इसू आफवर्की आणि बिचारा ईरिट्रिया

    दिनांक : 25-Jun-2022
Total Views |


जिबुती हे ईरिट्रियाला लागूनच असलेलं स्वतंत्र बंदर किंवा एक शहरीय राष्ट्र आहे. इसू आफवर्कीने जिबुती आणि ईरिट्रियाच्या दरम्यान असलेल्या एका छोट्या टेकडीवरून सीमावाद उकरून काढलेला आहे.
 
 
 
 
ISU
 
 
त्याचं खरं नाव आहे इसायचा, पण लोक त्याला प्रेमाने ‘इसू’ म्हणतात. हे अगदी कोणत्याही भारतीय भाषेसारखंच झालं नाही का? राम, कृष्ण किंवा विश्वनाथ नाव असावं नि लोकांनी प्रेमाने रामू, किशू किंवा विशू म्हणावं, अगदी तसंच भासतं. पण, हा इसू हबशी आहे, चांगला पाऊणशे वयमान ओलांडलेला आहे आणि निर्घृण हुकूमशहा आहे. सोबतच्या चित्रात पाहा. इतकं छान हसणार्‍या माणसाने आत्तापर्यंत काही लाख माणसं ठार केली आहेत. उत्तर कोरियाचा मार्शल किम जाँग उन हा हुकूमशहा कसा गुटगुटीत, गलछबू दिसतो. याने आत्तापर्यंत कित्येक लाख माणसं ठार मारली, असं त्याच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही. अगदी तोच नमुना इसायजा आफवर्की उर्फ हसू याचा आहे. त्याचा देश ईरिट्रिया, याला मुळी ‘आफ्रिका खंडातला उत्तर कोरिया’च म्हणतात. १९६१ ते १९९३ असं ३० वर्षांहून अधिक काळ तिथे सशस्त्र युद्धच चालू होतं. पहिल्यांदा इंग्रजांशी, मग इथियोपियाशी आणि विविध टोळ्यांची आपसातली यादवी. १९९३ साली इसायजा आफवर्की सत्तारूढ झाला, म्हणजे आता त्याच्या सत्तेला ३० वर्षं होत आली. तीन दशकांच्या या कालखंडात इसायजाने ईरिट्रिया या आपल्या देशासाठी, तिथल्या सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी, विकासासाठी काय केलं? काहीही नाही आणि ज्यांनी असा प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवली त्यांचं काय झालं? काही जणांची जन्मठेपेवर रवानगी झाली आणि बहुसंख्य जण कायमचे अदृष्य झाले. ते जीवंत आहेत किंवा नाहीत, याबद्दल कुणीही काहीही सांगू शकत नाही. भारताच्या पश्चिम दिशेला असणारा अरबी समुद्र किंवा पश्चिम समुद्र किंवा रत्नाकर ओलांडला की, एक फार मोठा खंड लागतो. प्राचीन दर्यावर्दींनी त्याचं नाव ठेवलं ‘आफ्रिका’. तेच आजही रुढ आहे. मात्र, प्राचीन हिंदू दर्यावर्दी त्याला म्हणत ‘शाल्मलीद्वीप.’
 
अरबी समुद्राचा एक फाटा ‘तांबडा समुद्र’ या नावाने अरेबियन द्वीपकल्प आणि आफ्रिका खंड यांच्यामधून घुसलेला आहे, शतकानुशतकं युरोप, आफ्रिका आणि आशिया या खंडांच्या अत्यंत गजबजलेल्या सामुद्रिक व्यापारी मार्गांपैकी तो एक आहे. १७व्या शतकात युरोपीय सत्ताधार्‍यांनी या मार्गावर आपलं वर्चस्व राखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. इंग्रजांनी अरेबियन किनारपट्टीवरचं ‘अदन’ हे आर मोक्याचं बंदर आपल्या ताब्यात ठेवून तिथे मोठा किल्ला बांधला, हेच ते ‘एडन बंदर.’ याला उत्तर म्हणून समोरच्या आफ्रिकेच्या किनार्‍यावर फ्रेचांनी ‘जिबुती’ हे बंदर ताब्यात घेऊन तिथे स्वतःचंमोठं नाविक ठाणं उभारलं. १८१५ मध्ये इंग्रजांनी नेपोलियनचा निर्णायक पराभव केला. त्यामुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यातील साम्राज्यस्पर्धा हळूहळू संपुष्टात येऊन उलट सहकार्याचं नवीन पर्व सुरू झालं. म्हणजे दोन्ही राष्ट्र परस्पर सहकार्याने आशिया-आफ्रिकेतल्या देशांना लुटू लागली. १९२२ नंतर यात इटली या देशाची भर पडली. इटलीत सत्तारुढ झालेला ‘फॅसिस्ट’ पक्षाचा नेता बेनिटो मुसोलिनी याला इटलीच्या म्हणजेच प्राचीन रोमन साम्राज्याच्या पुनरुत्थानाची स्वप्नं पडू लागली. त्याने आफ्रिकेत साम्राज्य विस्तार चालू करून आजच्या सोमालिया, इथियोपिया, ईरिट्रिया, लीबिया इत्यादी देशांचा खूप मोठा प्रदेश जिंकला. तोपर्यंत इटली देशाला कुणीही लष्करीदृष्ट्या हिशोबातही धरलेलं नव्हतं. अशा इटलीने लष्करी बळावर आफ्रिका खंडातला बराच मोठा भूभाग चक्क जिंकला म्हटल्यावर इटलीच्या बळाची नोंद घेतली जाऊ लागली.
 
