नुकतेच महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मराठी भाषा भवनाच्या उभारणीची घोषणाही सरकारतर्फे करण्यात आली. तसेच महाराष्ट्र सरकार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठीही प्रयत्नशील असल्याचे यावेळी मराठी भाषा मंत्र्यांनी आश्वासित केले. तेव्हा, या पार्श्वभूमीवर व मराठीतील थोर कवी ग्रेस यांच्या आजच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मराठी भाषेच्या संपन्न व गौरवशाली परंपरेचा परिचय करुन देणारा हा लेख...
भाषा बोलणाऱ्यांच्या प्रमाणाचा विचार केला, तर मराठी भारतात क्रमांक तीनवर व जगात क्रमांक दहावर सर्वाधिक जास्त बोलली जाणारी भाषा आहे. मराठीत एकूण ५४ बोलीभाषा आहेत. घटनेनुसार १९६५ पासून महाराष्ट्र राज्याची देवनागरी लिपीतील मराठी भाषेचा आपण 'राजभाषा' म्हणून स्वीकार केला आहे. सध्या आपण मराठी भाषेला 'अभिजात भाषे'चा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्नरतही आहोत. 'अभिजात भाषा' म्हणजे 'वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारकडून दिला जाणारा दर्जा' जो आजपर्यंत तामिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम, उडिया या भाषांना मिळाला आहे. तो आज ना उद्या आपल्या मराठी भाषेला नक्की मिळेल, यात शंकाच नाही. पण, मराठीच्या व महाराष्ट्राच्या उगमाचा विचार करता रामायण-महाभारतापासून अनेक संदर्भ सापडतात. त्यांचा या लेखाच्या माध्यमातून आढावा घेऊया.
रामायणात प्रभू रामचंद्र व सीतामाई सध्याच्या नाशिक येथील पंचवटीत राहत होते, तर महाभारतातील भगवान श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी कौडिन्यपूर राजाची राजकन्या होती. कौडिन्यपूर आताच्या नागपूरजवळ आहे. नल-दमयंती कथानकातील दमयंती विदर्भ राजाची कन्या असून, नलाचा नळदुर्ग किल्ला उस्मानाबादमध्ये आहे. पण, इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार करता, इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात गौतम बुद्धांचा शिष्य मोगलीपुत्त दिस्स याने बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी मराठी प्रदेशात शिष्य पाठविल्याचा संदर्भही सापडतो. त्यानंतरच्या काळात हा प्रदेश मौर्य साम्राज्याचा भाग असल्याचा संदर्भ इतिहासात सापडतो. सम्राट अशोकाच्या काळात महाराष्ट्रातील 'सोपारा' आताचे 'नालासोपारा' या बंदरातून पूर्व आफ्रिका, मेसोपोटेमिया, एडन व कोचिन असा व्यापार चालू असे.
इसवी सन पूर्वचे दुसरे शतक ते इसवी सनाचे दुसरे शतक या कालखंडात येथे सातवाहन राजे राज्य करीत होते. हा कालखंड म्हणजे समृद्धीचा, विदेशी व्यापाराचा कालखंड. या कालखंडात जे दोन समृद्ध ग्रंथ लिहिले गेले, ते प्राचीन मराठी प्राकृत भाषेत लिहिले गेले. पहिला ग्रंथ गुणाढ्याचा 'कथासरित्सागर' किंवा 'बृहत् कथासरित्सागर', त्यात वर्णन असलेला मराठी समाज वैभवसंपन्न आहे आणि दुसरा ग्रंथ सातवाहन राजा हालने रचलेली 'गाथासप्तशती.'
या कालखंडात भाषेचे वहन झाले ते शौरसेनी पैशाचीचे पुढे मराठीकडे मार्गक्रमण झाले. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णीने इसवी सन ७८ मध्ये 'शालिवाहन शक' सुरू केले. सातवाहन राजांचे वैशिष्ट्य म्हणजे, ते पराक्रमी व प्रगतिशील होते. त्यांनी विंध्यच्या उत्तरेला जाऊन यवन, शक व पल्लव या परकीयांचा पराभव केला, या राजांना 'त्रिसमुद्रतोय पीतवाहन' म्हणजे ज्याच्या घोड्यांनी तिन्ही समुद्रांचे पाणी प्यायले आहे, अशी पदवी होती. सातवाहनांनंतर महाराष्ट्रात वाकाटकांचे साम्राज्य होते, त्यांची राजधानी विदर्भातील वत्स्यगुल्म म्हणजे आताचे वाशिम, वाकाटक व गुप्तांचा कालखंड एकच. इसवी सन चौथे, पाचवे, सहावे शतक. वाकाटकांनंतर या प्रदेशावर चालुक्यांचे राज्य होते. सातव्या शतकात भारतात आलेल्या चिनी प्रवासी युवानश्वांगने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याची गोदावरीच्या काठी असलेल्या त्याच्या प्रतिष्ठान म्हणजे आताचे पैठण नामक राजधानीत भेट घेतल्याचा संदर्भ त्याच्या प्रवासवर्णनात लिहून ठेवला आहे. त्यात तो मराठी माणसाचे वर्णन करताना सांगतो, “मराठी वृत्तीने प्रामाणिक आहेत, मित्रासाठी जीव देणारे आहेत, शत्रुत्व झाले, तर जीव घेणारेही आहेत.” याच वाकाटक, चालुक्य, व राष्ट्रकूट राजांच्या काळात अजिंठा-वेरूळची लेणी तयार झाली.
