मंदिर जितके जुने, तितकीच मशीदही जुनी असल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी काशीतील ज्ञानवापी प्रकरणावर केले. मात्र, कितीही जुनी असली तरी ज्ञानवापी मशिदीचा डोलारा हिंदू मंदिराच्या हजारो वर्षांपूर्वीच्या भग्नावशेषावरच उभा असल्याचे सांगायला पवार विसरले. अर्थात, ते त्यांचे कामच. कारण, मशिदीची बाजू घेतली तरच शरद पवारांना मुस्लिमांची मते मिळणार अन् त्यांचे साडेतीन जिल्ह्यासाठीचे दाढीकुरवाळू राजकारण चालणार. पण, आपण हिंदूंनी मात्र ज्ञानवापी मशीद मंदिराच्या सांगाड्यावरच उभी असल्याचे कधीही विसरता कामा नये.
एकटी ज्ञानवापी मशीदच नव्हे, तर मथुरेतील ईदगाह मशिदीपासून मंगळुरुतील मलाली जुम्मा मशीद आणि पुण्यातील बडा शेख सल्ला-छोटा शेख सल्ला दर्ग्यासह देशभरातील हजारो मशिदी मंदिरांच्याच तोडलेल्या-फोडलेल्या मूर्ती, दगड, विटा, खांबांवर उभ्या आहेत अन् त्या जुन्या आहेत म्हणून त्यांच्या बांधकामाचा बेकायदेशीर प्रकार खपवून घ्यावा, असे शरद पवारांचे म्हणणे आहे. पण, तसे होणार नाही, हिंदूंचा आपल्या गमावलेल्या मंदिरांसाठीचा संघर्ष अनादी काळापासून सुरू आहे. त्यातले अयोध्येतील मंदिर पुन्हा मिळाले, बाकीची मंदिरे पाडून बांधलेल्या मशिदींना हटवण्यासाठीही हिंदूंचा लढा सुरूच राहील व त्या त्या ठिकाणी न्यायालयीन मार्गाने मंदिरेच बांधली जातील.
जगातल्या अनेक देशांवर परकीयांनी आक्रमण केले. त्यानंतर तिथल्या धर्मीयांची प्रार्थनास्थळे एकतर उद्ध्वस्त केली वा त्यांचे रुपांतर आपल्या धर्माच्या प्रार्थनास्थळात केले. पण, परकीयांची राजवट संपली आणि नंतर त्या त्या देशातल्या नेतृत्वाने आपापली प्रार्थनास्थळे पुन्हा उभी केली. ग्रीसमधील आर्टेनिस मंदिराचे रुपांतर ख्रिश्चन आक्रमकांनी चर्चमध्ये केले होते. पण, ख्रिश्चन आक्रमकांची सत्ता संपल्यानंतर ग्रीकांनी चर्चच्या खुणा मिटवून आर्टेनिसचे मंदिर पुनर्स्थापित केले. भारतावरही सुरुवातीला इस्लामी आक्रमकांनी आणि नंतर ब्रिटिशांनी राज्य केले. त्यानंतर १९४७ साली भारत स्वतंत्र झाला अन् त्याचवेळी खरे म्हणजे, देशातील मंदिरे पाडून बांधलेल्या मशिदींचे, चर्चेसचे ‘ऑडिट’ करून त्यांचे अस्तित्व संपवून तिथे पुन्हा मंदिरेच बांधायला हवी होती.
पण, देशात बाबर, अकबर अन् औरंगजेबाच्या औलादी जशा आता आहेत, तशा तेव्हाही होत्या. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांत हिंदूंना आपली मंदिरे पुन्हा मिळवताच आली नाहीत. १९९१ साली तर काँग्रेस सरकारने हिंदूंसह बौद्ध, जैन, शीखांच्या धर्मस्वातंत्र्यावर घाला घालणारा ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट’ आणून इस्लामी आक्रमकांच्या धर्मांधतेला कायद्याने संरक्षण दिले. कारण, त्यावेळी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलन ऐन भरात होते. हिंदू शक्ती एकवटलेली होती. पण, आज हिंदूंनी अयोध्येतील एका मंदिरासाठी आंदोलन सुरू केले, उद्या ते अन्यत्रच्या मंदिरे पाडून बांधलेल्या मशिदी हटवण्यासाठीही आंदोलन करतील आणि तिथेही सारीकडे मंदिरांचेच पुरावे सापडतील, याची जाणीव काँग्रेसला झाली.
विशेष म्हणजे हिंदू सनदशीर मार्गानेच आंदोलन करत होते, तरीही हिंदूंची आणखी मंदिरे मुक्त करण्याची मागणी पुढे येऊ नये, म्हणून काँग्रेसने बहुमताच्या जोरावर ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट’ आणला. आज त्याच ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट’ला आव्हान देण्यात येत आहे, हिंदू आपल्या न्याय आणि हक्कांची मागणी करत आहेत. पण त्यावर काँग्रेससह कोणीही विरोधक बोलत नाही. म्हणजेच मुस्लिमांच्या भावना जपण्यासाठी ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट’ आणणारे आजही हिंदूंच्या भावनांची मात्र अजिबात कदर करू इच्छित नाहीत, हेच यातून स्पष्ट होते. पण, आता हिंदू जनमानसच आपल्या श्रद्धास्थानांविषयी कमालीचे जागरुक झालेले आहे. गमावलेले सारे काही परत मिळवण्याच्या त्वेषाने हिंदू पुढे सरसावलेले आहेत.
