिषदेतील नवनिर्वाचित आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या घराबाहेर एक बॅग आढळून आली आहे. त्या बॅगेत सोने,चांदी, पैसे आणि देवांच्या मूर्ती हा ऐवज सापडलेला आहे. अज्ञात व्यक्ती त्यांच्या घराबाहेर ही बॅग सोडून गेल्याचे समजते.
लाड यांना काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात त्यांनी तात्काळ पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.
प्रसाद लाड (Prasad Lad) यांचे निवासस्थान माटुंगा परिसरात असून हा प्रकार आज रविवारी पहाटे समोर आला आहे. दरम्यान, बॅग ठेवणारी व्यक्ती कोण आहे आणि त्याने कधी प्रसाद लाड यांच्या घराबाहेर बॅग ठेवली, याचा अद्याप पत्ता लागलेला नाही.
या प्रकरणाची माहिती देताना लाड म्हणाले ...
प्रसाद लाड यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, ‘पहाटे साडेपाच-सहाच्या सुमारास सुरक्षा रक्षकांचा फोन आला एक बॅग पडली आहे. मी पाहिलं त्या बॅगेत तीन वेगवेगळ्या बॅगा होत्या.पोलिसांना माहिती कळवल्यानंतर पोलीस पथक आले. सोनं, चांदी, पैसे, मूर्ती हा ऐवज होता. माझ्या घराबाहेर 24 तास पोलीस संरक्षण असतं. संरक्षण असताना या प्रकराची घटना घडणे योग्य नाही. बॅगेत ऐवज सापडला. त्यामध्ये दुसरं काही असतं तर घातपात होण्याची शक्यता होती. त्यामुळे रात्रीचं गस्तीपथ वाढवावं, अशी विनंती मी पोलिसांना केली आहे.’
दरम्यान, आता पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करतील. ही बॅग नक्की कोणी लाड यांच्या घराबाहेर सोडली, हे पाहिले जाईल. त्यामुळे आता या तपासातून काय निष्पन्न होणार, हे पाहावे लागेल.