अखेरचा हा तुला दंडवत

    दिनांक : 07-Feb-2022
Total Views |
भारतीय चित्रपट संगीत एक प्रचंड मोठे भांडार आहे. त्या भांडारातील एक मोठा भाग लता मंगेशकर या गानकोकिळेच्या अवीट गोडीच्या गाण्यांनी भरलेला आहे. आपल्या स्वर्गीय आवाजाने कोट्यवधी रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज रविवारी निमाला. लतादीदींच्या सांगितीक कारकिर्दीचा आढावा घेणारा हा श्रद्धांजलीपर लेख...
 

Lata Mangeshkar
 
‘स्वराज्य तोरण चढे, गर्जती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे...’ शांता शेळकेंच्या शब्दांना स्वरसाज चढवणारी व्यक्ती ही त्यातल्या ‘मराठी पाऊल पडते पुढे’चे मूर्तिमंत उदाहरण, यात काहीही अतिशयोक्ती ठरणार नाही. आठ दशकांहून अधिक काळ हिंदी, मराठीसोबत भारतातील जवळजवळ सर्व भाषांतील हजारांच्या घरातील गाणी, मराठी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन, अशी त्यांची देदीप्यमान कारकिर्द. ते मराठी पाऊल अवघे जग व्यापून दशांगुळे उरले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ते आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणजे लता मंगेशकर. सर्वांच्या लाडक्या लतादीदी. त्यांच्या अचाट, अफाट कामगिरीचा यथोचित गौरव झाला. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’, चित्रपट जगतातील सर्वोच्च ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आणि अगणित सन्मान त्यांना मिळाले. कित्येक पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या. पण प्रत्येक पिढीला त्या ‘आपल्या’ वाटत आलेल्या आहेत. हे आपलेपण, हा जिव्हाळा, हे प्रेम, एखाद्याच्याच वाट्याला येते. ते आयुष्याचे संचित गाठण्यासाठी कुठली तपश्चर्या करावी लागत नाही. आपण निवडलेले क्षेत्र, त्यातली उत्तमता, उत्कृष्टता हीच तपश्चर्या होते.
 
‘मुली औक्षवंत हो’ असा आशीर्वाद देताना पुलंनी यथार्थ वर्णन केले आहे की, “आमची पहाट लताच्या सुरांबरोबर उमलते. मध्यान्ह, सांज, रात्र, मध्यरात्र याच सुरांची साथ घेऊन येतात. वातावरणात कुठेना कुठेतरी लताचे स्वर मावळत्या किंवा उगवत्या सूर्य-चंद्राच्या साक्षीने विहरत असतात.” शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक उस्ताद बडे गुलाम अली आपल्या अनोख्या शैलीत म्हणतात, “कंबख्त कभी बेसुरीही नहीं होती।” श्रेष्ठ संगीतकार सचिन देव बर्मन अनेक वेळा म्हणत असत, “लता आणि हार्मोनियम द्या, मी संगीत निर्माण करेन.” सज्जाद हुसैनसारखे कलंदर, काहीसे विक्षिप्त संगीतकार, त्यांनी “सिर्फ लता गाती हैं, बाकी सब रोती हैं” असे उद्गार काढले होते. लतादीदी उत्कृष्ट आहेतच. त्यात वाद नाही. पण इतरांची अशी संभावना कशाला असा प्रश्न आपल्याला पडतो, पण तो कलंदर कलावंत बोलून गेला. १९६२च्या भारत-चीन युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ तयार झालेल्या अजरामर ‘ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी’ गाण्यावर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी, ‘बेटी तुमने मुझे आज रुला दिया’ असे उद्गार काढले होते.
 
