पंजाब : गंभीर समस्यांच्या हिमनगाचे टोक

    दिनांक : 31-May-2022
Total Views |
 
आता जे काही पंजाबमध्ये सुरू आहे ते हिमनगाचे लहानसे टोक आहे. हा हिमनग एखाद्या समस्येचा नाही, तर त्याला अनेक आयाम आहेत. गुन्हेगारीचा प्रश्न दिसतो तितका सोपा नाही. एनकाउंटरसारखा असमर्थनीय मार्ग जरी पंजाब पोलिसांनी स्वीकारला तरी तिथली परिस्थिती आटोक्यात येऊ शकत नाही. त्याचे मुख्य कारण इथल्या गुन्हेगारी जगताचे बादशाह कुठेतरी कॅनडा वगैरे परदेशात जाऊन बसले आहेत.
 
 
 
kejariwal
 
 
 
उत्तर प्रदेशला तिथल्या समस्या आणि गुंतागुंतीचे सामाजिक, राजकीय प्रश्न पाहून ‘प्रश्न प्रदेश’ म्हटले जायचे. मात्र, तोच उत्तर प्रदेश गेल्या पाच-सहा वर्षांत योगींच्या नेतृत्वाखाली एक वेगळाच चेहरा घेऊन उभा राहतोय. आता बिकट प्रश्न आहे पंजाबचा. खलिस्तानी चळवळींशी झालेला प्रदीर्घ संघर्ष, अमली पदार्थांचा वाढता प्रभाव आणि त्यातून निर्माण झालेले राजकारणाचे गुन्हेगारीकरण, राज्य म्हणून संपूर्णपणे बिघडलेले अर्थकारण आणि या सगळ्यावर कळस म्हणजे आता ‘आप’सारख्या पक्षाच्या हातात आलेली सत्ता. पंजाबचा प्रश्न बिकटच होत जाणार यात शंका नाही. स्वत:ची काहीही विचारसरणी नसलेले पण गरिबांच्या कल्याणाच्या नावाखाली फुकट वाटून लोकांना आपल्या कह्यात घेणारे ‘आप’चे सरकार दिल्लीत चालले पण पंजाबात कसे चालणार. सध्या चाललेल्या घटनाक्रमामुळे तिथे वाजणारी धोक्याची घंटा लक्षात येण्यासारखी आहे. पंजाब सदैव अराजकाच्या स्थितीतच राहीले आहे फरक एवढाच की, ते अराजक कधी दृष्य स्वरुपात दिसणारे होते, तर कधी अमली पदार्थासारखेच हळूहळू तरुण पिढीला नशेच्या आहारी ओढणारे.
 
कायदा-सुव्यवस्था, अमली पदार्थांचा वाढता व्यापार, गुन्हेगारी, माफीया राज केवळ हाच यातला भाग नाही, तर कोलमडणारी अर्थव्यवस्था हेदेखील मोठे संकट आहे. कृषीप्रधान अर्थव्यवस्था असताना पंजाबसारखे राज्य सगळ्यात श्रीमंत समजले जाई. हरितक्रांतीची ही कृपा होती. हरियाणा, गुजरात, हिमाचल प्रदेश ही उत्तरेकडची तर कर्नाटक, तामिळनाडू, केरळ ही दक्षिणेकडची राज्येही आता पंजाबच्या पुढे निघून गेली आहेत.
 
वाजपेयी सरकारच्या काळात केंद्रात सत्तेत सहभागी असलेले अकाली दल त्यानंतर भ्रष्टाचाराच्या आणि घराणेशाहीच्या आरोपांमुळे सत्ताच्युत तर झालेच पण भाजपसोबत काडीमोड घेऊनही त्यांची बुडती नौका वाचू शकली नाही. या काळात देशभरातल्या अन्य राज्यात पायाभूत सुविधांचा भरपूर विकास झाला. अन्नधान्यासाठी आणि तत्सम गोष्टीसाठीचे पंजाबवरचे अंवलबित्व कमी झाले. देशभरातील अनेक राज्ये उद्योग व अन्य सेवा व्यवसाय आपल्या राज्यात रुजावे यासाठी प्रयत्न करीत होती. बंगळुरूने माहिती-तंत्रज्ञानात मोठी झेप घेतली. केरळ पर्यटनात पुढे आले. पंजाबच्या आसपासच्या राज्यांनी करात सुविधा देऊन मोठ्या व्यावसायिकांना आपल्याकडे वळवून घेतले. खुद्द पंजाबमधूनही उत्पादक मोठ्या प्रमाणात या राज्यात निघून गेले. हमीभावाचा अट्टहास आणि तो सरकारने दिलाच पाहिजे, असा दुराग्रह घेऊन पंजाबचा बहुसंख्य शेतकरी सुस्तच राहीला. कृषीच्या निराळ्या प्रयोगांचा वाराही त्यांनी पंजाबात येऊ दिला नाही. पर्यायाने आज शिक्षण मिळूनही बेरोजगार तरुणांची संख्या मोठी आहे. विकासाच्या गंगेपासून दूर राहिलेल्या वनवासी किंवा बिगरवनवासी तरुणांना नक्षलवादी गंडवतात तसेच इथे पंजाबी तरुणांच्या बाबतीत होते. त्यांना वाटते की, अमेरिका, कॅनडा याठिकाणी त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी मोठ्या आहेत. बापजाद्यांच्या शेतीयोग्य जमिनी विकण्याचे प्रमाणही यामुळे खूप वाढले आहे.
 
