पुणे : रेल्वे बोर्डाने जनरल तिकिटावरचे निर्बंध हटविले आहे. . पुण्याहून धावणाऱ्या तीन रेल्वे गाड्यांना जनरल तिकीट दिले जाणार आहे. मात्र, त्यासाठी प्रवाशांना १ जुलैपर्यंत वाट पहावी लागणार आहे. १ जुलैपासून तीन गाड्यांसाठी जनरल तिकीट विक्री सुरू होत आहे.मात्र, नो डेट बुकिंगची अट घातली. त्यामुळे ज्या दिवसापर्यंत जनरल कोचचे आरक्षित तिकीट काढले गेले त्या दिवसापर्यंत जनरल तिकीट दिले जाणार नाही.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत बंद झालेली जनरल तिकीट विक्रीची सेवा आता पुन्हा सुरू होत आहे. पश्चिम रेल्वेने या संबंधीची यादी जाहीर केली आहे. त्यात पुण्यातून सुटणाऱ्या पुणे-वेरावल, पुणे-अहमदाबाद व पुणे-भुज या गाड्यांचा समावेश आहे. मध्य रेल्वेने मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.
या रेल्वेत मिळणार जनरल तिकीट :
पश्चिम रेल्वेने जवळपास १०० गाड्यांना जनरल तिकीट विक्री लागू करण्याचा निर्णय घेतला. यात पुणे-वेरावल, पुणे-अहमदाबाद व पुणे-भुज या गाडीचा समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांना १ जुलैपासून या तीन गाड्यांना जनरल तिकिटाची विक्री होणार आहे. जनरल तिकिटामुळे सामान्य प्रवाशांची सोय होईल.
मार्चच्या अखेरपासून रेल्वेचा गर्दीचा हंगाम सुरू होत आहे. तो जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालतो. जनरल तिकिटाची विक्री १ जुलैपासून सुरू होत आहे. त्यामुळे प्रवाशांना गर्दीच्या हंगामात आरक्षित तिकीट काढूनच प्रवास करावा लागणार आहे. आरक्षित तिकिटामुळे प्रवाशांची जास्तीची रक्कम जाईल. परिणामी रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.