सावध ऐका पुढल्या हाका!

    दिनांक : 11-Jun-2022
Total Views |
नुपूर शर्मांच्या निमित्ताने भारताला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा प्रयत्न कसा झाला, हे समजून घेणे आवश्यक आहे. देश एक महत्त्वाची शक्ती म्हणून आकाराला येत आहे. हा प्रवास समजून घेतला पाहिजे.
 
 
 
sharma
 
 
 
 
नुपूर शर्मा आणि त्यांनी प्रेषित मोहम्मदांविषयी केलेल्या विधानांमुळे उडालेली राळ अद्याप बसण्याची चिन्हे नाहीत. परदेशात बर्‍यापैकी बोंबाबोंब झाल्यानंतर आता देशी मुसलमानांनाही जाग आली आहे. हे वादळ तसे थांबणार नाही. त्याचे खरे कारण निराळे आहे. वर वर पाहाता हा सगळा प्रकार नैसर्गिक वाटत असला किंवा नुपूर शर्मांच्या विधानांवरची प्रतिक्रिया वाटत असली तरी ते तसे नाही. याआधी असे काहीही झाले की, रस्त्यावर उतरून हिंसाचार माजवून हिंदूंचे शिरकाण करण्याचे प्रयोग धर्मांध मुसलमान अवलंबित होते. गेल्या काही वर्षांत याला आळा बसला आहे. भारताच्या विरोधात या सगळ्या इस्लामी जगताने एकवटण्याचे जे काही प्रयोग चालू आहेत, त्याची एक लहानशी झलक आपल्याला पाहायला मिळाली. हिंसा, लैंगिक अत्याचार हा आक्रमकांचा इतिहास नाकारता येत नाही. धर्म आणि सत्ता या हातात हात घालूनच चालतात. सेमेटिक धर्म आणि सत्ता यांच्यातील वर्चस्वाची चढाओढ हाच इस्लामी किंवा ख्रिस्ती जगताचा इतिहास राहिला आहे. धर्माला राजकारणाची इतकी मोठी झालर असते, हे हिंदूंना कळत नाही, याचे कारण हिंदू धर्माचा असा स्वभाव नाही. आपल्याकडे देवदेवतांची चेष्टाही सहजपणे होऊ शकते. परमेश्वराशी अभंगातून भांडणारे संत हे केवळ हिंदूंचेच विलोभनीय दृष्य असू शकते, अन्य ठिकाणी तो केवळ अचूक आहे, त्याला मर्त्य मानवाचे नियम लागू शकत नाही. नुपूर शर्मांच्या निमित्ताने आता देशी धर्मांधही रस्त्यावर उतरले आहेत. मागे कुणीतरी प्रेषिताचे चित्र काढले म्हणून अशीच दंगल महाराष्ट्रात भडकली होती. त्यात धर्माधांनी मुंबईतील अमर जवान ज्योती लाथाडली. महिला पोलिसांवर हातही टाकला. आता काय काय घडते ते पाहावे लागेल. महाराष्ट्रात आता तर सेक्युलर सरकार असल्याने यावर आपण फारसे काही न बोललेलेच बरे!
 