गेल्या सात दशकांत अनेक पिढ्या बदलल्या. लोकांची अभिरुची बदलली. तंत्रं बदलली. पण या सर्वात एक गोष्ट कायम राहिली ती म्हणजे काळानुरूप बदल स्वीकारत गेलेला, तरीही आपला आब राखलेला तो दिव्य आवाज. असं काय गूढ आहे त्या आवाजात की, येणारी प्रत्येक नवी पिढी प्रेमातच पडते! शोध घ्यायचा प्रयत्न केला तर मती गुंग होते. शेवटी विचार करुन एका निष्कर्षावर यावे लागते ते म्हणजे कसलाही शोध घ्यायच्या फंदात पडायचे नाही. लता मंगेशकर नावाच्या अलौकिक गळ्यातून उमटलेली अवीट गोडीची गाणी ऐकायची. सुखाची, समाधानाची, आनंदाची परमावधी अनुभवावी. त्या विधात्याचे, परमेश्वराचे आभार मानावे की, त्याने सहस्रकातून निर्माण होणारी मनुष्यरूपी वीणा या भरतभूमीत पाठवली. भारतीय चित्रपट संगीत हे एक प्रचंड मोठे भांडार आहे. त्या भांडारातील एक मोठा भाग लता मंगेशकर या गानकोकिळेच्या अवीट गोडीच्या गाण्यांनी भरलेला आहे. एखाद्या चित्रपट संगीत चाहत्याला, त्यातही लतादीदींच्या चाहत्याला बुचकळ्यात पाडायचं असेल, त्रेधातिरपीट उडवायची असेल, तर सर्व गाण्यांचा जवाहिरखाना समोर ठेवायचा आणि सांगायचं, “यातलं सर्वात आवडतं जवाहिर निवड.” काय कपाळ निवडणार? धांदल उडेल. पण या धांदलीत एक गोष्ट चांगली होईल की, निवड करण्याच्या बहाण्याने त्या विशाल सागरात मनसोक्त विहार होईल. केवढा प्रचंड आकार तो! खेमचंद प्रकाश ते आजच्या ए. आर. रहमान ते मराठीतील सलील कुलकर्णी अशा संगीत दिग्दर्शकांची प्रचंड यादी. कोणाचं, कुठलं गाणं आठवावं? चित्रपट संगीतात नव्या सांगीतिक वादळाच्या आगमनाची नांदी देणारं ‘आएगा आनेवाला’पासून सुरुवात करता येईल कदाचित. पण थांबायचं कुठे? अंतच लागत नाही.
 
सज्जाद हुसैन यांनी संगीत दिलेल्या ‘संगदिल’ सिनेमातलं ‘दिल में समा गए सजन’ समोर ठेवलं की ‘तराना’मधले ‘सीने में सुलगते हैं अरमान’ दिसायला लागते. एका बाजूला सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेल्या ‘अलबेला’मधील ‘धीरे से आ जा रे अखियन में’ ही कदाचित हिंदी चित्रपट संगीतातील सर्वोत्कृष्ट लोरी, तर दुसर्‍या बाजूला त्यांच्याच ‘अनारकली’मधलं कारुण्यपूर्ण ‘ये जिंदगी उसीकी हैं’ ही रेंज. गजल आणि भावपूर्ण संगीत देणार्‍या मदन मोहन यांच्याकडील ‘आप की नजरों ने समझा प्यार के काबील’, ‘नैना बरसे रिमझिम’ किंवा मदनमोहन यांनी रचलेल्या चाली वापरून केलेली ‘वीर-झारा’ सिनेमातली गाणी. सलील चौधरी यांनी संगीत दिलेल्या ’मधुमती’मधली सगळीच गाणी त्यातही ‘आजा रे परदेसी’सारखं गाणं आणि ‘हाफ टिकिट’मधील ‘वह इक निगाह क्या मिली’ गाण्यातील ‘इंटरल्यूड.’ त्या ‘इंटरल्यूड’मधील तान मानवी गळ्यातून निघाली आहे, यावर विश्वास बसणं कठीण आहे. पण तो मानवी गळा लता मंगेशकर असेल, तर अशक्य काहीच नाही. लतादीदी आणि सचिन देव बर्मन यांच्यातला अबोला, बेबनाव, बर्मन यांच्या एका ‘लता, आजा, तुझे गाना हैं’ या एका वाक्यावर संपला, आणि ‘बंदिनी’ सिनेमातलं ‘मोरा गोरा अंग लै ले’सारखं अवीट गोडीचं गाणं जन्माला आलं. चित्रपट संगीतात धमाल कव्वालीसोबतच सर्व प्रकारचं संगीत देणार्‍या रोशन यांच्यावर लतादीदींनी त्या निर्माण करू इच्छित होत्या, अशा ‘भैरवी’ सिनेमाचं संगीत विश्वासाने सोपवलं होतं. तो सिनेमा निघाला नाही. संगीतकारांच्या पिढ्या बदलत गेल्या. तंत्रं बदलत गेली. पण तो अलौकिक गळा गातच राहिला. थोरल्या बर्मनदांकडे ‘बंदिनी’ ते ‘आराधना’ आणि नंतरही गाणार्‍या लतादीदींनी राहुल देव बर्मन यांच्याकडेही अनेक उत्कृष्ट गाणी गायली. त्यातही सर्वोत्कृष्ट म्हणता येईल ‘आंधी’ हा अल्बम. ‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा’, ‘इस मोड से जाते हैं’ ही गाणी अत्युच्च सांगीतिक आनंद देणारी आहेत.
 
