कडू कारले तुपात तळले तरी...

    दिनांक : 23-May-2022
Total Views |

असे म्हणतात की, कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी शेवटी कडू ते कडूच! परवाच्या शरद पवारांच्या ब्राह्मण समाज संघटना प्रतिनिधींच्या भेटीचे फलित काय, या प्रश्नाचे उत्तरही याच म्हणीत दडले आहे.

 
 
 
pawar
 
 
 
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांच्या राजकारणाविषयी काय बोलावे अन् कितीदा बोलावे... म्हणूनच कित्येकदा ‘शरद पवार कोणालाच कळले नाही’, ‘ते जाणते आहेत’ म्हणून त्यांच्या महिमामंडनातच कित्येकांची अख्खी हयात गेली. यात त्यांचे नेते-कार्यकर्ते तर ओघाने आलेच, पण काही ज्येष्ठ पत्रकार, संपादक मंडळी, पुरोगामी साहित्यिकांनीही पवारांच्या झांजा वाजवत काहीना काही आपल्या पदरात पाडून घेतले. त्यामुळे आजही ‘पवार साहेब म्हणजे एक विचार’, ‘पवार साहेब म्हणजे एक विद्यापीठ’ हे माध्यमांपासून ते जनमानसापर्यंत रुजविण्यात या पद्धतशीर राजकीय प्रचाराला यशही आले. परिणामी, या पक्षाला महाराष्ट्रव्यापी जनाधार कधीही लाभला नसला, तरी पवारांची राष्ट्रीय धुरंधर नेता, भावी पंतप्रधान, राष्ट्रपतीपदाचा सबळ दावेदार म्हणून प्रतिमानिर्मितीचे चक्र आजही अव्याहतपणे सुरूच दिसते. नाही म्हणायला पवारांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्यावर भ्रष्टाचारापासून ते मित्रांच्या पाठीत खंजीर खुपसण्यापर्यंतचे सर्व प्रकारचे आरोप-प्रत्यारोपही झाले.
 
शेकडो प्रकरणे आली अन् गेली. काही मिटली, तर काही पद्धतशीरपणे मिटवली गेली. पण, त्यापैकी पवार जातीयवादी आणि खासकरून ब्राह्मणद्वेषी असल्याचा त्यांच्यावरील ठपका मात्र खुद्द पवारांनाही इतके वर्षं पुसता आलेला नाही, हेही तितकेच खरे! काही समाजांना, त्यांच्या प्रतिनिधींना हाताशी घेऊन सर्वसमावेशकतेचा आव पवारांनी जरुर आणला. पण, त्यामागेही दडले होते ते फक्त आणि फक्त मतपेढीचे राजकारण. परवाच झालेल्या ब्राह्मण संघटनांच्या बैठकीत खुद्द पवारांनीच ‘ब्राह्मण समाजाची मते कुठे जातात, हे सांगायला मला ज्योतिषाची गरज नाही’ असे म्हणत ब्राह्मण समाजाला ते खिजगणतीतही घेत नाहीत, याचीच जाहीर वाच्यता केली. त्यामुळे ब्राह्मण संघटनांच्या पवारांसोबतच्या बैठकीतून पवारांचे, त्यांच्या ब्राह्मणविरोधी विचारांचे मतपरिवर्तन वगैरे होईल, असा अंध:विश्वास सर्वस्वी फोल ठरावा.
 
खरंतर पवारांचा ब्राह्मणद्वेष हा काही आजचा विषय नव्हेच. बाबासाहेब पुरंदरेंवर अश्लाघ्य आरोप करण्यापासून ते देवेंद्र फडणवीसांची जात काढण्यापर्यंत पवारांची अख्खी हयातच हा जातीयवाद रुजवण्यात गेली. पण, इतक्या वर्षांत पवारांना कधीही ब्राह्मण संघटनांशी त्यांच्या समाजाच्या प्रश्नांविषयी चर्चा करावी, असे कधीही वाटल्याचे ऐकिवात नाही. त्यातच यंदाही या ब्राह्मण संघटनांनी पवारांकडे भेटीची वेळ मागितली की पवारांनीच त्यांना पाचारण केले, यावरूनही मतभेद समोर आले. पण, मुळात हाच प्रश्न उपस्थित होतो की, पवार साहेबांनी ब्राह्मण संघटनांच्या भेटीचा नेमका हाच ‘टायमिंग’ का साधला? तर पवार एक अत्यंत धूर्त आणि चाणाक्ष राजकारणी आहेत. राजकारण्यांनी तसे असण्यात गैर मुळी नाहीच. पण, पवार साहेबांच्या डोक्यात एक, मनात दुसरे आणि ओठावर तिसरेच काही तरी ठेवायची तशी जुनीच खोड. परवाच्या बैठकीतही त्याची प्रचिती आली. पवारांनी ब्राह्मण संघटनांच्या प्रतिनिधींचे सर्व काही ऐकून घेतले खरे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानांपासून ते त्यांच्या मागण्यांपर्यंत सर्वच बाबींचा तसा समावेश होता. पण, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष म्हणूून शरद पवारांनी अशी जातीय भावना दुखावणारी विधानं कोणीही करू नये वगैरे म्हणत फक्त मिळमिळीत उत्तरं दिली.
 
