नाणं गिळणार्‍या दूरध्वनी यंत्राला निरोप

    दिनांक : 11-Jun-2022
Total Views |
परवाच्या २३ मे या दिवशी अमेरिकेची आर्थिक राजधानी असणार्‍या न्यूयॉर्क शहरातला शेवटचा टेलिफोन बूथ हलवण्यात आला. अमेरिका प्रत्येक गोष्टीला स्वत:चा असा वेगळा शब्द वापरते, तसं कोपर्‍यावरच्या या नाणं टाकून वापरायच्या फोनला त्यांनी नाव दिलं होतं ‘पे फोन.’ नाणं टाका आणि डायल फिरवा किंवा आकड्यांची बटणं दाबा.
 
 
 
yantra
 
 
 
 
खलनायक शाकाल याच्यासमोरचा दूरध्वनी खणखणतो. समोरून शाकालचा जुना सहकारी जॅक बोलत असतो. शाकालच्या चुकीमुळे जॅकला १५ वर्षं तुरुंगात जावं लागलेलं असतं. आता सुटून आल्यावर जॅकला त्याची भरपाई म्हणून १५ लाख रुपये हवे असतात. शाकाल कमालीचा हुशार असतो. जॅक बोलत असताना मागून लोकल रेल्वे गाडी गेल्याचा आवाज त्याचे कान अचूक टिपतात.
 
फोन ठेवल्याबरोबर तो आपल्या तमाम गुंडांना कामाला लावतो. ‘’संपूर्ण मुंबई शहरात रेल्वे लाईनच्या अगदी जवळ असलेली सगळी टेलिफोन बूथ शोधा.” दुसर्‍या दिवशी सकाळी जेव्हा जॅक शाकालला फोन करतो, तेव्हा शाकाल त्याला सांगतो, “जरा मागे वळून बघ मृत्यूचा दूत तुझ्या दारात उभा आहे.” टेलिफोन बूथच्या दारात उभा असलेला शाकालचा गुंड जॅकच्या पोटात सुरा खुपसतो.
 
१९७३ साली आलेल्या निर्माता-दिग्दर्शक नाझिर हुसेन यांच्या ‘यादों की बारात’ या चित्रपटातलं हे दृष्य आहे. या चित्रपटाने हिंसा, कामुकता, सूडाचा थरार आणि धमाल संगीत यांचा एक नवा पायंडा पाडला. इतकी हिंसा आणि इतकी कामुकता हिंदी पडद्याने प्रथमच पाहिली. असो. आपला विषय आहे टेलिफोन बूथबद्दल. परवाच्या २३ मे या दिवशी अमेरिकेची आर्थिक राजधानी असणार्‍या न्यूयॉर्क शहरातला शेवटचा टेलिफोन बूथ हलवण्यात आला. अमेरिका प्रत्येक गोष्टीला स्वत:चा असा वेगळा शब्द वापरते, तसं कोपर्‍यावरच्या या नाणं टाकून वापरायच्या फोनला त्यांनी नाव दिलं होतं ‘पे फोन.’ नाणं टाका आणि डायल फिरवा किंवा आकड्यांची बटणं दाबा.
 
अमेरिकेसारख्या विज्ञान-तंत्रज्ञानात जगभरात सर्वांच्या पुढे असणार्‍या देशात आणि तेदेखील न्यूयॉर्कसारख्या शहरात कुठच्या तरी रस्त्यावर अजूनही २०२२ साली सुद्धा टेलिफोन बूथ होता, हे ऐकून वाचूनही आपल्याला आश्चर्य वाटेल. पण, न्यूयॉर्क महापालिकेने एक ‘अँटिक’ वस्तू म्हणूनच तो बूथ राखला होता. विशेष म्हणजे, त्या बूथमधले तीनही फोन्स व्यवस्थित चालू होते. आता तो बूथ टेलिफोन कंपनीच्या संग्रहालयात ठेवण्यात येईल आणि तो कसं काम करत होता, याची माहिती नव्या पिढीला व्हावी म्हणून त्यांची सगळी माहिती व्यवस्थित लिहून ठेवली जाईल.
 