लतादीदींच्या एकल गाण्यांसोबतच युगल गीतांचेही प्रचंड भांडार आहे. लता-रफी, लता-किशोर, लता-तलत, लता-हेमंत कुमार, लता-मन्ना डे, लता-येसूदास ते लता-उदित नारायण, लता-कुमार सानू अशी मोठी यादी आहे. प्रत्यक्ष जोडीची एक-एक गाणी निवडणे हे एक दिव्यच आहे. पण एकेकच भन्नाट गाणी सांगायची, तर, ‘ताज महल’मधील लता-रफी यांचं ‘जो वादा किया वो निभाना पडेगा’ हे ऐका. लता-किशोर जोडीचं ‘अभिमान’मधील ‘तेरे मेरे मिलन की ये रैना’ ऐका. लता-तलत यांचे ‘तराना’ मधले ‘नैन मिले नैन हुए बावरे’ ऐका. लता-हेमंत कुमार यांचे ‘पतिता’मधले ‘याद किया दिल ने कहाँ हो तुम’ ऐका. लता-मन्ना डे यांचे ‘बसंत बहार’मधील ‘नैन मिले चैन कहाँ’ ऐका. लता-उदित नारायण यांचे ‘दिल तो पागल हैं’मधले ‘कब तक चूप बैठे, अब तो कुछ है बोलना’ ऐका. लता-कुमार सानू यांचे ‘जब प्यार किसीसे होता हैं’मधले ‘मदहोश दिल की धडकन’ ऐका. ही यादी वाटेल तेवढी वाढवता येईल. ‘महल’मधल्या नवख्या मधुबालाला जो आवाज शोभला तो पुढील काळात हेमा मालिनी, अमृता सिंग, माधुरी दीक्षित, काजोल वगैरेंनादेखील चपखल बसला. वयाच्या त्या टप्प्यावरदेखील ‘दीदी तेरा देवर दिवाना’, ‘चॉकलेट लाईम ज्यूस आईस्क्रीम टॉफीया’ ही गाणी श्रवणीय वाटली. पुढल्या काळात त्या दैवी आवाजाला न्याय दिला तो ए. आर. रहमान या तितक्याच तोलामोलाच्या संगीतकाराने. मणिरत्नमच्या ‘दिल से’मधले ‘जिया जले जां जले’, ‘लगान’मध्ये परमेश्वराला घातलेली आर्त हाक ‘ओ पालनहारे’ आणि काळजाला हात घालणारे ‘रंग दे बसंती’मधील ‘लुकाछुपी बहुत हुई’ ही गाणी खरोखर वेगवेगळा पण दैवीय आनंद देतात.
 