पुढे आठव्या शतकात संस्कृत व्याकरणकार उद्योतन सुरीने आपल्या 'कुवलयमाला' या ग्रंथात मराठ्यांचे वर्णन केले आहे. भारतातील शास्त्रशुद्ध इतिहास लेखन पद्धतीचा पहिला ग्रंथ लिहिणारा बाराव्या शतकातील काश्मिरी पंडित कल्हणने आपल्या 'राजतरंगिणी' ग्रंथात मराठ्यांचा उल्लेख केला आहे. दक्षिणेत 'रठीक' नावाचा जनसमूह होता. या 'रठीक'चे संस्कृतीकरण झाल्यावर 'राष्ट्रीक' असा शब्द तयार झाला, त्यातूनच पुढे 'महाराष्ट्र' हा शब्द तयार झाला, असे मत अनेक इतिहास लेखकांचे आहे. अशा या महाराष्ट्रातील मराठीची पहिली अद्याक्षरे सापडतात ती कर्नाटकातील म्हैसूर जवळील श्रवणबेळगोळ येथील वर्धमान महावीरांच्या भव्य पुतळ्याखाली मराठीची आद्याक्षरे कोरलेली आहेत.
'श्री चामुंडराये करवियले
गंगाजे सुत्ताले करवियले'
ही मराठीची आद्याक्षरे मोडी लिपीत असून, त्या पुतळ्याचे नाव भद्रबाहू आहे. या शिलालेखावर इसवी सन नववे शतक असे कोरले आहे.
मराठीचा जन्म प्राकृतोद्भव की संस्कृतोद्भव? पण, या प्रश्नाचे उत्तर शोधताना बहुसंख्य भाषाशास्त्री मान्य करतात की, मराठी संस्कृतोद्भव आहे. तिच्यावर प्राकृताचेसुद्धा सखोल संस्कार आहेत.शब्दसंख्येचा विचार केला, तर मराठीत ९५ टक्के शब्द संस्कृतपासून आले आहेत. मराठीचे व्याकरण हे संस्कृतोद्भव आहे. पण, मराठीवर विविध प्राकृत भाषा मग त्यात पाली, अर्धमागधी, शौरसेनी, पैशाची, कन्नड व तेलुगू या भाषांचा ठसा दिसून येतो. यावरूनच मराठी भाषा अनेक भाषांच्या संयोगातून निर्माण झाल्याचे दिसून येते.
महाराष्ट्रीय संस्कृती म्हणजे उत्तर व दक्षिण भारतातील संस्कृतीचा मेळ, उदा. उत्तर भारतात गहू जास्त पिकतो, दक्षिण भारतात तांदूळ जास्त पिकतो, तर महाराष्ट्रातील ज्वारी, बाजरीसोबत गहू व तांदूळ हा रोजच्या जेवणाचा भाग आहे. अनेक इतिहास संशोधकांच्या मते, मराठी भाषेतील पहिला ग्रंथ 'विवेकसिंधु' असून, तो मुकुंदराज यांनी लिहिला ते मराठवाड्यातील अंबेजोगाई येथील आहेत. हा ग्रंथ बाराव्या शतकात लिहिला गेला. त्यानंतर सुमारे ७५ ते १०० वर्षांनी महानुभाव पंथाच्या चक्रधर स्वामींनी 'लीळाचरित्र' ग्रंथ लिहिला. या ग्रंथात मराठी भाषिकांच्या भौगोलिक आकाराविषयी वर्णन करण्यात आले आहे. त्यानंतर मराठी भाषेचा विकास वेगाने झाला. यादव काळात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला. यादवांचे राज्य अनेक अर्थाने शांततेचे, संपन्नतेचे व विकासाचे राज्य होते. या कालखंडात संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' या ग्रंथाची रचना केली व त्यातून 'अवघे विश्वचि माझे घर' हे सांगताना आपली जागतिकीकरणाची दृष्टी स्पष्ट केली. इसवी सन सातव्या-आठव्या शतकात आद्य शंकराचार्यांनी अद्वैतभक्तीचा मार्ग सांगितला.
