महाराष्ट्रातील थोर संत तुकडोजी महाराज यांची आज जयंती आहे. त्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या पुनर्निर्माणासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांच्या जयंती निमित्त विशेष लेख...
गाव हा विश्वाचा नकाशा।
गावावरून देशाची परीक्षा ।
ह्या राष्ट्रातील जनता खेड्यापाड्यात राहते. जनसामान्यांची उन्नती घडवून आणायची असल्यास ती सुरुवात खेड्यापासून, गावापासून झाली पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे महाराष्ट्रातील थोर संतांचा वैचारिक वारसा चालविणारे एक असामान्य प्रतिनिधी होते. ग्रामीण भागांत आजही अनेक अवैज्ञानिक चालीरीती रूढ आहेत. अर्थात, त्या जुन्या काळापासून लोकांच्या मस्तकात तळ ठोकून आहेत. तुकडोजींना ग्रामीण भागातील लोकांच्या सामाजिक चालीरीती, सवयी, घटना या सर्वांविषयक सखोल ज्ञान होते. त्यावर संत तुकडोजी यांनी सूचविलेले उपायही व्यवहारी होते हे त्यांच्या जनसामान्यांपर्यंतच्या केलेल्या भजनांच्या माध्यमातून स्पष्ट होते. भारतात अनेक संतांनी समाज घडविण्यासाठी प्रेरक चळवळी चालविल्याचा इतिहास आहे. शाब्दिक व मौखिक स्वरूपात ही समाजोद्धारक वाट अनेक काट्यांच्या मार्गातून येत धडाडीने पुढे गेली. लोकांमध्ये प्रेरणा निर्माण करून संघटितपणे त्यांना ग्रामसुधारणेच्या कामास लावले, हे खरोखर राष्ट्रउन्नतीच्या कार्याचे महत्त्वाचे बीज होय. राष्ट्रसंत तुकडोजी यांनी त्यांच्या लिखाणातून सार्वत्रिक प्रबोधन केलेले आढळते. अंधश्रद्धा, ग्रामस्वच्छता, कुटुंबकल्याण, महिला विकास, शेती, ग्रामविकास, वर्णव्यवस्था, ग्रामसरक्षण, ग्रामआरोग्य, संघटन शक्ती, जीवन कला अशा असंख्य मुद्यांचा यात समावेश आढळतो.
जरी झालो कर्म भ्रष्ट्।
तरी आपण इतरांहून श्रेष्ठ ।
ऐसा प्रतिष्ठेसाठी बळकट ।
धरीली रुढी ॥
कर्माने भ्रष्ट असणार्यांनी आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत हा कांगावा कशासाठी करावा ? स्वतःची प्रतिष्ठा बळकट करण्यासाठी रुढींच्या आड लपून आपले कर्म सुयोग्य आहे असे होत नाही. माणसाने आपल्या कर्माने श्रेष्ठ व्हावे असा उपदेश तुकडोजी करतात.
“तुकडोजींची ग्रामगीता
एक प्रकाशमान पथदर्शक...!
कार्यकर्ता तोची गावाचा।
ज्यास लोभ नाही कुणाचा ।
आमचा गावाची मोक्ष आमुचा।
मानावा त्याने”
ग्रामसुधारणेत कार्यकर्त्यांचे म्हणजेच काम करणार्यांचे योगदान हे महत्वाचे आहे .गावाचा खरा कार्यकर्ता तोच जो कशाचाही लोभी नाही. ज्याला कसलीही अपेक्षा नाही. जो गावाचा विकास हा स्वतःचा विकास मानतो. तो सच्चा कार्यकर्ता बनतो.
राष्ट्रसंतांनी खेड्यातील जीवनाचा गाभाच आत्मसात केला आहे. महाराजांची वाणी जितकी वात्सल्यपूर्ण आहे, तितकीच रोखठोख आहे. संघटन चातुर्य महाराजांच्या कथाकथनात, लेखनात, जीवनाचा दूरवर अभ्यास करणार्यालाही दिसून येते. ग्रामगीतेत व्यक्त झालेल्या विचारात स्पष्टपणा, विज्ञाननिष्ठता, विवेकपूर्ण अभिव्यक्ती, सर्वच सार स्पष्ट आहेत. गरिबी-श्रीमंतीच्या दरीत गरीब अधिक गरीब व श्रीमंत अधिक श्रीमंत होत गेलेत. यावर शिक्षणाचाही तेवढाच प्रभाव आहे. कारण अज्ञान हे अंधकारमय जीवनाला गाडून ठेवते. माणसाला प्रगतीकडे जाऊ देत नाही. या व्यवस्थेच्या मुळावर घाव घालताना तुकडोजी म्हणतात...