हिंदी चित्रपटांबरोबरच लतादीदींची मराठी संगीतातील कारकिर्द तर दुहेरी आहे. गायिका त्याचबरोबर अनेक चित्रपटांच्या संगीत दिग्दर्शक म्हणून. त्यांनी ‘आनंदघन’ या नावाने संगीत दिग्दर्शन केले. त्यात ‘साधी माणसं’ चित्रपटातले ‘ऐरणीच्या देवा’ आहे, ‘मराठा तितुका मेळवावा’मधील ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘शूर आम्ही सरदार आम्हाला’, ‘मोहित्यांची मंजुळा’मधील ‘बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला’ ते कित्येक गाणी. यादी करायला बसलो तर ‘धुंडिराज’ होऊन जातो. मराठी चित्रपट गीतांबरोबरच भजन, अभंग, भावगीत असे अनेक प्रकार त्यांनी गायले. त्यात संत ज्ञानेश्वरांच्या ‘अवचिता परिमळू’, ‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा’ अशा विरहिणी आहेत. श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेली ‘श्रावणात घननीळा बरसला’ अशी भावगीते आहेत. पंडित भीमसेन जोशींसोबत ‘भैरवी’ रागातील ‘बाजे रे मुरलीया बाजे’ हे भजन आहे. बंधू पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेल्या ‘जैत रे जैत’मधील ‘मी रात टाकली’ असो की ‘उंबरठा’मधील ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या’ अशी किती गाणी! पण या सर्वांचा कळसाध्याय आहे तो शब्दप्रभू स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितांना त्यांनी दिलेला स्वरसाज. ‘जयोऽस्तुते श्री महन्मंगले’ हे स्फूर्तिगीत, मातृभूमीच्या ओढीने सागरास घातलेली साद, ‘सागरा प्राण तळमळला’ स्वातंत्र्यवीरांचे शब्द सुयोग्य चाल, योग्य कंठातून उमटले. ते अजरामर झाले. असाच दुसरा अप्रतिम आविष्कार म्हणजे ‘शिवकल्याण राजा’, शिवरायांची आरती ‘जय देव जय देव जय जय शिवराया, या या अनन्य शरणा आर्या ताराया’ बाल शिवबाला स्वातंत्र्याची अंगाईगीतातून स्वातंत्र्याची शिकवण ‘गुणी बाळ असा जागसी का रे’ शिवरायांचे ते साक्षात नृसिंह रुप ‘हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा’ ते समर्थ रामदासांच्या प्रतिभेतून उमटलेला शिवरायांच्या कौतुकाचा वर्षाव ‘निश्चयाचा महामेरू’ या अद्वितीय कार्यासाठी त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे. आभार मानावे तेवढे थोडे.
 
गोव्याच्या मंगेशीच्या महादेवाच्या अभिषेकाचा मान असणारे हे घराणे. घरात कीर्तन परंपरा. गायनाचा ध्यास घेऊन दीनानाथ नाटक कंपनीत गेले. ते नाट्यसंगीत क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करणारे मास्टर दीनानाथ मंगेशकर झाले. त्या अद्वितीय गायक-नटाची लता ही थोरली लेक. दीनानाथांच्या अकाली निधनानंतर घराची जबाबदारी आलेली. त्यांनी आपल्या थोर पित्याचा वारसा पुढे चालवत, तो वृद्धिंगत करत, त्रिकाल कीर्ती मिळवली. लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही सर्वच भावंडे सरस्वतीचे वरदान घेऊन आली. लतादीदींनी दिगंत कीर्ती मिळवली. उदंड यश, प्रेम, जिव्हाळा त्यांना लाभला. उदंड आयुष्य त्यांना लाभले. पण जन्माला यायचा तो एक दिवशी जाणारच. जन्म-मृत्यूचा फेरा कोणाला चुकला नाही. चुकणार नाही. त्या कातर भावना बाकीबाब बोरकरांनी कागदावर उतरवल्या आहेत. अगदी अलीकडे डॉ. सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केल्या. त्याच दैवी आवाजाने त्या भावना स्वरसाजात उतरवल्या.
 
आयुष्याची आता झाली उजवण
येतो तो क्षण अमृताचा
जें जें भेटे तें तें दर्पणाचे बिंब
तुझे प्रतिबिंब लाडे गोडे
संधीप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी...
 
भरल्या अंतःकरणाने त्या अलौकिक व्यक्तीला निरोप देताना, शांता शेळक्यांचे शब्द हाताशी घ्यावे वाटतात, अखेरचा हा तुला दंडवत.
 
- शौनक कुलकर्णी
९४०४६७०५९०