नुपूर शर्मांची विधाने जागतिक पातळीवर नेऊन हा संपूर्ण खेळ कसा खेळला गेला, त्याची माहिती घेणे जरूरीचे आहे. कारण, पुढच्या काळातल्या लढाया या प्रत्यक्ष होण्यापेक्षा अशाच होणार आहेत. धर्म आणि सत्ता हे गणित या आधीच विषद करण्याचे कारण तेच आहे. इस्लामी देशात जे काही घडते ते पाहिले की, धर्म, धर्माच्या आधारावर मानवी जीवनात रुजणारी मूल्ये, या प्रक्रियेचा परस्परांशी काय संबंध आहे, असाच प्रश्न पडतो. मात्र, पैगंबरांवर केलेली विधाने एकदम राजकीय विवादाचे कारण बनता, त्याचे कारण पुन्हा धर्मच असतो. कमालीच्या एकाधिकारशाहीने चाललेल्या या इस्लामी सत्तांमध्ये घरातील भाऊबंद, निराळ्या पक्षातले धर्मबंधू यांच्यात सतत चढाओढ चालू असते. धार्मिक बाबींचा अवमान हा लगेच अवमानाचा मुद्दा होऊन बसतो. धर्माच्या नावाखाली चेकाळणारे, तारतम्य सोडणारे गट नियंत्रणात ठेवणे कधीही सोपे असते. त्यासाठी फारसे काही करावे लागत नाही. अशांचा गट मोठा असतो किंवा तो धर्माचे अधिष्ठान असल्याचा आव आणल्यामुळे प्रभावी तरी असतो. मग असे काही घडले की, सत्तेत असलेल्यांना फारसा पर्याय उरत नाही. त्यामुळे मग सगळ्यांचेच सूर असे दिसतात. मालदिव वगैरे सारख्या देशांत थोडा अपवाद घडला. नुपूर शर्मांवर केलेल्या कारवाईवर त्यांनी समाधानही व्यक्त केले व एका व्यक्तीचे असे वक्तव्य म्हणजे समस्त भारतीयांची भूमिका असे आम्ही मानत नाही, अशी सम्यक भूमिकाही घेतली. भारताच्या स्थानामुळे आणि भारतीय परराष्ट्र सेवेतल्या मुत्सद्यांमुळे हे शक्य झाले, हे मान्य करायला हवे. सुरुवातीला आक्रमक भूमिका घेतलेल्या सगळ्याच देशांनी हळूहळू आता मालदिवप्रमाणेच भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे.
 
परदेशात हे सत्र थांबत असताना देशी धर्मांधांना मात्र चेव येऊ लागला आहे. स्वत:ला ‘सेक्युलर’ म्हणून पेश करणार्‍या नसरूद्दीन शाहसारख्या नटांची एकामागोमाग एक येणारी विधाने पाहावी म्हणजे हे लोक सेक्युलर बुरख्याखालचे मुसलमानच असतात, याची खात्री पटते. आता या देशात ज्या हिंसक प्रतिक्रिया उमटत आहेत, त्यासाठी यांनाच जबाबदार का धरू नये? या सगळ्याच्याबाबत हिंदूंच्या देवीदेवतांची टवाळी करण्याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत, अशा बाबतीत अनेकांनी पुढाकार घ्यायला सुरुवात केली आहे. तक्रारीही दाखल केल्या जात आहेत. लोक न्यायालयाचे दरवाजे ठोकायलाही मागे पुढे पाहाणार नाही. ही लढाई सनदशीरमार्गाची आहे व ती तशीच लढावी लागेल. रामजन्मभूमीच्या सर्वेक्षणासाठी आणि नंतर त्याचा अहवाल पाहाण्यासाठी हिदूंना जितकी प्रतीक्षा करावी लागली, तितकी प्रतीक्षा ज्ञानवापीसाठी करावी लागली नाही. हेच या देशाचे आजचे वातावरण आहे. हा सारा घटनाक्रम सरसंघचालकांच्या भाषणानंतर सुरू झाला आहे. एका अर्थाने त्यांनी जे सांगितले ती धोक्याची घंटाच होती. मात्र, ती कोणीही गांभीर्याने घेतली नाही. भारत सशक्त होण्याच्या मार्गावर आहे. स्वातंत्र्य सार्थक करायचे असेल, तर त्याला शक्तीचा आधार लागतो, अशा आशयाचे एक गीत आहे. चीन उघूर मुसलमानांचे काय करतो, हे जगजाहीर आहे. नसरुद्दीन शाहपासून सौदीच्या राजपुत्रापर्यंत कुणीही त्याबाबत एक चकार शब्द काढत नाही. असे का, हे जर आपल्याला कळले, तर देश म्हणून पुढचा प्रवास अधिक गतीने होईल.