शिरपूर : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेतर्फे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शिक्षणाची सोय करण्यात आली असून शिरपूर तालुक्याला सर्वोत्तम शैक्षणिक दर्जा प्राप्त करुन दिला आहे. भूपेशभाई पटेल यांनी देखील मनापासून सामाजिक कार्यात वाहून घेतले असून नागरिकांच्या लहान लहान समस्या समजून ते मदतीसाठी नेहमीच प्रयत्नशील असतात.
विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आदिवासी व इतर सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, उत्तम करिअरसाठी प्राचार्य, प्राध्यापक यांनी प्रयत्न करावे. गरीब व वंचित विद्यार्थ्यांना प्रेरित करुन सहकार्य करावे, शिक्षण हे पुण्याचे काम शिक्षकांच्या हातात आहे, सर्वांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजवावे. गरजू ६० आदिवासी विद्यार्थिनींना चांगल्या सायकलींचे वाटप केले असून त्यांनी सायकलीचा सदुपयोग करावा. सर्वांनी जीवनात यशस्वी व्हावे. मी तालुक्यात पाण्याचे मोठे काम केले असून पुढील ३० वर्षे पर्यंतच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मी करुन ठेवली आहे. शिरपूरला ९० प्रोजेक्ट सुरु करुन ४५ आदिवासी विद्यार्थी व इतर ४५ विद्यार्थी यांच्यासाठी आपण जेईई, नीट परिक्षा तयारीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहोत. येत्या दोन महिन्यात जागतिक दर्जाची ई-लायब्ररीचे लोकार्पण करणार असून जागतिक सॉफ्टवेअर व दर्जेदार, गुणवत्तापूर्ण लायब्ररी सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सुरु करीत आहोत, असे प्रतिपादन माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले.
एच. आर. पटेल महिला महाविद्यालयाच्या ३० आदिवासी विद्यार्थिनी व आर. सी. पटेल सिनिअर कॉलेजच्या ३० आदिवासी विद्यार्थिनी अशा एकूण ६० विद्यार्थिनींना संस्थेच्या वतीने मोफत सायकल वाटप समारंभ गुरुवारी १२ मे रोजी सकाळी ११.३० वा.एस. एम. पटेल ऑडिटोरिअम हॉल मध्ये माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते झाला. व्यासपीठावर आ. अमरिशभाई पटेल, कृतिबेन भूपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक बबनलाल अग्रवाल, गोपाल भंडारी, आर. सी. पटेल सिनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील, एच. आर. पटेल महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा शितोळे उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवर यांचे स्वागत, सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील म्हणाले, आ. अमरिशभाई पटेल, भूपेशभाई पटेल, राजगोपाल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात. शिरपूरच्या जवळील गावातील तसेच होस्टेल मधून महाविद्यालयात, इतरत्र शैक्षणिक कामासाठी, खेळाच्या शिबिरासाठी ये-जा करायला गोरगरीब आदिवासी ६० विद्यार्थिनींना मोफत सायकली देण्याचा संस्थेचा निर्णस खूपच स्तुत्य आहे. प्राचार्या डॉ. शारदा शितोळे म्हणाल्या की, गेल्या काही वर्षांत अनेक विद्यार्थिनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. तसेच क्रीडा स्पर्धेत देखील अनेक स्पर्धांमध्ये विद्यार्थिनी यशस्वी झाल्या आहेत.
कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. गजानन पाटील, उपप्राचार्य डॉ. ए. एम. पाटील, उपप्राचार्य डॉ. रमेश जाधव, पौर्णिमा पाठक, प्रा. डॉ. विनय पवार, प्रा.हर्षदा पाटील, प्राध्यापक, विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. विद्या पाटील यांनी केले. आभार प्राचार्या डॉ. शारदा शितोळे यांनी मानले.