तर्‍हाड कसबेत आकडे टाकून वीजचोरी ९ जणांवर गुन्हा दाखल

    दिनांक : 03-Feb-2022
Total Views |
धुळे : वीजबिलाच्या थकबाकीपोटी महावितरणने वीजपुरवठा खंडित केलेला असतानाही आकडे टाकून चोरीची वीज वापरणार्‍या ९ इसमांवर शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणतर्फे सध्या वीजबिलांच्या थकबाकीची वसुली मोहीम जोमाने सुरु आहे.
 
 
vija chori 
 
 
थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा या मोहिमेत खंडित केला जात आहे. तसेच वीजपुरवठा खंडित केलेला असतानाही कुणी अनधिकृतपणे वीज वापरत आहे का, याची पडताळणी करण्याचे निर्देश महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांनी सर्व अभियंते व कर्मचार्‍यांना दिलेले आहेत. त्यानुसार जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्ह्यातही अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार यांच्या पुढाकाराने अशी पडताळणी करण्यात येत आहे.
 
मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंत्यांनी स्वतः मोहिमेत भाग घेऊन दोंडाईचा व इतर भागात पडताळणी केली. प्रादेशिक कार्यालयाची पथकेही या मोहिमेत सामील झाली आहेत. याच पथकातील उपमहाव्यवस्थापक योगेश खैरनार व उपकार्यकारी अभियंता पाटील यांनी तर्‍हाड कसबे येथे भेट दिली असता काही ग्राहक आकडे टाकून वीज चोरी करताना आढळून आले. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी या ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. या प्रकरणी महावितरणच्या वरूळ कक्षाचे सहायक अभियंता दिनेश माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर पोलीस ठाण्यात पुंडलिक पाटील, नाना गिरासे, दिलीप पाटील, भटू कोळी, जगदीश सावळे, रमेश कोळी, संतोष कोळी, दिलीप मराठे व योगेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.