पिंपळनेर : पिंपळनेर - सटाणा महामार्गावरून कत्तलीच्या उद्देशाने गाय व गुरे घेऊन जाणारे वाहन जाणार असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना प्राप्त झाली होती. सदर माहिती प्राप्त झाल्यानंतर तात्काळ सपोनि साळुंके यांनी एक पथक तयार करून पिंपळनेर ते सटाणा रोडवर शेलबारी घाटात सरकार हॉटेलच्या पुढे सापळा रचला व संशयित वाहनाचा शोध सुरू ठेवला.
या वेळेस तेथे पिकअप वाहन क्रमांक एम एच ०४ डी एस ९३९१ या वाहनाला थांबवून चौकशी केली असता ताडपत्रीच्या आत त्यात गुरे दिसून आले त्यामुळे अधिक तपासासाठी सदरची गाडी पिंपळनेर पोलिस स्टेशनला आणून तिची तपासणी केली असता सदर वाहनांमध्ये कत्तलीच्या उद्देशाने वाहून नेण्यासाठी ५ गोरे ३ गाय व १ काठीवाडी जातीचा बैल असे एकूण ९ गुरे आढळून आले. त्यांची अंदाजित किंमत १ लाख २१ हजार रुपये व पिकअप वाहनाची किंमत १ लाख ५० हजार रुपये असा एकूण २ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पो काँ. भूषण वाघ यांच्या फिर्यादीवरून ड्रायव्हर शोएब अहमद शकील (वय २७) रा. पवार वाडी फिरोजाबाद गल्ली, मालेगाव जिल्हा. नाशिक व अब्दुल अहमद खान (वय २०) व्यवसायिक क्लिनर, फार्मसी नगर, प्लॉट नंबर १८, मालेगाव जि. नाशिक या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पिंपळनेर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे, पोलीस नाईक सी. एस. सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सूर्यवंशी यांच्या पथकाने केले आहे.