मुंबई : उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, उत्तराखंड आणि पंजाबमधील निवडणुकीचे निकाल हाती येत आहे, सत्ताधा-यांची मजल दरमजल सुरु असल्याच्या चर्चांनी बाजारात उधाण आले आहे. बाजारात पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झाले असून मुंबई निर्देशांकांने घेतली 1552 अंकांची उसळी तर निफ्टीमध्ये 411 अंकांची तेजी नोंदवली आहे.
आज पाच राज्यांचे निकालांचे पडघम वाजू लागले आहेत. सत्ताधा-यांच्या बाजूने कल जाताच बाजारात तेजीची लहर पसरली. बाजाराने सुरुवातीच्या सत्रातच उसळी मारली. बीएसई सेन्सेक्सआणि निफ्टी 50 (NIFTY 50) ने व्यापा-याच्या 2 टक्के जास्त आघाडी घेतली. आंतरराष्ट्रीय बाजारातील कालच्या काही घडामोडींमुळे बाजाराला मदत मिळाली होती. तर आज देशातील पाच राज्यातील निवडणुकींचे निकाल धडकायला लागताच बाजाराने कूस बदलली. बीएसई सेन्सेक्सने 1100 अंकांची भरारी घेतली, बीएसई सध्या 55,800 अंकाच्या पातळीवर आहे. तर एनएसई निफ्टी 50 ने 500 अंकांची उडी घेतली आहे. हा निर्देशांकाने सध्या 16757 पातळीच्या मोर्चोवर जम बसविला आहे. सर्वात मोठी बातमी म्हणजे आज निर्देशांकाने नकारात्मक नाही तर सकारात्मक सुरुवात केली आणि अनेक कंपन्यांच्या शेअरची हिरव्या संकेतवरघौडदौड सुरु आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांना आज मोठे हायसे वाटले असणार. गुंतवणुकदारांचे आणि जनतेचे देशातील निकालांकडे लक्ष लागले आहे. कारण दिल्लीच्या सत्तेचा राजमार्ग उत्तरेतील राज्यांमधून जातो. भविष्यातील देशाच्या घडामोडींचे अंदाज या निकालातून बांधता येणार आहे.
या शेअरमध्ये तेजीचे सत्र
अॅक्सीस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, बजाज फिशरीव्ह, एशियन पेटंस्, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फायनान्स यांनी आज निर्देशांकात कमालीची आघाडी घेतली आहे. हे शेअर घौडदौड करत आहेत. तर निफ्टी मेटलसह इतर विभागातही आनंदाची लहर दिसून येत आहे. या विभागातील अनेक शेअर सकारात्मक दिशेने घौडदौड करत आहे. बँक निफ्टीत ही कमालीची तेजी दिसून आली. बँक निफ्टीत 3.6 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर निफ्टी ऑटो 3.15 टक्क्यांनी वधरला, निफ्टी एफएमसीजीत 2 टक्क्यांची वाढ झाली. तर निफ्टी आयटी इंडेक्समध्ये अर्ध्या टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे.
रुपया वधारला
आज भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 28 पैशांनी वधरला. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 76.28 रुपये इतका होता. काल डॉलरची किंमत 76.56 रुपये होती. कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने, युएई आणि ईराण तेलाचे उत्पादन वाढवणार असल्यांच्या बातम्यांनी रुपयाला थोडी बळकटी मिळाली आहे. आयसीआयसीआय डिरेक्टच्या मतानुसार, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे रुपया आज मजबूत स्थिती राहील. तर दुसरीकडे डॉलर ही गेल्या काही दिवसांपेक्षा मजबूत स्थिती राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. निवडणुकातील निकालांचे परिणाम येत्या काही दिवसात शेअर बाजारावरही दिसून येतील.