मोहाली : टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध आजपासून मोहालीत सुरू होणारी टेस्ट मॅच विराट कोहलीसाठी विशेष महत्त्वाची होती.
कारण ही मॅच विराट कोहलीच्या कारकिर्दीतील 100 वी टेस्ट मॅच आहे. या टेस्ट मॅचमध्ये भारताने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला असून, त्यापूर्वी टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी विराट कोहलीला टीम इंडियाची कॅप प्रदान केली. या वेळी त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माही मैदानावर या सोहळ्यासाठी उपस्थित होती. कॅप घेतल्यानंतर कोहलीने प्रशिक्षक आणि सर्व खेळाडूंचे आभार मानले.
यानंतर त्याने अनुष्काला मिठी मारली आणि किस केलं. त्याचा हा व्हिडीओ बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ट्वीट केला आहे. या व्हिडीओत मैदानावर टेस्ट मॅचमधील टीम इंडियाचे सगळे खेळाडू उपस्थित असून, टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड विराट कोहलीला अत्यंत सन्मानपूर्वक एका पेटीत ठेवलेली कॅप प्रदान करताना दिसत आहेत. यावेळी राहुल द्रविड यांनीही विराटचं कारकीर्दितला हा महत्त्वाचा टप्पा गाठल्याबद्दल कौतुक केलं.
यावेळी टेस्ट मॅचेसमध्ये मी भरपूर क्रिकेट खेळलो आहे. हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा टप्पा आहे. मी माझ्या फिटनेसबाबतही खूप मेहनत घेतली आहे. माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या कोचसाठीही हा अतिशय महत्त्वाचा क्षण आहे. तेही खूप आनंदी आहेत,' अशा भावना विराटने व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान या टेस्टमध्ये त्यानं शतक करावं अशी सर्व फॅन्सची इच्छा होती. विराटच्या शतकाकडं डोळे लावून बसलेल्या फॅन्सची निराशा झाली. मोहाली टेस्टमध्ये रंगात आलेला विराट 45 रन काढून आऊट झाला.