यानिमित्ताने अनेक लेखक-पत्रकारांनी अमेरिकेत टेलिफोन केव्हापासून सुरू झाला, याचा सगळा इतिहास वाचकांसमोर मांडला आहे. अलेक्झांडर ग्रॅहम बेल हा मूळचा स्कॉटिश संशोधक. पुढे त्याचं संपूर्ण कुटुंब कॅनडामध्ये स्थायिक झालं. बेलचं संशोधकीय जीवन विलक्षण आहे. भाषाशास्त्र, शब्दांचे उच्चार, वक्तृत्व, ध्वनिशास्त्र अशा गोष्टींचा त्याचा फार बारकाईने अभ्यास होता. त्याचे वडील मेलव्हिल बेल आणि तो स्वत: भरगच्च सभेसमोर या शास्त्रांशी संबंधित अनेक प्रात्यक्षिकं करून दाखवत. वडील मंचाच्या एका टोकाला बसून वेगवेगळ्या भाषेतले शब्द बोलत. ग्रॅहम त्यांच्या नुसत्या ओठांच्या हालचालीवरून तो शब्द अचूक उच्चारून दाखवत असे. विशेष म्हणजे यात त्याला गंधही नसलेला संस्कृत भाषेतले शब्दसुद्धा असतं.
दि. १० मार्च, १८७६ या दिवशी ग्रॅहम बेल अमेरिकेतल्या बोस्टन शहरातल्या आपल्या प्रयोग कक्षातून बाजूच्या कक्षात असलेल्या टॉमस वाटसन या आपल्या साहाय्यकाशी यंत्राद्वारे बोलला. आधुनिक जगातलं हे पहिलं दूरध्वनी संभाषण होय. आपल्याकडचा अनुभव साधारणपणे असा असतो की, जे विद्यार्थी भाषांमध्ये हुषार असतात, ते गणित, विज्ञान, तंत्रज्ञान यांत सामान्य असतात आणि यांत्रिक-तांत्रिक चमक दाखवणारे विद्यार्थी त्यातून आर्थिक लाभ घेण्यात अपयशी ठरतात. ग्रॅहम बेल भाषा, गणित, विज्ञान, तंत्रज्ञान यंत्र-तंत्र सर्वच बाबतीत कुशल होता. त्याने १८७७ मध्ये लगेच दोन भागीदार बरोबर घेऊन ‘बेल टेलिफोन’ कंपनी काढली. १८८२ मध्ये त्याने अमेरिकन नागरिकत्व स्विकारलं. १८८६ मध्ये त्याच्या कंपनीचे एकट्या अमेरिकेतच १ लाख, ५० हजार ग्राहक होते.
 
अफाट संपत्ती ग्रॅहम बेलकडे चालत आली. वास्तविक आता त्याने चैनीत आयुष्य घालवायला हरकत नव्हती. पण, हा पठ्ठ्या तसं न करता जनुकशास्त्र-जेनेटिक्स आणि हेरिडेटरी-अनुवंशशास्त्र यांचा अभ्यास करू लागला.
 
या सगळ्या घटनाक्रमात ग्रॅहम बेल सामान्य नागरिकाला विसरलेला नव्हता. सामान्य नागरिकालादेखील टेलिफोन सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. हा परमार्थ आणि नाणं टाकून फोन करण्याची ती सुविधा कंपनीला भरभरून नाणी देणार आहे, हा स्वार्थ, अशा दोन्ही हिशोबाने न्यूयॉर्कपासून जवळच असलेला हार्टफर्ड शहरात पहिला ‘पे फोन’ १८८९ साली बसवण्यात आला. साधारण १९०० साली संभाषण करणार्‍याला वार्‍या-पावसापासून संरक्षण मिळावं म्हणून लाकडी बूथ बनवण्यात आलं. पुढच्या काळात टेलिफोन यंत्र आणि हे बूथ यांच्यात अनेक चांगले बदल होेत गेले. सामाजिकदृष्ट्या असंख्य कथा, कादंबर्‍या, नाटक, चित्रपट यांच्यातून फोनचं यंत्र आणि काचेची शोभिवंत पॅनल्स बसवलेलं ते लाकडी बूथ यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. १९५४ सालचा रहस्यसम्राट आल्फ्रेड हिचकॉकचा ‘डायल एम फॉर मर्डर’ या चित्रपटात फोन आणि बूथ या दोन्हींचं महत्त्व आहे.
 
लेखाच्या सुरुवातीला दिलेलं ‘यादों की बारात’ चित्रपटातलं दृष्य पटकथालेखक सलीम जावेद यांनी अर्थातच एका इंग्रजी चित्रपटावरून उचललेलं आहे. सलीम जावेदचं वैशिष्ट्य हे की, ते आपल्या उचलेगिरीचं भलतंच सफाईदार भारतीयकरण करत असतं. मूळ चित्रपटात खलनायक फोनमधून जवळच्या चर्चेच्या घंटेचे टोल ऐकतो नि त्यावरून तो फोन बूथ शोधून काढतो. सलीम जावेदने तिथे चर्चऐवजी मुंबईची लोकल गाडी आणली. त्या दृष्याचा परिणाम जबरदस्त होत असे. प्रेक्षक आ वासून बघत राहत असतं.
 