या सगळ्याचा परिणाम म्हणजे राज्य कर्जबाजारी आहे आणि राज्याच्या महसुलाचा खूप मोठा हिस्सा व्याज देण्यात जात आहे. ‘जनकल्याणकारी योजना’ राबविण्यासाठी आता सरकारकडे निधीची वानवा आहे. ‘आप’ स्टाईलची नौटंकी करून केजरीवाल यात लोकप्रियता मिळवू शकतात. पण, या प्रश्नांची उत्तरे ते कशी काढणार? या सगळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. स्वत:चे काही जमले नाही, तर उत्तर प्रदेशचा कित्ताही गिरविता येऊ शकतो. योगींचा भगवा वेश अथवा गुन्हेगारांना वचक बसविण्यासाठी बुलडोझरचा प्रतिकात्मक वापर या गोष्टी माध्यमांसाठी लोकप्रिय असल्या तरी त्यापलीकडे पायाभूत सुविधांचा डोंगर योगींनी केंद्राच्या साहाय्याने रचला आहे. त्याचा परिणाम म्हणून निवडणुकीच्या जय-पराजयाच्या पलीकडे उत्तर प्रदेश आकाराला येत आहे. आता मूळ मुद्दा येतो विद्यमान सरकारचा. जर ‘आप’ला नरेंद्र मोंदींचा द्वेष करायचा असेल, भाजपला शिव्या द्यायच्या असतील, आपल्या सगळ्या पापाचे खापर भाजपवरच फोडायचे असेल, तर मग तुम्ही सहकार्याची अपेक्षा कशी ठेवणार?
 
आता जे काही पंजाबमध्ये सुरू आहे ते हिमनगाचे लहानसे टोक आहे. हा हिमनग एखाद्या समस्येचा नाही, तर त्याला अनेक आयाम आहेत. गुन्हेगारीचा प्रश्न दिसतो तितका सोपा नाही. एनकाउंटरसारखा असमर्थनीय मार्ग जरी पंजाब पोलिसांनी स्वीकारला तरी तिथली परिस्थिती आटोक्यात येऊ शकत नाही. त्याचे मुख्य कारण इथल्या गुन्हेगारी जगताचे बादशाह कुठेतरी कॅनडा वगैरे परदेशात जाऊन बसले आहेत. सिद्धू मुसेवाला या गायकाच्या हत्येनंतर जे समोर येत आहे ते अधिकच गंभीर आहे. ब्रार नावाच्या एका गुन्हेगाराने कॅनडाहून या खुनाची जबाबदारी घेतली आहे व आपणच हे केले असल्याचा दावा केला आहे. दहशतीच्या जगतात आपले वजन वाढविण्यासाठी असे केले जाते. आपल्या भावाच्या हत्येत या गायकाचा हात होता. पंजाब पोलिसांनी याबाबत काहीच केले नाही त्यामुळे आपणच हा बदला घेतला, असे बिष्णोई बंधू म्हणतात. ‘आप’चे सरकार स्थापन झाल्यापासून ही सोळावी हत्या आहे.
 
पंजाब पोलिसांच्या राजकीय वापराबाबत भाजपने यापूर्वीच आपला आक्षेप नोंदविला आहे. दुसर्‍या बाजूला पंजाबच्या पोलीस महासंचालकांनी केंद्राकडे कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी निमलष्करी दलाची मागणी केली आहे. खलिस्तान्यांनी हिंदू मंदिरावर केलेल्या हल्ल्यापासून ते या खुनापर्यंत पंजाबचे राज्य म्हणून संतुलन बिघडतच चालले असल्याचे दिसते. संपूर्ण बहुमतात असलेले ‘आप’चे सरकार आता ही परिस्थिती कशी हाताळते ते पाहणे गरजेचे आहे. राहुल गांधींनी आपल्या विदेश दौर्‍यात राज्य विरुद्ध देश अशी मांडणी करून जे अकलेचे तारे तोडले आहेत ते पंजाबचे उदाहरण समोर ठेवून विचार केला, तर किती गंभीर आहे ते लक्षात येईल.