परिचारिकांचे सेवा कार्य उल्लेखनीय - डॉ. के. डी. सातपुते

    दिनांक : 12-May-2022
Total Views |
नंदुरबार : वैद्यकीय क्षेत्रात विशेषत: कोरोना काळात नंदुरबार जिल्ह्यातील सर्व परिचारिकांचे सेवा कार्य उल्लेखनीय असे ठरले. जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांच्या कार्यास सलाम असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के. डी. सातपुते यांनी केले. जिल्हा परिचर्या प्रशिक्षण केंद्रात जागतिक परिचारिका दिनानिमित्त गेल्या दोन वर्षात उत्तीर्ण झालेल्या एएनएम आणि जीएनएम मधील विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी तसेच उत्कृष्ट परिचारिका यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
 
 
 
paricharka 
 
 
याप्रसंगी दीपप्रज्वलनासह आधुनिक परिचारिकेचे जनक फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य जितेंद्र चव्हाण यांनी जागतिक परिचर्या दिनाचे महत्व विशद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. के. डी. सातपुते होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आधीसेविका शैलजा मोरे, परिचारिका सुषमा गावित,नम्रता मदने, निकिता चव्हाण, आकाश केंद्रे, सुशील केदार,ममता ठाकरे सोनल कोडोलीकर, संतोष मुठे उपस्थित होते.
 
नंदुरबार परिचर्या प्रशिक्षण केंद्रातून सन 2019 -20 आणि 2021 या कालावधीत प्रथम, द्वितीय, तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या तसेच उत्कृष्ट कार्य असलेल्या परिचारिका यांना गौरविण्यात आले. कोवीड नंतर दोन वर्षाच्या कालावधीने साजरा झालेल्या जागतिक परिचारिका दिनानिमित्त सर्वांच्या चेहऱ्यावर चैतन्य व हास्य उमलले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षाची काजल चव्हाण आणि प्रीती पान पाटील यांनी केले तर आभार सुशील केदार यांनी मानले . परिचारिका सप्ताहाचे सुयोग्य नियोजन प्राचार्य जितेंद्र चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रथम व द्वितीय तसेच तृतीय वर्षातील परिचर्या विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.