पुणे: माझ्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. हा हल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशनानुसारच झाला आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्याकडे तक्रार करणार असून त्यासाठी गुरुवारी दिल्लीत जाणार आहे, असं सोमय्या यांनी सांगितलं. पुणे महापालिका परिसरात किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला होता. सोमय्या यांना महापालिका परिसरात रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर, त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. महत्वाची बाब म्हणजे शिवसैनिकांनी अंगावर धावून येण्याचा प्रयत्न करताच सुरक्षा रक्षक सोमय्यांना तिथून घेऊन निघाले. त्या गोंधळात सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवर सोमय्या कोसळले. त्यामुळे सोमय्या यांना दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावरील हल्ल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर काल जो हल्ला झाला. तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानेच झाला आहे. येत्या गुरुवारी मी दिल्लीत जाणार आहे. राष्ट्रीय डिझास्टरचे प्रमुख आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या हल्ल्याची तक्रार करणार आहे. तसेच उद्या रत्नागिरीला जाणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांचा बंगला पाडला की नाही याचा फॉलोअप घेण्यासाठी मी रत्नागिरीला जाणार आहे, असं सोमय्या यांनी सांगितलं.
एका व्हिडीओमध्ये काही शिवसैनिक सोमय्या यांच्या अंगावर धावून जाताना दिसून येत आहेत. काहीजण गाडीसमोर आडवे पडून सोमय्या यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. तर एक व्यक्ती सोमय्या यांच्या गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे. महत्वाची बाब म्हणजे एक महिला सोमय्या यांच्या गाडीवर चप्पल फेकत असल्याचंही एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यावरील हा हल्ला ठरवून केला गेला का? असा सवाल आता भाजपकडून करण्यात येत आहे.