खलिस्तानवाद्यांच्या पाठीशी कोण?

    दिनांक : 07-Jun-2022
Total Views |

जगातल्या काही काही देशांत खलिस्तान्यांकडून उपद्रव केला जात आहे, तर पंजाबात आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होण्यापासूनच इथे खलिस्तानी पुन्हा सक्रिय होतील, अशी शंका व्यक्त केली जात होती. तसे झालेही आणि आता पंजाबात खलिस्तानवाद्यांचा चांगलाच प्रभाव निर्माण झाल्याचे दिसत आहे.
 
 

khalisthan 
 
अमृतसरच्या सुवर्णमंदिराच्या दरवाजावर ‘खलिस्तान जिंदाबाद’, ‘खलिस्तान जिंदाबाद’ची नारेबाजी करणार्‍या फुटीरतावाद्यांची एक ध्वनिचित्रफित समाजमाध्यमांसह मुख्य प्रवाहातील माध्यमांतून ‘व्हायरल’ होत आहे. हातात मोठमोठ्या तलवारी आणि जर्नेलसिंग भिंद्रनवालेचे फलक घेतलेल्या या लोकांची मागणी खलिस्तानच्या आझादीची म्हणजेच भारताचे पुन्हा एकदा तुकडे करण्याची आहे. त्याची सुरुवात ४० वर्षांपूर्वी जर्नेलसिंग भिंद्रनवाले व इतरांनी केली, तर त्याचा खात्मा दि. ६ जून, १९८४ रोजी ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’च्या माध्यमातून करण्यात आला. त्याला ३८ वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने पंजाबातून पुन्हा एकदा ‘खलिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या गेल्या. पण, शीख समुदायाने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यापासून भारतीय लष्कर, भारतीय अर्थव्यवस्था व इतर प्रत्येक क्षेत्रात योगदान दिलेले आहे. त्याचा उर्वरित भारतीयांनीही सातत्याने सन्मान, गौरवच केला. त्यामुळेच शीख समुदाय भारताच्या सर्वच राज्यांत मिळून-मिसळून राहताना दिसतो. तरीही खलिस्तानची मागणी पुढे येत असेल, तर ती संपूर्ण शीख समुदायाची मागणी म्हणता येणार नाही, तर मूठभर खलिस्तानवाद्यांमागे तुकडे तुकडे गँगसह परदेशी ताकदीचाही हात आहे, यात कसलीही शंका नाही. तो हात याआधीही होताच, पण पंजाबात आम आदमी पक्षाचे सरकार आल्यापासून मात्र त्या पक्षानेही खलिस्तानवाद्यांशी हातमिळवणी केली की काय, असे वाटते.
 
आताही सोमवारी सुवर्णमंदिराच्या प्रवेशद्वारावर शेकडोच्या संख्येने खलिस्तानवादी जमा झाले. पण, त्यादरम्यान पंजाबात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या व त्याचा संबंध खलिस्तान जिंदाबादशी असू शकतो. ढासळलेली कायदा-सुव्यवस्था, अमली पदार्थांचा वाढता व्यापार, गुन्हेगारी, माफिया राज आणि हमीभावाच्या अट्टाहासाने शेतीत नव्या प्रयोगांची रुजवात नाही, ही पंजाबची स्थिती. परिणामी, वाढलेली बेरोजगारी आणि अमेरिका, कॅनडा, युनायटेड किंग्डममधील खुणावणार्‍या कथित रोजगाराच्या संधींकडे पाहणारा तरुण, असा समाज पंजाबात तयार झाला. त्यातल्या कित्येक तरुणांची खलिस्तानच्या नावाने माथी भडकावणे तुकडे तुकडे गँगला शक्य होते. पंजाबात आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर आल्याने ते अधिकच सोपे झाले. कारण, आम आदमी पक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा खलिस्तानवाद्यांशी अनेकदा संबंध आलेला आहे. दिल्लीभोवतालच्या तथाकथित शेतकरी आंदोलनातही खलिस्तानवाद्यांचा सहभाग होता व त्यांची सेवा करण्यासाठी आम आदमी पक्षाने पुढाकार घेतला होता. इतकेच नव्हे, तर अरविंद केजरीवालांची पूर्ण राज्याचा मुख्यमंत्री ते पंतप्रधान होण्यापर्यंतची हौस कोणापासूनही लपून राहिलेली नाही. असे असताना पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री भगवंत मान यांनी रविवारी सुवर्णमंदिरात दर्शन घेतल्यानंतर अकाल तख्तचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीतसिंह यांची बंद दरवाजाआड भेट घेतली. या बैठकीत दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील बाहेर आलेला नाही. पण, त्यानंतरचे ज्ञानी हरप्रीत सिंह यांचे विधान सूचक आहे. शीखांना हत्यारे चालवण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलेली आहे, तर त्याच दिवशी बब्बर खालसा, शिरोमणी अकाली दल (अमृतसर) यांसह इतरही फुटीरतावादी संघटनांनी खलिस्तानच्या आझादीसाठी मोर्चा काढला होता. त्यानंतर सोमवारी सुवर्णमंदिराच्या दरवाजावर खलिस्तानचे भूत गाडणार्‍या ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’च्या वर्षपूर्तीलाच खलिस्तानच्या मागणीसाठी घोषणाबाजी करण्यात आली.
 
