राज ठाकरेंच्या सभेला परवानगीबाबत पोलिसांचा सस्पेन्स कायम ; औरंगाबाद शहरात आजपासून 9 मे पर्यंत जमावबंदी!

    दिनांक : 26-Apr-2022
Total Views |
औरंगाबाद शहरात आजपासून 9 मे पर्यंत जमावबंदी!
 
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात आजपासून 09 मे 2022 पर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 अन्वये कारवाई होणार आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी जमावबंदीचे आदेश काढले आहे. या आदेशान्वये पाचपेक्षा अधिक लोक विनापरवाना एकत्र जमू शकत नाही. रमजान ईद ,महापुरुषांच्या जयंती आणि राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर काढले जमावबंदीचे आदेश काढल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेला परवानगी मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. औरंगाबादमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं असून उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 अन्वये कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे. विविध सणवार, संभाव्य आंदोलनाची कारणं देत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.
 
 

thakare
 
 
 
 
मनसे 1 मे रोजी औरंगाबादेत होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेसाठी परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र प्रतीक्षेपूर्वी त्यांच्या हातात पडलं आहे, ते पोलीस आयुक्तांच्या जमावबंदीचे आदेश. आजपासून 9 मेपर्यंत औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशानुसार, पोलिसांच्या परवानगीशिवाय पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. त्यामुळं मनसेच्या सभेचं काय होणार हा प्रश्न अजुनही अनुत्तरीतच आहे. दरम्यान, पोलिसांनी जमावबंदीचे आदेश काढताना वेगवेगळे सणवार, महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी यांचा उल्लेख केला आहे. तसंच राज ठाकरेंनी मशिदीवरचे भोंगे उतरवण्यासंदर्भात दिलेल्या इशाऱ्याची संदर्भ दिला आहे.
 
राज ठाकरेंच्या सभेला परवानगीबाबत पोलिसांचा सस्पेन्स कायम
 
राज ठाकरे यांच्या सभेला औरंगाबाद पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी मनसे पदाधिकाऱ्यांनी स्टेज उभारण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे औरंगाबाद पोलीस आयुक्तांची राज्याच्या गृहमंत्र्यांसोबत सोमवारी (25 एप्रिल) झालेल्या बैठकीमध्ये परवानगीबाबत विचारणा केल्याचं समजतं. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार का या प्रश्नाच्या उत्तराबद्दल पोलिसांनी अजूनही सस्पेन्स ठेवला आहे. राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी होणाऱ्या सभेसाठी पोलिसांनी परवानगी देण्याबाबत अजूनही मौन बाळगलं आहे. अर्ज करुन सहा ते सात दिवस झाले असले तरी पोलिसांनी परवानगीबाबत अद्यापही निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे मनसे पदाधिकारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा घेण्यावर ठाम आहेत. त्यांनी स्टेजची उभारणी करण्यास सुरुवात केली आहे.
 
राज ठाकरेंच्या सभेचा टीझर रिलीज
 
ठाण्याच्या सभेत मशिदीवरचे भोंगे उतरवण्याची घोषणा करणारे आणि पुण्यात हनुमानाची महाआरती करणारे राज ठाकरे औरंगाबादच्या सभेत कोणती घोषणा करणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. अशातच आता 1 मे रोजी होणाऱ्या सभेचा टीझर मनसेनं शेअर केला आहे. छत्रपती संभाजीराजे या मालिकेच्या गाण्यावर मनसेनं 1 मे रोजीच्या सभेचा टीझर एडिट केला आहे. या टीझरमधील महत्त्वाची बाब म्हणजे, औरंगाबादचा संभाजीनगर असा आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामांतर करण्याच्या मुद्द्याला मनसेने हात घातल्याचं दिसतं.