जळगाव : आज २ मार्च आजच्या दिवसाबद्दल समस्त नंदुरबार जिल्ह्यातील तसेच तमाम महाराष्ट्रातील जनतेला माहिती असलेली किंवा बरेच जणांना माहितीच नसलेली घटना म्हणजे महाराष्ट्रात घडलेली जालियनवाला बाग हत्याकांडा सारखे रावलापाणी येथील आदिवासी बांधवांचे हत्याकांड...
आजच्याच दिवशी महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात रावलापाणी येथे इंग्रजांनी 2 मार्च 1943 रोजी जालियनवाला बाग हत्याकांड याची पुनरावृत्ती केली होती. या घटनेत आपल्या आदिवासी बांधवातील जवळपास पंधरा ते वीस लोक शहीद आणि अनेक जण गंभीर जखमी झाले होते.
कविवर्य कुसुमाग्रज यांनी त्यांच्या एका कवितेत मराठी वीरांची ऐतिहासिक घटना सांगताना लिहून ठेवले होते की,
" दगडावर दिसतील अजूनि तेथल्या टाचा,
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा "
अशीच काहीशी भावना या स्वातंत्र्यवीरांच्या पवित्र स्मारकास भेट देऊन मनात येत होती.
रावलापाणी हे ठिकाण तळोदा शहरापासून साधारण पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर आहे. येथे येण्यासाठी तळोदा- सावर- हातबारी -व -रावलापाणी असा प्रवास करावा लागतो.
1943 साली 'चलेजाव चळवळीने' इंग्रज राजवटीला जेरीस आणले होते. याच चलेजाव चळवळी मध्ये खानदेशातील आदिवासी बांधवांनी मोलाचे योगदान दिले आहे. चलेजाव चळवळीत सक्रिय योगदानासाठी 'आप धर्माचे' प्रमुख 'संत रामदास महाराज' यांनी जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना 4 मार्च 1943 रोजी महाशिवरात्रीला आरती व पूजनाच्या कार्यक्रमाला हजर राहून चळवळीस पाठिंबा देण्याचे व सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
महाशिवरात्रीच्या या कार्यक्रमाला पोहोचण्यासाठी मार्गक्रमण करीत असताना 2 मार्च 1943 रोजी हजारो आदिवासी बांधव निझरा नदीपात्रात जमले होते. चलेजाव चळवळीतील जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा हा सक्रिय सहभाग पाहता, ब्रिटिश सरकारने 02 मार्च 1943 रोजी रावलापाणी जवळील निझरा नदी पात्रात जमलेल्या हजारो आदिवासी बांधवांवर अमानुष पद्धतीने गोळीबार केला. यात जवळपास पंधरा ते वीस आदिवासी बांधव मृत्युमुखी पडले तर अनेक जण गंभीर जखमी झाले.
गोळीबार होणार याची पूर्वकल्पना संत रामदास महाराज यांनी सर्व भक्तजनांना दिली होती. तरीही आप धर्माच्या अनुयायांनी न डगमगता, न घाबरता पुढे निघाल्याची नोंद आहे. या संदर्भात तळोदा पोलीस ठाण्यात नोंदही आहे. या अमानुष गोळीबाराची साक्ष म्हणून रावलापाणी येथील निझरा नदीपात्रातील दगडावर असलेल्या गोळीबाराच्या खुणा येथील समाज बांधवांनी आजही जतन करून ठेवल्या आहेत. येथील वातावरणात आजही एक प्रकारचे देशप्रेम, स्वातंत्र्या बद्दलची ओढ, भक्ती आणि त्याच सोबत निडरता आजही ठासून भरल्याचे जाणवते.
येथे आल्यावर आपण त्या वेळी येथे नेमके काय झाले असेल? कशाप्रकारे अमानुष गोळीबार झाला असेल ? आणि कशाप्रकारे आपले आदिवासी बांधव निधड्या छातीने जुलमी, अन्यायी ब्रिटीशांना सामोरे गेले असतील? याची प्रचिती घेऊ शकतो.
नंदुरबार जिल्ह्यातील शिरिषकुमार स्मारक असो की रावलापाणी हे ठिकाणं वारंवार हेच सिद्ध करतात की खानदेशातील जनतेने मृत्यू पेक्षाही अधिक महत्त्व देव, देश आणि स्वातंत्र्य यांना दिले आहे. येथील जनतेने नेहमी अन्याय, अत्याचार याचा नेटुन विरोध केला आहे व आपल्या देशासाठी, आपल्या धर्मासाठी प्राणांची आहुती देण्यास मागे पुढे पाहिले नाही.
आजच्या दिवसाची आठवण म्हणून या ठिकाणी दर वर्षी ०२ मार्च रोजी आप धर्माकडून व आदिवासी बांधवांकडून सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम होतो. रावलापाणी येथिल या घटनेला आता 80 वर्ष पूर्ण होत आहे, त्यानिमित्ताने या शहीद वीरांची आठवण चिरस्मरणात राहावी व समाजातील तरुणांसाठी एक प्रेरणा स्थान निर्माण व्हावे म्हणून एक भव्य स्मारक होणे गरजेचे आहे.
आपल्या खानदेशातील शहीद वीरांची आठवण म्हणून केलेला छोटा लेखन-प्रपंच. रावलापाणी येथील शहीद वीरांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली