तुम्ही कुणाच्या प्रेमात असाल किंवा नसालही पण तुम्ही एका गाण्याच्या निश्चित प्रेमात असणार याची खात्री आहे ते गाणं आहे, ‘लग जा गले…’ 58 वर्षांपूर्वी हे गाणं आलं आणि या गाण्याने श्रवणीय कानांचा ठाव घेतला तो आजतागायत… हे गाणं ऐकलं नाही असं क्वचितच कुणी असेल. या गाण्याचे शब्द, चाल, संगीत आणि विशेष म्हणजे लतादिदींच्या आवाजाने तर या गाण्याला चार चांद लावले. हे गाणं कुणी लिहिलं? या गाण्याला संगीतबद्ध कुणी केलं? या गाण्याची चाल ठरवताना मदन मोहन आणि राज खोसला यांच्यात नेमका कोणत्या मुद्द्यावरुन वाद झाला? लतादीदींच्या आवाजातील गाण्याचे सूर… या अजरामर गाण्याची निर्मिती आणि गाण्याभोवतीच्या किश्यांचा खास नजराना तुमच्यासाठी…
‘लग जा गले….’ या गाण्याचे शब्द म्हणजे एका प्रेयसीने आपल्या प्रियकराला घातलेली आर्त साद आहे. या गाण्याचे शब्द इतके अर्थपूर्ण आहेत की हे गाणं ऐकणाऱ्या प्रत्येकाला ते आपल्या हृदयातून आल्यासारखे वाटतात. ‘लग जा गले की, ये हसीं रात हो ना हो… शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो…’ हे शब्द राजा मेहंदी अली खान यांचे आहेत. या शब्दांची जादू आजही कायम आहे. ‘आखरी गीत मोहब्बत का’, ‘नयना बरसे रिमझिम’, ‘एक हसिना शाम को…’ अशी उत्तमोत्तम गाणी देणारे राजा मेहंदी अली खान यांचं ‘लग जा गले’ गीत मात्र गेल्या सहा दशकांपासून रसिकांच्या ओठांवर आहे.
‘लग जा गले….’ या गाण्याचे शब्द जितके अर्थपूर्ण आहेत, तितकंच या गाण्याचं संगीतही श्रवणीय आहे. हे सुमधूर संगीत दिलंय संगीतकार मदन मोहन यांनी…. दिग्दर्शक राज खोसला हे काही गाण्यांच्या चाली ऐकण्यासाठी मदन मोहन यांच्या घरी गेले. मदन मोहन यांनीही एक चाल ऐकवली जी ऐकून राज खोसला यांना ती काही ‘खास’ वाटली नाही आणि खोसला यांनी ती रिजेक्ट केली.
ते म्हणाले की, ‘या धूनमध्ये ‘मजा’ नाही आली. अजून दुसरं काही असेल तर ऐकवा’… मदन मोहन म्हणाले, ‘माझ्याकडे सध्या तरी एवढीच चाल आहे. या व्यतिरिक्त माझ्याकडे काहीही नाही’. या उत्तराचं राज खोसला यांनाही वाईट वाटलं… ते घरी परतले आणि त्यांनी नव्या संगीतकाराचा शोध घ्यायला सुरुवात केली. दिवसामागून दिवस गेले. राज खोसला यांच्या कानात ते संगीत घुमत राहिलं अन् अखेर त्यांनी ठरवलं की ते संगीत आपल्या गाण्यासाठी घ्यायचं. पण मदन मोहन जिद्दी होते… मग राजा खोसला यांनी चित्रपटातील हिरो मनोज कुमार यांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचायचं ठरवलं. ते मनोज कुमारांच्या माध्यमातून पोहोचलेही… पुन्हा एकदा ते संगीत ऐकलं आणि राज खोसला हुंदके देऊन रडू लागले. अन् म्हणाले की मदन मला माफ करा… मी एवढ्या चांगल्या संगीताला नाकारलं. हे गाणं आजही कानावर पडलं की प्रत्येकाची तऱ्हा राजा खोसलांसारखीच होते.
लतादीदींच्या आवाजातील गाणं
‘लग जा गले….’ हे गाणं ऐकलं की डोळ्यात पाणी येतं. या गाण्याला लता मंगेशकरांचा आवाज लाभला आणि गाणं अजरामर झालं. लता मंगेशकरांनी हे गाणं म्हणजे संगीत रसिकांसाठी पर्वणीच. प्रियकराने प्रेयसीला घातलेली आर्त साद लतादिदींच्या आवाजात अधिक प्रभावीपणे पोहोचते. आपल्या प्रियकाराला साद घालण्यासाठी कित्येक प्रेयसींनी याच गाण्याचा आधार घेतला. एकदा विरहातली भेट झालीच आहे तर परत कधी भेट होणार, तेव्हा आताच कडकडून मिठी मार, असं सांगताना ‘शायद इसी जनम में मुलाखात हो ना हो’, हे लतादीदींनीच गावं…!
1950 ते 1975 ही 25 वर्ष म्हणजे सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ. या काळात बरेच दर्जेदार सिनेमे तयार झाले. शिवाय अजरामर गाण्यांची निर्मिती झाली. लतादिदींसारखा सुमधूर सूर या काळात गवसला आणि याच काळात अधिकाधिक समृद्ध झाला. लतादिदींनी जवळपास ५० वर्ष संगीतसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. 35 भाषांत 30 हजारांहून अधिक गाणी गायली. पुढे याच लतादिदी भारतरत्न लतादिदी झाल्या.