तांबडा समुद्र हा पूर्वापार व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मार्ग होताच. १८५७ साली फर्डिनंड-द-लेसेप्स या फ्रेंच अभियंत्याने तांबड्या समुद्राला थेट भूमध्य समुद्राशी जोडणारा सुवेझ कालवा बांधायला सुरुवात केली. ११ वर्षांनंतर १८६९ साली सुवेझ कालव्यातून रितसर जहाज वाहतूक सूरू झाली. ही खरोखरच फक्त मोठी क्रांती होती. युरोप आणि भारत यांच्यातील अंतर सुमारे नऊ हजार किमीने कमी झालं. म्हणजेच आता एडन, जिबुती आणी एकंदरच तांबडा समुद्र नि त्याच्या दोन्ही काठांवरील भूप्रदेशाचं महत्त्व आणखीच वाढलं. सोमालिया, इथियोपिया, ईरिट्रिया,सुदान आणि इजिप्त हाच तो सगळा प्रदेश. प्राचीन ग्रीक त्याला म्हणत ‘न्यूबिया’ आणि प्राचीन हिंदू म्हणत ‘कुशाद्वीप’ म्हणजेच आजच्या ईशान्य आफ्रिकेचा प्रदेश. अरब प्रदेशाला म्हणत ‘हबश’ म्हणून तिथले रहिवासी ते ‘हबशी.’ इसवी सनाच्या सुमारे पाचव्या शतकात हबशी प्रथम ख्रिश्चन झाले. मात्र, त्यांचा पंथ कॅथलिक नाही, प्रोटेस्टंट नाही किंवा पूर्व युरोपीय देशांप्रमाणे ग्रीक ऑर्थोडॉक्सहीनाही, तर ते इथियोपियन ऑर्थोडॉक्सही नाही. हे मुद्दाम अशासाठी सांगायचं की, आपल्याकडेच लबाड पाद्री आणि लबाड निधर्मी मारे नाकं फुगवून-फुगवून सांगत असतात की, येशूच्या धर्मात अजिबात विषमता नाही. सगळे समान आहेत. प्रत्यक्षात वर दिलेल्या सगळ्या पंथांचं असं म्हणणं असतं की, येशूच्या शिकवणुकीचा खरा अर्थ फक्त आम्हालाच समजलाय. आमचा पंथ, आमचा मठ सर्वात जुना. मग ते एकमेकांच्या मठांत जाऊन प्रार्थना करत नाहीत. एकमेकांच्या मुली देत-घेत नाहीत. एकमेकांच्या कब्रस्तानात मृतांना दफनसुद्धा करू देत नाहीत. जय समता!
 
असो. तर दुसर्‍या महायुद्धात बेनिटो मुसोलिनी पराभूत झाला आणि ठार झाला. धूर्त इंग्रजांनी इटलीच्या साम्राज्यातला इथियोपिया आपल्या हाताखाली घातला. पण, आता काळ बदलला होता. साम्राज्य वाढवणं, टिकवणं यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ कोणत्याच युरोपीय देशाकडे राहिलं नव्हतं. परिणामी, आशिया आणि आफ्रिकेतले असंख्य देश भराभर स्वतंत्र झाले. सर्व आफ्रिकन देशाचं वैशिष्ट्य म्हणजे, तिथे विविध टोळ्यांची छोटी-मोठी राज्यं होती. या टोळ्यांच्या भाषा वेगवेगळ्या होत्या. कुठे त्यांच्यात ख्रिश्चन धर्माचं प्राबल्य होतं, तर कुठे मुसलमान धर्माचं, शिवाय त्यांच्यात अगदी शतकानुशतकांची भांडणं होती. युरोपीय राष्ट्रांनी म्हणजे मुख्यत: इंग्रजांनी आणि फ्रेंचांनी या अंतर्गत यादवीचा फायदा घेत अप्रत्यक्षरित्या आपली साम्राज्यं टिकवून धरली. इंग्रजांनी इथियोपियाच्या एका बलवान टोळीशी मैत्रीचा करार करून आपलं तिथलं अप्रत्यक्ष साम्राज्य १९७४ सालापर्यंत टिकवून धरलं. १९७४ साली सोव्हिएत रशियाच्या पाठिंब्याने इथियोपियन लष्करातल्या एका गटाने बंड पुकारून राजे हेले सिलासी यांचं ब्रिटनच्या पाठबळावर चाललेलं राज्य संपवलं. ईरिट्रिया हा इथियोपिया देशाचाच तांबड्या समुद्राच्या किनारपट्टीवरचा भाग. तिथल्या नऊ टोळ्यांपैकी ‘टिग्रिन्या’ ही टोळी सर्वात प्रबळ होती. ईरिट्रियाच्या एकंदर लोकसंख्येपैकी ५५ टक्के लोक या टोळीचे आहेत. धर्माने ते ख्रिश्चन आहेत. १९६१ सालापासून त्यांनी ब्रिटन आणि इथियोपियाविरूद्ध स्वतंत्र ईरिट्रियासाठी बंड पुकारलं. १९६६-६७ सालापासून इसायजा आफवर्की बंडखोरांचा एक महत्त्वाचा नेता होता.
 