शब्दात नको समसमान ।
प्रत्यक्ष पाहिजे धन,मान,शिक्षण ।
फुट पाडिती ते द्यावेत हाकोन ।
गावाचे भेदी ॥
केवळ शब्दात नव्हे तर कृतीतून समसमानता असली पाहिजे. धन, मान, सन्मान, शिक्षण हे प्रत्यक्ष पाहिजे. या कृतीत जो फूट पाडेल त्याला हाकलून लावावे. कारण हे भेदी आहेत.
महाराजांनी भजन आणि कीर्तनाद्वारे, भाषणाद्वारे खेडे व शहर यांना उज्ज्वल केले. जगत्गुरू तुकोबाराय यांच्याप्रमाणेच त्यांच्या कार्याच्या पाठीशी तळमळ आहे. जणू आही संत तुकारामच आहोत की काय असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. दुर्लक्षित ग्रामजीवनात चैतन्य ओतण्यासाठी लिहिलेली ग्रामगीता केवळ जुन्याच्या तोडीची म्हणून मोलाची नव्हे तर एका उपेक्षित दु:खाला वाचा फोडणारे तिच्यातील क्रांतिकारक नाविण्य हे महत्त्वाचे आहे. विचारांच्या प्रबलतेनुसार बौद्धिक खुराक मिळविण्यासाठी बुद्धीला चालना देणे हे महत्त्वाचे आहे. ते कार्य तुकडोजींच्या माध्यमातून प्रखंडपणे समोर येते.
एक प्रकाशमान पथदर्शक...!
तुकडोजींची ग्रामगीता
धर्म माणुसकी म्हणती।
माणुसकी न्यायावर शोधिती ।
न्याय कोणाच्याही प्रति ।
एकची राहतो सर्वदा ॥
काही संकुचित धर्मांधांनी धर्मा-धर्मात भांडणे लावली त्याचे वणवे पेटविले. पण खरा धर्म हा माणुसकी आहे. माणुसकी ही न्यायावर शोभून दिसते, ती न्याय शोधते. न्यायदान करतांना कोणीही असो- त्यात सत्याची कास धरून ठेवायला पाहिजे. कारण न्याय ही बाब विश्वासप्रिय असून ती सर्वांसाठी समान असते. खंजिरी हे महाराजांच्या भजनाचे व प्रबोधनाचे मुख्य तथा वैशिष्ट्य मानले जाते .मराठी व हिंदी भाषेत त्यांनी काव्यरचना केली. देशभर हिंडून सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत विश्वबंधुत्वाचा संदेश देणारे महानायक म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होय. ग्रामोन्नती व ग्रामविकास हा जणू महाराजांच्या विचारसरणीचा केंद्रबिंदू होता. समाजातील सर्व घटकांची उन्नती व विकास कसा साधता येईल याविषयी ते नेहमी प्रयत्न करीत. महिलांची उन्नती हाही तुकडोजी महाराज यांच्या विचारविश्वाचा एक महत्त्वाचा पैलू होता. कुटुंबव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था, समाजव्यवस्था ,स्त्रियांवर कशी अवलंबून असते हे ते नेहमी आपल्या प्रबोधनातून उदाहरणादाखल सांगत. स्त्रियांना अज्ञानात ठेवणे हे गुलामगिरीचे लक्षण आहे. त्यांनी शिक्षणाकडे वळले पाहीजे म्हणजे समाजव्यवस्थेत परिणामकारक बदल होऊ शकतो हे त्यांनी जाणले होते.
जे कोणी माझे स्नेही प्रेमळ ।
त्यांनी करावा ग्रंथाचा सुकाळ ।
घरोघरी चालवावा प्रचार निर्मळ ।
ग्रामगीता वाचनाचा ॥
आपल्या लोकांचे कर्तव्य आता हेच की ह्या वाड:मयाला करोडो मुखी व कानी जाऊ द्यावे आणि ग्रामगीता वाचनाने, प्रसाराने महाराजांची वैचारिक क्रांती पुढे न्यावी.
- सतीश आशाबाई खंडू शिंदे
पिंप्री खुर्द, ता.धरणगाव