ही तर फक्त सुरुवात...

    दिनांक : 27-May-2022
Total Views |
आज यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा झाली, उद्या न्यायालयीन लढ्याद्वारे त्याला फाशी मिळावी म्हणूनही संघर्ष केला जाईल. त्यानंतर बिट्टा कराटेसह ज्यांनी ज्यांनी काश्मिरी हिंदूंवर अन्याय केला, त्या सर्वांना गजाआड पाठवण्याचे कामही केले जाईलच. पण, तरीही यासिन मलिकला झालेल्या शिक्षेने देशातल्याच तथाकथित बुद्धिजीवी, विचारवंत वर्गाची तगमग सुरू झालेली आहे.
 
yasin
 
 
दिल्लीतील विशेष ‘एनआयए’ न्यायालयाने बुधवारी ‘जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट’चा म्होरक्या, फुटीरतावादी दहशतवादी यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि दीर्घकाळानंतर काश्मिरी हिंदूंच्या न्यायाला सुरुवात झाली. यासिन मलिकला दहशतवादाला अर्थपुरवठा व देशाविरोधात युद्ध छेडण्याच्या गुन्ह्याखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावतानाच दहा लाखांचा दंडही ठोठावण्यात आला. त्यानंतर ‘हुर्रियत कॉन्फरन्स’ने यासिन मलिकच्या शिक्षेला विरोध करतानाच काश्मीर खोर्‍यात मलिकच्या समर्थकांनी धिंगाणा घालायला सुरुवात केली. आपल्या म्होरक्याने आयुष्यभर काय केले, त्याचा पुरावा त्यांनी आपल्या दगडफेक, हिंसाचाराच्या कृत्यांतून दिला. नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली आणि ते वठणीवर आल्याचे, पोलीस ठाण्यात कान पकडून उठाबशा मारतानाही दिसले. यासिन मलिकचे समर्थक काश्मीर खोर्‍यात धुडगूस घालत असतानाच पाकिस्ताननेही त्याला सुनावलेल्या शिक्षेचा निषेध केला.
 
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले की, “स्वातंत्र्याचा विचार कैद करू शकत नाही अन् यासिन मलिकला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा काश्मिरींच्या आत्मनिर्णयाच्या अधिकाराला गती देईल.” त्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार आदींनी एकामागोमाग आपणच दहशतवादाचे उद्गाते आणि निर्यातदार असल्याचे दाखवून देत मानवाधिकाराच्या नावाखाली यासिन मलिकला पाठिंबा दिला, त्याच्या शिक्षेला विरोध केला. यातून यासिन मलिक वा अन्य फुटीरतावादी, दहशतवाद्यांच्या पाठीशी पाकिस्तानच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. पाकिस्तानात सत्ता कोणाचीही असो, त्यांची नियत भारतात अराजक माजवण्याचीच असते. त्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने रसद पुरवठा केला जातो, तसा तो यासीन मलिकलाही केला गेला आणि म्हणूनच आज पाकिस्तानमधील सत्ताधारी यासिन मलिकला शिक्षा दिल्याच्या कारणावरुन रडारड करताना दिसतात. पण, यासिन मलिकला आताशी ‘एनआयए’ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासिन मलिकने केलेले गुन्हे जन्मठेपेच्या शिक्षेने पुसले जाणारे नाहीत, ते फाशीच्या शिक्षेनेही पुसले जाणार नाहीतच. तरीही त्याला जन्मठेपेऐवजी फाशीच मिळावी, अशीच समस्त काश्मिरी हिंदूंची आणि देशवासीयांची भावना आहे. तीही लवकरच न्यायालयीन लढाईद्वारे पूर्णत्वास जाईल.

 
यासिन मलिकने न्यायालयात बाजू मांडताना आपण गांधीवादी विचारांचे पालन करत १९९४ साली सशस्त्र दहशतवादाचा मार्ग सोडल्यानंतर शांततामय मार्गाने संघर्षाचे नेतृत्व केले, असे म्हटले. पण, न्यायालयाने त्याची बाजू मान्य केली नाही. कारण, यासिन मलिकच्या म्हणण्याप्रमाणे त्याने हिंसेचा मार्ग सोडला असला तरी त्याआधीच्या हिंसक कृत्यांबाबत त्याने कधीही दिलगिरी व्यक्त केली नाही वा माफी मागितली नाही. महत्त्वाचे म्हणजे, यासिन मलिकने आपण हिंसाचाराचा मार्ग सोडल्याचे म्हटल्यानंतर भारत सरकारनेही त्याच्यावर विश्वास ठेवला व त्याला सुधारणेची संधी दिली होती. पण, यासिन मलिकने त्याचीही मातीच केली आणि सरकारचा विश्वासघात करत राजकीय संघर्षाच्या आडून हिंसाचारासाठी निराळा मार्ग निवडला. काश्मिरींना देशाविरोधात चिथावणी देण्याचे, दहशतवादी कारवायांसाठी प्रोत्साहन देण्याचे काम सुरूच ठेवले. न्यायालयाने त्यावरच बोट ठेवून यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
 
