आशिया चषक...भारताला 2 सुवर्ण आणि 6 रौप्य
दिनांक : 20-Mar-2022
Total Views |
थायलंड : थायलंड येथील फुकेत येथे संपन्न झालेल्या आशिया कप वर्ल्ड रँकिंग स्टेज-1 तिरंदाजी स्पर्धेत भारताने दुसरे स्थान पटकावले आहे. या स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी चमकदार कामगिरी करत दोन सुवर्ण आणि सहा रौप्य पदके जिंकली आहेत.
दक्षिण कोरिया, चीन, चायनीज तैपेई आणि जपानसारख्या मजबूत संघांनी तिरंदाजीच्या या एशिया कपमध्ये भाग घेतला नाही. तिरंदाजीच्या या स्पर्धेत भारताने 10 पैकी 7 फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र असं असलं तरी भारताला फक्त दोन सुवर्णपदकेच मिळू शकली आहेत. भारतीय खेळाडूंनी एकूण पाच अंतिम सामने गमावले. यातील दोन बांगलादेशविरुद्ध होते. बांगलादेशचा संघ तीन सुवर्ण आणि एक रौप्यपदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
रिकर्व्ह पुरुष सांघिक आणि कंपाऊंड महिला वैयक्तिक गटात भारताला दोन सुवर्णपदके मिळाली. पार्थ साळुंखे, राहुल नगरवाल आणि धीरज बी यांनी रिकर्व्ह पुरुष गटात संघासाठी सुवर्णपदक जिंकले. या त्रिकुटाने कझाकिस्तान संघाचा 6-2 (53-53, 57-57, 56-55, 57-54) असा पराभव केला. दुसरीकडे, द्वितीय मानांकित साक्षी चौधरीने शूट-ऑफमध्ये 13व्या मानांकित देशबांधव प्रनीत कौरचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत रिकर्व्ह महिला सांघिक स्पर्धेत रिद्धी फोरे, तिशा पुनिया आणि तनिषा वर्मा यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. रिद्धी फोर आणि पार्थ साळुंखे यांच्या रिकर्व्ह संयुक्त संघानेही रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. ऋषभ यादवला कंपाऊंड पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेत रौप्यपदक मिळाले. भारताच्या मिश्र पुरुष आणि महिला संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. प्रनीत कौरला कंपाऊंड महिला वैयक्तिक गटात रौप्य पदक मिळाले.