९०च्या दशकात अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मुक्तीसाठी जशी एकी हिंदूंंनी दाखवली तशी एकी आता देशातील हजारो मंदिरांसाठी दाखवली जात आहे. पण, त्याचीच खंत शरद पवारांसारख्या मुस्लिमांचे अखंड लांगूलचालन करणार्या नेत्याला वाटते. इफ्तार पार्ट्या झोडल्याने खाल्ल्या मीठाला जागत त्यांना मशिदीचा पुळका येतो. आताचे काशीतील ज्ञानवापी प्रकरणावरील पवारांचे विधान त्याचाच परिणाम. पण, त्यातून आणखी एक बाब उघड होते. शरद पवार कधी पंतप्रधान होणार नव्हतेच अन् यापुढेही होणार नाहीत. पण, जर झालेच असते, तर औरंगजेबाचे भारताला हिरवा करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच ते कामाला लागले असते. तसे होऊ नये म्हणूनच नियतीने पवारांना कायम भावीच ठेवले.
हिंदू देवी-देवतांच्या अपमानाचे काम मंदिरे पाडून बांधलेल्या मशिदीत चालत असल्याचे नुकतेच समोर आले. ज्ञानवापी मशिदीत जिथे हात-पाय धुतले जायचे, जिथे आसपास शौचालय होते, त्या पाण्यातच शिवलिंग असल्याचे सर्वेक्षणादरम्यान स्पष्ट झाले. शरद पवारांच्या मते हिंदूंनी आपल्या आराध्य दैवतांची मुस्लिमांकडून क्षणाक्षणाला होणारी दुर्दशा गपगुमान सहन करावी. म्हणूनच ते मशिदीची बाजू घेताना दिसतात. पण, ज्यांचा ‘डीएनए’ हिंदू आहे, ते असे कधीही सहन करू शकणार नाही. तेच हिंदू आज काशिविश्वनाथाला दुरवस्थेतून बाहेर काढण्यासाठी, सन्मानाने प्रतिष्ठापित करण्यासाठी न्यायालयीन लढाई लढत आहेत. शरद पवारांनी वा त्यांच्यासारख्या आणखी कोणी त्याला विरोध केला तरी ती लढाई थांबणार नाही.
त्या आणखी कोणीमध्ये ‘एमआयएम’प्रमुख असदुद्दीन ओवेसींचा वरचा क्रमांक लागतो. बाबरी मशीद गमावली, पण ज्ञानवापी मशीद आम्ही गमावणार नाही, असे म्हणतानाही ते दिसतात. आता ज्ञानवापी प्रकरणाचा औरंगजेबाशी संबंध जोडण्यावरुन नाराज ओवेसींनी, मुघलांशी भारतातील मुस्लिमांचे कोणतेही नाते नाही, पण मुघल बादशहांच्या बायका कोण होत्या हे सांगा, असे म्हटले आहे. त्यांचा रोख मुघल बादशहांच्या बायका हिंदू होत्या याकडे होता. पण, मुघलांच्या बायकांचा इतिहास काढला, तर असदुद्दीन ओवेसींसारखे कितीतरी इस्लामी कट्टरपंथी मुघलांचेच विकृत वारस निघतील. म्हणूनच अकबरुद्दीन ओवेसी औरंगजेबाच्या थडग्यावर माथा टेकवण्यासाठी गेले. पुढचा मुद्दा म्हणजे, असदुद्दीन ओवेसींनी मुघलांच्या बायका कोण होत्या हा प्रश्न विचारला, त्यावर त्या मुघलांच्या बायका कशा झाल्या हे आधी सांगितले पाहिजे.
तलवारीच्या जोरावर धर्मांध शिकवणीनुसार उपभोगाच्या शेतीसाठी बायकांची पळवापळवी करण्याचाच इस्लामी आक्रमकांचा धंदा होता. ‘बात निकली हैं तो दूर तलक जाएगी’ आणि त्यात मुघल बादशहांच्या काळ्या करतुती उघड होत जातील. पण, यातून असदुद्दीन ओवेसींना हिंदूंचा मानभंग करतानाच आम्ही तुमच्या देशाचे, तुमच्या बायकांचे मालक होतो, हे सांगायचे आहे. ते जरी मुघलांशी आमचा संबंध नव्हता, असे म्हणत असले तरी औरंगजेबाशी संबंध असल्याचे त्यांच्याच भावाने आठवडाभरापूर्वी दाखवून दिलेले आहे. यातून ओवेसींना देशातील सामाजिक समरसतेची वीण तोडायची आहे, दोन धर्मात तेढ निर्माण करायची आहे, हिंदू-मुस्लिमांत दंगली भडकवायच्या आहेत, ‘तुम्ही मुघलांप्रमाणे हिंदूंच्या बायका करा,’ अशी मुस्लिमांना चिथावणी द्यायची आहे. हा ओवेसीरुपी भस्मासुर आहे, पण त्याचे नुकसान त्यांनाच सोसावे लागेल, हेही नक्की!