१९८४ सालापासून जम्मू-काश्मीरमध्ये हिंसक कारवाया करणार्‍या यासिन मलिकने 90च्या दशकात काश्मिरी हिंदूंच्या हत्या, पलायनासाठी नंगानाच घातला. ‘रलिव, गलि, चलिव’ची नारेबाजी करणार्‍या धर्मांध मुस्लिमांना हिंदूंविरोधात भडकावण्यात यासिन मलिकची मुख्य भूमिका होती. त्यातून लाखो काश्मिरी हिंदूंची धर्माच्या आधारावर हत्या केली गेली, लाखो काश्मिरी हिंदू महिलांवर धर्माच्या आधारावर बलात्कार केले गेले, लाखो काश्मिरी हिंदूंना धर्माच्या आधारावर खोर्‍यातून पलायनासाठी अगतिक केले गेले. तरीही त्याविरोधात तत्कालीन दिल्लीश्वरांनी वा नंतरच्या काँग्रेसी राज्यकर्त्यांनी कारवाई केली नाही. यंदाच्या वर्षी ‘द काश्मीर फाईल्स’चित्रपटाने काश्मिरी हिंदूंवरील इस्लामी कट्टरपंथी अत्याचाराला वाचा फुटली. काश्मिरी हिंदूंच्या किंकाळ्या, आक्रोश प्रथमच व्यापक प्रमाणात देशासमोर अन् जगासमोर आला, निद्रीस्त हिंदू धर्मीयांना जाग आली. त्या पार्श्वभूमीवर यासिन मलिकला शिक्षा झाली व हिंदूंवरील अन्यायाचा बदला घेण्याचे एक वर्तुळ पूर्ण झाले. पण, ही फक्त सुरुवात आहे. आज यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा झाली, उद्या न्यायालयीन लढ्याद्वारे त्याला फाशी मिळावी म्हणूनही संघर्ष केला जाईल. त्यानंतर बिट्टा कराटेसह ज्यांनी ज्यांनी काश्मिरी हिंदूंवर अन्याय केला, त्या सर्वांना गजाआड पाठवण्याचे कामही केले जाईलच. पण, तरीही यासिन मलिकला झालेल्या शिक्षेने देशातल्याच तथाकथित बुद्धिजीवी, विचारवंत वर्गाची तगमग सुरू झालेली आहे.
 
मुख्याध्यापकाचा मुलगा वा अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला म्हणत दहशतवाद्यांचा बचाव करणार्‍यांपासून याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणार्‍यांपर्यंतच्या ढोंगबाजांचा यात समावेश आहे. हिंदूंचा विरोध करणारी आणि हिंसाचारी, अत्याचारी धर्मांध मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळणारी ही पिलावळ आहे. 90च्या दशकात काश्मीर खोर्‍यात लाखो हिंदूंवर संकट कोसळलेले असताना त्यांच्यासाठी कधीही या लोकांच्या तोंडातून शब्दही निघाला नाही. लाखो हिंदू जीवाच्या आकांताने पळापळ करत असताना यातल्या कोणालाही मानवाधिकाराची आठवण झाली नाही. पण, मुस्लिमांविरोधात जरा कुठे काही खुट्ट झाले तरी या टोळक्याचा तथाकथित मानवाधिकार उफाळून येतो. दहशतवाद्यांच्याही मानवाधिकाराचे, जीविताचे रक्षण करावे, अशी मागणी ते करू लागतात. आता यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने त्यांनी रुदाल्या गाणे साहजिकच. पण, यामुळे दहशतवादी कृत्ये करणार्‍या गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे थांबणार नाही. उलट एका यासिन मलिकला नव्हे, तर त्याच्या सार्‍याच साथीदारांना शिक्षा मिळावी म्हणूनच प्रयत्न सुरू होतील.