उन्हाच्या फटक्याने वृद्धाला आली भोवळ अन् चोरट्यांने केला कहर

    दिनांक : 13-Apr-2022
Total Views |
बेशुद्ध पडलेल्या वयोवृद्धाचे ब्रेसलेट चोरी
 
नंदुरबार : तालुक्यातील ठाणेपाडा येथून भंडाऱ्याचा कार्यक्रम आटोपून दुचाकीने परतणाऱ्या वृद्धाला चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या वृद्धाची मदत करण्याऐवजी त्याच्या हातातील दीड लाख रुपयांचे ब्रेसलेट लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
feeling-dizzy
 
शहरातील देसाईपुरा भागातील रहिवासी महादू भिमाजी गवळी हे दुचाकीने सोमवारी सकाळी ठाणेपाडा येथे भंडारा व महाप्रसादाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास ते एकट्यानेच परत येत असताना साक्री रोडवरील अंबिका माता मंदिराजवळ त्यांना भोवळ आली. यातून ते दुचाकीसह रस्त्याच्या कडेला पडले, भर दुपारी घडलेल्या या प्रकारातून त्यांना मदत न मिळाल्याने ते बेशुद्ध झाले होते. दरम्यान त्यांच्या बेशुद्धीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या हातात असलेले १ लाख ५० हजार रुपयांचे सहा तोळ्याचे ब्रेसलेट काढून पोबारा केला. काही वेळाने त्यांना शुद्धी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. याबाबत महादू भिमाजी गवळी यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार सुरेश वसावे करत आहेत.