अद्वैतभक्ती म्हणजेच ईश्वर व माणूस एक रूपच आहे, देव हा भावाचा भुकेला त्याला प्रसन्न करायला कर्मकांडांची आवश्यकता नाही, हा विचार. आद्य शंकराचार्य मूळचे केरळातील पेरिया उर्फ पूर्णा नदीच्या काठावरील कालडी गावचे. ते ३२ वर्ष जगले. त्यांनी पूर्ण भारतभ्रमण केले. त्यांनी मांडलेला विचार निवृत्तिनाथांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरांना मिळाला. ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्यांसाठी अद्वैतभक्तीचा मार्ग सांगितला व वारकरी संप्रदायाची स्थापना केली. पुढे हा विचार ज्ञानेश्वरांचे शिष्य नामदेवांनी उत्तरेत नेला. काशीला नामदेवाचे शिष्य रामानंदांकडून त्यांचे शिष्य संत कबीर यांना हा विचार मिळाला. कबीरांनी तो विचार हिंदीत प्रस्तुत केला. संत नामदेवांनी या विचारांचा प्रचार-प्रसार पंजाबमध्ये केला. महाराष्ट्रात संत तुकारामांनी याच विचाराचा विकास केला म्हणूनच म्हणतात-
'ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस'
मराठीची गौरवपताका ज्या जोडगोळीमुळे अभिमानाने डोलते ती हीच ज्ञानबातुकोबाची जोडी. इसवी सन १३१० पर्यंत महाराष्ट्रात यादवांचे राज्य होते. यादवांनी ठिकठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण अशी हेमाडपंथी मंदिरे बांधली, याच काळात भास्कराचार्यांनी 'लीलावती' हा गणितावर संस्कृत भाषेतील ग्रंथ लिहिला. १३२५ ते १५६५ दक्षिण भारतात विजयनगरचे साम्राज्य होते. पण, तेराव्या शतकापासून महाराष्ट्रावर इस्लामी आक्रमणे सुरू झाली. अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुघलक, मुघल व सुलतानशाही यांनी सोळाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत महाराष्ट्राच्या बऱ्याच मोठ्या भागावर राज्य केले. यादवांच्या अस्तानंतर समाज जागृत व एकसंघ ठेवण्याचे काम संतांनी केले. संतांचे कार्य, यादवांचा इतिहास व छत्रपती शिवरायांची प्रेरणा यातून मराठ्यांनी देशभर साम्राज्य उभे केले. कितीही संकटे आली, प्रचंड प्रतिकूल परिस्थिती असली तरी मोठी स्वप्ने पाहता येतात व ती सत्यात उतरवता येतात, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यनिर्मितीसोबत भाषा शुद्धीकरणाच्या चळवळीचे बहुमोल कार्य केले.कारण, मराठीत मोठ्या प्रमाणात फारसी शब्दांचा वापर होत होता. त्यांनी 'राज्यव्यवहार कोश' निर्माण करताना त्याची संकल्पना त्यांनी विजयनगरच्या साम्राज्याकडून घेतली व विजयनगरच्या साम्राज्याने वेद-उपनिषदांमधून घेतल्याचे पुरावे त्र्यंबक शंकर शेजवलकर या जागतिक दर्जाच्या इतिहासकाराने दाखवून दिले आहे. स्वराज्याच्या सीमेबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहून ठेवले आहे. सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत व पेशावरपासून तंजावरपर्यंत हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा!
महाराष्ट्र नेहमी देशासाठी लढला. पानिपतचे युद्ध केवळ मराठे मराठी सत्तेसाठी लढले नाही. दिल्लीची सत्ता पुन्हा परकीयांच्या ताब्यात जात होती, ती वाचवण्यासाठी लढले. आज पानिपतच्या आठवणीने ही प्रत्येक मराठी मन सुन्न होते. अब्दाली हे कळून चुकला होता व युद्ध जिंकल्यावरही परत गेला.
पुढे १८३२मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी 'दर्पण'च्या माध्यमातून पहिले वृत्तपत्र सुरू केले.पेशव्यांच्या दरबारी असणारे गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी) यांनी आपल्या दोषांचा अभ्यास करत शतपत्रे लिहिली. येथे स्वतःकडे कठोरपणे पाहण्याची मराठी माणसाची वृत्तीच अधोरेखित होताना दिसते. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंच्या रुपात क्रांतिकारकांचे किंवा भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांच्या रुपात राजकीय सुधारणेचे किंवा फुले-शाहू-आंबेडकरांच्या रुपात समाज व धर्मसुधारणेचेही महाराष्ट्र केंद्रबिंदू ठरले. समाजात सर्व प्रकारची समानता निर्माण व्हावी, म्हणून फुले-शाहू-आंबेडकर यांनी जीवाचे रान केले. हिंदू राष्ट्रवादाचा विचार मांडणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे या विचारधारेचे एक, तर दुसरे रा. स्व.संघाचे प्रणेते डॉ. हेडगेवार यांच्या विचारांचे मुख्य केंद्र महाराष्ट्रातील नागपूर हे होते.
मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रात मराठी प्रतिभेचे योगदान मांडतांना मराठी माणसाचे काम हे प्रत्येक गोष्टीच्या खोलवर जाऊन ठसा उमटवणारे आहे. इतरांनी केले त्याचे निरीक्षण करून त्यात नवी भर घालून नवे काम करणे हेच मराठी माणसाचे खरे वैशिष्ट्य आहे. या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा, मराठी भाषेचा व मराठी माणसाच्या कार्यकर्तृत्वाचा धावता इतिहास माझ्या अल्प बुद्धीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
- प्रा. प्रशांत शिरूडे
(लेखक के. रा. कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, डोंबिवली येथे कार्यरत आहेत.)