खरंतर पवारांना अमोल मिटकरीसारख्या ब्रिगेडी नेत्यावर कारवाई करायची असती, तर ती ब्राह्मण संघटनांच्या आंदोलनानंतर, विरोधानंतर कधीच करता आली असती. पण, पवारांनी तेव्हा त्याबाबतीत सोयीस्कर मौन धारण केले. म्हणजे यापूर्वी पवारांना अशी विधाने कधीच आक्षेपार्ह वाटली नव्हती का? दलित, मराठा समाजाबद्दल असेच एखादे आक्षेपार्ह विधान राष्ट्रवादीच्या नेत्याने केले असते, तर मग पवार साहेबांनी अशीच त्यांचीही पाठराखण केली असता का? तर नक्कीच नाही. त्याउलट केतकी चितळे या पवारांविरोधात ट्विट शेअर करणार्‍या अभिनेत्रीवर महाराष्ट्रभर २८ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. पण, अमोल मिटकरीच्या आसपास राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलेली पोलीस यंत्रणा तक्रारींनंतरही का फिरकली नाही, याचे उत्तर पवार साहेब देणार का?
 
त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ब्राह्मण समाजाविरोधात कुठलीही आक्षेपार्ह विधाने, टिप्पणी होणारच नाही, याचा शब्द खुद्द पवारच देऊ शकत नाही. कारण, या सगळ्याचे कर्तेकरविते शेवटी साहेबच म्हणा! ‘जसा नेता तशी प्रजा’ याच उक्तीनुसार पवारांनी कायमच ब्राह्मणद्वेष जोपासला. संभाजीराजे जेव्हा राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवडून आले, तेव्हा पवार म्हणाले होते की, “पेशवाईत फडणवीसांनी छत्रपतींची नियुक्ती कधीच केली नव्हती. मात्र, संभाजीराजे छत्रपती यांच्या रुपाने प्रथमच पेशव्यांनी छत्रपतींची नियुक्ती केल्याची घटना घडली आहे.” त्यामुळे समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव, गडकरी पुतळे, पुणेरी पगडी, संभाजी ब्रिगेड, श्रीमंत कोकाटे, बाबासाहेब पुरंदरे ते देवेंद्र फडणवीस अशी ब्राह्मणद्वेषाची विषवल्ली पोसण्याचा पवारांचा अनुभव तसा दांडगा आहेच. म्हणूनच मिटकरी, आव्हाड, भुजबळ ही सगळी शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेत, पुरोगामित्वाचे अवडंबर माजवणारी मंडळी ब्राह्मणद्वेषाने अक्षरश: पछाडलेली दिसतात. एकीकडे पुरोहित धंदा करतात म्हणणारे छगन भुजबळ, तर दुसरीकडे थेट लोकमान्य टिळकांचेच छत्रपती शिवरायांच्या रायगड समाधिस्थळातील योगदान नाकारणारे जितेंद्र आव्हाड, अशी बेताल बरळूंची फौजच पवारांच्या ताफ्यात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ब्राह्मण समाजाने कुठल्याही अपेक्षा बाळगणे म्हणजे निव्वळ साखरपेरणीच ठरावी.
 
या बैठकीदरम्यानच शरद पवारांनी ब्राह्मण समाजाला कोणतेही आरक्षण देता येणार नाही, असे अगदी स्पष्टपणे सांगत, या समाजाने इतर समाजाच्या आरक्षणालाही विरोध करू नये, अशीही पुष्टी जोडली. शिवाय इतर काही प्रश्न असतील, तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करा, म्हणून चेंडू सरकारच्या दरबारी टोलवला. त्यामुळे ब्राह्मण समाजाची मते तशीही राष्ट्रवादीच्या पदरी पडत नाहीत. त्यात या समाजाला आरक्षणाचे लाभही नाही. मग अशा समाजाचे पवार साहेबांप्रति मूल्य ते काय असावे, याची खूणगाठ आता ब्राह्मण संघटनांनीही बांधावी. कारण, समाज म्हणून तुमचे वजन किती, हे त्या समाजाच्या मतदानमूल्यावरुनच ठरत असते. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्याकांच्या दाढ्या कुरवाळण्यापासून ते इशरत जहाँसारख्या दहशवाद्याच्या नावाने रुग्णवाहिका सुरू करण्याची हिंमत दाखवतात. आता तर न्यायालयानेही नवाब मलिकांचे ‘दाऊद कनेक्शन’ मान्य केल्यानंतरही पवारांना त्याचे वावडे नाहीच!
 
खरंतर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या अलीकडच्या सभांतून बोचर्‍या शाब्दिक हल्ल्यांनी उघडे पडल्यानंतर पवारांवर ब्राह्मण संघटनांशी तोंडदेखली भेट घेण्याची वेळ आली. पण, त्यातही जातीयद्वेष कालवून राज्यातील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आणण्याचे प्रयोग पडद्यामागून सुरू आहेत. केतळी चितळे हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण. तेव्हा ब्राह्मण समाजानेही या ‘काटे’री पिल्लावळीला आक्रस्ताळी प्रतिक्रिया न देता, न्याय्य मार्गानेच संघर्ष करावा. त्यामुळे ज्या पक्षाने आजवर ब्राह्मणांचा केवळ उपमर्द अन् अपमानच केला, त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ब्राह्मण समाजाने सन्मानाची, सभ्यतेची तसूभरही अपेक्षा बाळगणेच गैर ठरावे. शिवाय मतपेटीतून राष्ट्रवादी आणि त्यांच्या काँग्रेस-शिवसेनेसारख्या समर्थकांनाही योग्य वेळी योग्य उत्तर देऊन ब्राह्मण समाजानेही एकजुटीचा परिचय करुन द्यावा. अशा या स्वत:ला ‘देवाचा बाप’ म्हणवून घेणार्‍यांना म्हणूनच मतपेटीतून लोकशाहीत खरा देव कोण, ते भविष्यात कळेलच!