आता आपल्याला प्रश्न पडतो की, या बंडखोरांना शस्त्रास्त्रं, अन्य सामग्री, पैसे हे सगळं कोण पुरवतं? आणि का पुरवतं? पुरवठा करणार्‍यांचा त्यात काय फायदा असतो? तर या प्रश्नांच्या उत्तरांसाठी ईरिट्रिया देशाचं स्थान पाहा. तांबड्या समुद्राच्या दक्षिण काठावर जिबुती या आंतरराष्ट्रीय बंदराला लागूनच ईरिट्रिया देश आहे. म्हणजेच जगातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या व्यापारी मार्गावरच ईरिट्रिया आहे. शिवाय तो ख्रिश्चन देश आहे. त्यामुळे ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इजिप्त, इस्रायल यांच्याप्रमाणेच सौदी अरेबिया, येमेन, ओमान या अरब देशांनाही ईरिट्रियाशी चांगले संबंध ठेवण्याची गरज आहे. आता कोणताही देश एखाद्या देशाशी संबंध ठेवणार म्हणजेच तिथल्या बलवान सत्ताधीशाशीच ठेवणार. तो बलवान सत्ताधीश आपल्या देशातला हुकूमशहा आहे की, लोकनियुक्त नेता आहे, हे दुसरे देश कशाला बघतील? उदा. ब्रिटिश ‘ईस्ट इंडिया कंपनी’ भारताशी व्यापार करायला आली; तेव्हा कंपनीचा वकील आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा वगैरेंकडे न जाता मुघल पातशहा जहांगीर याच्या दरबारात गेला. कारण, मुघल हेच तेव्हा सर्वात प्रबळ होते.
 
तर याच न्यायाने सर्व पाश्चिमात्य राष्ट्र आणि अरब देशसुद्धा १९९३ पासून ईरिट्रियाचा सर्वसत्ताधीश असलेल्या इसायजा उर्फ इसू आफवर्कीशी उत्तम संबंध ठेवून आहेत. इसूच्या राज्यात १८ वर्षांवरील सर्व तरुण-तरुणींना लष्करी सेवा सक्तीची आहे. या तरुणांना रस्ते बांधणे, लष्करी ठाण्यांना अधिकाधिक मजबूत करण्यासाठी खंदक बांधणे वगैरे शारीरिक कष्टांची कामे करावीच लागतात. इसू खुद्द आपल्या देशात अत्यंत हडेलहप्पीपणे कारभार करतोच, पण शेजारी देशांमध्येही तो लुडबूड करीत असतो. इथियोपियामध्ये सध्या पंतप्रधान अबीय अहंमद यांचे राज्य त्यापैकी चालू आहे. इथियोपियातही ११ वेगवेगळ्या टोळ्या आहेत. त्यापैकी अबीय अहंमद यांच्या विरोधातल्या टोळीला उचकवा, हत्यारे वगैरे पुरवा इत्यादी उद्योग इसू आनंदाने करीत असतो. पाकिस्तानचे ग्वादार हे बंदर विकसित करून त्याद्वारे अरबी समुद्रात पाय रोवण्याचे चीनचे प्रयत्न चाललेत. तसंच जिबुती हे बंदरही आणखी विकसित करून तांबड्या समुद्राद्वारे सुवेझ मार्गावर आपलंही नियंत्रण ठेवण्याचे चीनचे प्रयत्न चाललेत. जिबुती हे ईरिट्रियाला लागूनच असलेलं स्वतंत्र बंदर किंवा एक शहरीय राष्ट्र आहे. इसू आफवर्कीने जिबुती आणि ईरिट्रियाच्या दरम्यान असलेल्या एका छोट्या टेकडीवरून सीमावाद उकरून काढलेला आहे. आता एवढं सगळं झाल्यावर संयुक्त राष्ट्र संघटनेने म्हणजेच अमेरिकेने ईरिट्रियाशी व्यापार बंदी करणं आणि इसू आफवर्कीच्या विरोधकांना चिथावून त्याची राजवट उलथवण्याचे प्रयत्न करणं इत्यादी दरोबस्त चालू आहे. आता इसूचा गद्दाफी होतो की, बहार आसद होतो, हे येणारा काळच ठरवेल.