इथे भगवंत मान आणि ज्ञानी हरप्रितसिंह यांच्यात काय बोलणे झाले? त्याचा संबंध खलिस्तानशी होता का? त्यामुळेच नंतर ज्ञानी हरप्रीतसिंह यांनी शीखांसाठी शस्त्रास्त्र प्रशिक्षणाची मागणी केली का? त्यांना ते प्रशिक्षण नेमके कशासाठी हवे आहे? त्याचा वापर कोणाविरोधात करायचा आहे? रविवारी व सोमवारी खलिस्तानच्या आझादीसाठी झालेल्या नारेबाजीशी याचा काही संबंध आहे का? अन् तसा संबंध असल्याचे खलिस्तानवाद्यांनी हातात उंचावलेल्या तलवारींवरुन दिसून येते. हा सगळाच प्रकार भयानक आणि गंभीर असून, पंजाबला पुन्हा एकदा अशांत करण्याचा, त्या माध्यमातून कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा, भारताला जगभरात बदनाम करण्याचा, अर्थव्यवस्थेचे नुकसान करण्याचा डाव असल्याचे स्पष्ट होते. या सगळ्यामागे निश्चितच परकीय शक्ती आहेत व त्यांनी सांगितल्याप्रमाणे एकेक घटना घडवली जात आहे, असे दिसते. त्यात कोणी आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेपायी, राजकीय स्वार्थापायी भाग घेत आहे, तर कोणी केवळ भारताचे तुकडे पाडण्यासाठी भाग घेत आहे. त्याला वेळीच आवर न घातल्यास खलिस्तानची मागणी आणखी जोर पकडू शकते.
 
८०च्या दशकात पंजाबात कट्टरपंथी फुटीरतावाद्यांनी पंजाब आणि उत्तर भारताच्या काही प्रदेशासह खलिस्तानच्या रुपात स्वतंत्र शीख धर्मीय देशाच्या निर्मितीसाठी रक्तरंजित मोहीम सुरू केली. आता २०२२ मध्येही भारतच नव्हे, तर जगातल्या काही काही देशांत खलिस्तान्यांकडून उपद्रव केला जात आहे, तर पंजाबात आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होण्यापासूनच इथे खलिस्तानी पुन्हा सक्रिय होतील, अशी शंका व्यक्त केली जात होती. तसे झालेही आणि आता पंजाबात खलिस्तानवाद्यांचा चांगलाच प्रभाव निर्माण झाल्याचे दिसत आहे. आम आदमी पक्षाच्या सरकारमुळे पाची बोटे तुपात, अशी त्यांची अवस्था झालेली आहे. नुकतीच पतियाळातील एका हिंदू मंदिरात खलिस्तानवाद्यांनी तलवारी नाचवत तोडफोड केली होती. त्याची ध्वनिचित्रफितही ‘व्हायरल’झाली होती. तर कथित शेतकरी आंदोलनादरम्यान, लाल किल्ला परिसरातील हिंसाचारादरम्यान खलिस्तानी झेंडा फडकावण्याच्या घटना घडल्या होत्या. आता पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी आल्यापासून भगवंत मानदेखील अरविंद केजरीवालांच्याच मार्गाने जाऊ इच्छितात. फुटीरतावादी कट्टरपंथीयांना खूश ठेवले, तर आपल्याला विरोध होणार नाही, असे त्यांचे मत असावे. पण, त्याचा परिणाम देशाच्या दृष्टीने कधीही चांगला असू शकत नाही. अर्थात, विचारांशी निष्ठा नसल्याने मान सरकारला त्याचे काहीही वाटणार नाही, अशा परिस्थितीत केंद्र सरकारनेच खलिस्तानवाद्यांकडे लक्ष दिले पाहिजे, तर पंजाबमध्ये शांतता नांदेल.