खेलो इंडिया स्पर्धेत यशस्वी खेळाडूंच्या पुरस्कार रकमेत वाढ

    दिनांक : 31-May-2022
Total Views |
पुणे : हरियाणा येथे होणाऱ्या चौथ्या 'खेलो इंडिया' स्पर्धेत यशस्वी खेळाडूंच्या पुरस्कार रकमेत वाढ करून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना ३ लाख, दुसऱ्या क्रमांकासाठी २ लाख आणि तिसऱ्या क्रमांकासाठी १ लाख रुपयांचा प्रोत्साहन पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी केली. बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडापीठ सुरू असलेल्या 'चौथी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा' सराव शिबिराला भेट दिल्यानंतर खेळाडूंशी संवाद साधताना ते बोलत होते.
 
 
khelo 
 
 
 
शासनाने खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथे खेलो इंडियातील यशस्वी खेळाडूंचा सत्कार केला होता असे क्रीडामंत्री केदार म्हणाले. यंदाही महाराष्ट्र संघ हा नक्कीच यशस्वी होईल आणि संपूर्ण देशाला कौतुक वाटेल असा खेळाडूंचा सन्मान केला जाईल. खेळाडूंनी उत्तमता, जिद्द आणि उद्दिष्टावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. खेळाच्या माध्यमातून समानता आणि क्षमता साधली जात असल्याने सामाजिकदृष्ट्याही क्रीडा विकास आवश्यक आहे. स्पर्धेसाठी सर्व खेळाडू समर्पित भावनेने आणि पूर्ण क्षमतेने सराव करीत आहेत. कोरोनाकाळात सर्व शक्य नसताना आपल्या कौशल्यात कमतरता येऊ दिले नाही. अत्यंत मध्यम वर्गातील कुटुंबातील असूनही पालकांनी त्यांच्यातील क्रीडाकौशल्य प्रतिकूल परिस्थितीतही जपले, ही बाब कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे, असे त्यांनी सांगितले.
 
हरियाणा येथे ३ ते १३ जुन २०२२ या कालावधीत चौथ्या खेलो इंडिया युवा स्पर्धेसाठी २१ क्रीडाप्रकारात महाराष्ट्राचे ३५५ खेळाडू पात्र ठरले आहे. त्यांचे सराव शिबीर बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडापीठ येथे २१ मे पासून स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी आयोजित हे शिबिर ३१ मे पर्यंत सुरू होते. या बालेवाडीतील सराव शिबिरानंतर १ ते ८ जून या कालावधीत हे सर्व संघ हरियाणाकडे रवाना होतील. पंचकुला येथे ४ जून रोजी स्पर्धेचे उदघाटन होणार असून १३ जून रोजी स्पर्धेची सांगता होणार आहे.