असो. तर असा हा १८७७ मध्ये अमेरिकेसह पाश्चिमात्य देशात अवतरलेला दूरध्वनी भारतात कधी आला? सन १८५४ मध्ये भारतात अगोदर टेलिग्राफ किंवा तार ही सुधारणा आली. १८८१ साली तत्कालीन भारत सरकारने म्हणजे इंग्रजांनी ‘ओरिएंटल टेलिफोन’ कंपनी या इंग्रजी कंपनीला भारतात टेलिफोन यंत्रणा उभारण्याची परवानगी दिली. कलकत्ता (आता कोलकाता) ही तेव्हा इंग्रज सरकारची राजधानी असल्यामुळे दि. २८ जानेवारी, १८८२ या दिवशी कलकत्यात फोन सुविधा सुरू झाली. पुढे त्याच वर्षी मुंबई मद्रास (आत्ता चेन्नई) या इंग्रजांच्या दृष्टीने महत्त्वाच्या शहरांमध्ये ती सुरू झाली.
 
हे झालं खासगी दूरध्वनीबाबत. इंग्रज अधिकारी, उद्योगपती अन्य श्रीमंत प्रतिष्ठित माणसं यांच्याकडे १८८२ साली फोन आले.सालोसालं ती संख्या वाढत गेली. पण, नाणं टाकून कुणीही फोन करू शकेल, असा पहिला सार्वजनिक टेलिफोन कधी सुरू झाला? आपल्याकडे कोणत्याही गोष्टीची नोंद (डॉक्युमेंटेशन) ठेवण्याबाबत अवघा आनंदी आनंद असल्यामुळे दुर्दैवाने याची कोणतीही नोंद नाही. आज ८०-९०च्या घरात असणारे वयोवृद्ध लोक डोक्याला खूप ताण देऊन असे सांगतात की, आमच्या घराजवळ असलेल्या टेलिफोन एक्सचेंजमध्ये सुमारे १९६०-६२-६५ या काळात केव्हातरी सार्वजनिक टेलिफोनचे बूथ लागले. दहा पैशांची दोन नाणी त्यात टाकावी लागत. मग ५० पैशांचे एक आणि नंतर एक रुपया असा दर वाढत गेला. साधारण १९९५ साली हे नाणं गिळणारी यंत्र जाऊन नाक्यानाक्यावर बूथ आले. त्यात माणूस बसलेला असायचा. त्याला प्रत्यक्ष पैसे देऊन फोन करता येत असे. बहुधा २०१० पासून हे बूथही बंद झाले. कारण, गावगन्ना प्रत्येकाच्या हातात भ्रमणध्वनी आला. आता कोण लेकाचा सार्वजनिक फोन वापरतोय!
 
न्यूयॉर्क महापालिकेचं वैशिष्ट्य हे की, त्यांनी आत्तापर्यंत तो ‘पे फोन’ बूथ सांभाळून ठेवला होता आणि आता हलवल्यावरही सगळ्या तारीखवार नोंदीसह तो कंपनीच्या संग्रहालयात जपून ठेवला जाणार आहे.
 
यातला आणखी एक योगायोगाचा भाग असा की, येत्या ऑगस्ट महिन्यात अलेक्झांडर गॅ्रहम बेलच्या मृत्यूला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. दि. २ ऑगस्ट, १९२२ या दिवशी बेल वयाच्या ७५व्या वर्षी मरण पावला. त्याचं दफन कॅनडामधल्या त्याच वडिलोपार्जित शेतीवाडीवर करण्यात आलं. त्याला श्रद्धांजली म्हणून त्याच्या दफनसमयी संपूर्ण उत्तर अमेरिकेतले सर्व टेलिफोन्स एक मिनिट बंद ठेवण्यात आले.मृत्यूच्या अगोदर तो मानवांमधील बहिरेपणाचा दोष आणि अनुवंशशास्त्र यांवर खूप चिंतन करीत होता. ते मूलभूत चिंतन मानलं जातं. आपल्याकडचे शास्त्रज्ञ सहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्यातच धन्यता मानतात!