संभाजी महाराजांचे पराक्रम, बलिदान चित्तात ठेवले तरच हा हिंदुस्थान टिकेल - शिवशंभू व्याख्याते राजा महाराज शेंडे

    दिनांक : 18-Apr-2022
Total Views |
नंदुरबार : ९ वर्ष शत्रूशी झुंज देऊन एकही युद्ध न हारलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे महापराक्रमी जीवन विश्वाला आदर्शमय आहे. फितुरीने संभाजी महाराज यांना औरंगजेबने पकडून ३० दिवस अन्वनीत अत्याचार करून क्रूरपणे हत्या केली पण त्यांनी हिंदुधर्म सोडला नाही त्यांचे पराक्रम, बलिदान चित्तात ठेवले तर आणि तरच हिंदुस्थान टिकेल, असे प्रतिपादन शिवाव्याख्याते राजा महाराज शेंडे यांनी केले. ते हिंदु सेवा सहाय्य समितीचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित धर्मवीर संभाजी महाराज यांचा जीवनचरित्रवरील सत्य इतिहासावर आधारित जाहीर व्याख्यान बोलत होते.
 
ndb
 
डी.आर. हायस्कूल मैदानावर रविवारी आयोजित जाहीर व्याख्यान कार्यक्रमाचा प्रारंभ घोषणा, प्रेरणामंत्राने झाली. व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा प्रतिमेचे पूजन आणि मशाल प्रज्वलित केली. प्रमुख वक्ते राजा महाराज शेंडे यांचा सत्कार राजू चौधरी यांनी केला. पाटील यांनी हिंदु सेवा सहाय्य समितीचा कार्याचा आढावा प्रास्ताविकातुन मांडला. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचा वतीने प्रमुख वक्त्यांचा सत्कार नितीन जगताप यांनी केला. राजा महाराज यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, संभाजी महाराजांकडे शास्त्र आणि शस्त्र दोन्ही होते ते संस्कृत पंडित होते. एकही युद्ध न हारलेले आणि सर्व नीती माहिती असलेला असा एकमेव राजा होता. संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर ही आजचा हिंदु जागा होत नाही कारण आम्ही हिंदू इतिहास वाचत नाही, इतिहासातून शिकल पाहिजे जेणेकरून इतिहासाची पुनरावृत्ती टाळता येईल. हिंदूंनी संघटित होऊन संभाजी महाराज आपल्या आचरणात उतरवला पाहिजे तर आणि तरच हा देश हिंदुस्थान म्हणून टिकेल. त्यांनी शिवदिग्विजय बखर, शिवकाव्य, फार्बर पेपर (बडा बखर), मराठी साम्राज्याची छोटी बखर असे विविध ग्रंथाचे आणि बखरींचे संदर्भ देऊन धर्मवीर संभाजी महाराज जीवनचरित्र उलगडून सांगितले. सूत्रसंचलन अक्षय कलाल यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंदु सेवा सहाय्य समितीच्या धर्मसेवकांनी परिश्रम केले.