जळगावचे नाव जगाच्या नकाशावर झळकावणारे जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष श्रध्देय भंवरलालजी जैन उपाख्य मोठेभाऊ यांचा आज पुण्यस्मरण दिन... त्यानिमित्त त्यांच्या अनुकरणीय आचार,विचार आणि कार्यसंस्कृतीवर टाकलेला हा दृष्टिक्षेप...
विवेक, साहस, संयम आणि न्यायपूर्ण व्यवहार यातूनच सद्गुणी संस्कारांचे दर्शन होते. या चार गुणांमध्ये आत्मशुद्धता, आत्मविश्वास, आत्मनिर्भरता, आत्मसंयम, साधारण बुद्धी, मन-वचन-कर्म यातील पावित्र्य, धैर्य, सहनशीलता, प्रामाणिकता, त्याग, सेवापरायणता, सत्यनिष्ठा, नैतिकता ही स्वभावातूनच जीवनव्यवहारात येत असते. सद्गुणांना आचरणात आणणे खूप अवघड वाटते; मात्र चांगले व्यक्तिमत्त्व हे सद्गुणी व संस्कारशील जगण्यानेच घडत असते. असे व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रद्धेय भंवरलालजी जैन तथा मोठेभाऊ. मानवी प्रतीक. सद्गुण आणि मूल्ये म्हणजे जीवनात यशस्वी होण्याची गुरूकिल्ली.सद्गुण आणि संस्कारांचे व्यक्तीसोबत असे नाते असते जसे पाणी आणि जमीन यांचे नाते. त्याचे परिणाम संस्कारांमध्ये दिसतात. संस्कारात वर्तमान, भविष्यासोबतच सामाजिक आणि आध्यात्मिक दृष्टी मिळत असते. व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी संस्कार महत्त्वपूर्ण असतात आणि यातूनच मानवाच्या कल्याणाचा विचार पुढे येतो. असाच विश्व कल्याणाचा विचार सार्थक करूया जन्माचे रूप पालटू वसुंधरेचे यातून श्रद्धेय भंवरलालजी जैन यांनी केला.
त्यांच्या मातोश्री गौराई ह्या वाकोदला गर्भवती महिलांसह गोरगरिबांना काहीना काही देत असत. परिस्थिती नसताना दुसर्यांच्या मदतीला येणे हा संस्कार त्यांच्यापासून संपूर्ण जैन परिवारावर आपसूक झाला. ’समाजाचे काम समाजावर ऋण नसून ती समाजाची अल्पशी केलेली परतफेड होय’ असे सामाजिक बांधिलकीचे संस्कार मोठ्याभाऊंच्या कृतिशील आचरणातून दिसतात. त्यांच्या संस्कारांचे संवर्धन व्यापकपणे अशोकभाऊ , अनिलभाऊ , अजितभाऊ आणि अतुलभाऊ यांच्यासोबतच जैन परिवार आणि जैन इरिगेशन करीत आहे.
मोठ्याभाऊंचे विचार इतरांना आनंदित करणारे आहेत. ते म्हणतात, ‘’माझा सगळ्यात मोठा पुरस्कार म्हणजे ’शेतकर्याच्या चेहर्यावरचे हास्य.’’ कोरोना संक्रमणाच्या काळात सर्वत्र बंदिस्त आणि नकारात्मक वातावरण असताना त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या विचारातून सेवाकार्य सुरू करण्यात आले. भुकेने व्याकूळ झालेल्यांना ’स्नेहाची शिदोरी’ देण्यात आली. त्यांच्या जन्मदिनी - म्हणजे १२ डिसेंबर, २०२० पासून ’स्नेहाची शिदोरी’ हा उपक्रम गोरगरिबांसाठी कायम सुरू ठेवण्यात आल्याची घोषणा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केली. शहरातील एकही व्यक्ती उपाशीपोटी झोपू नये ही त्यामागील व्यापक भावना आहे.
मोठ्याभाऊंना जिल्हाधिकारीपदाची नोकरी प्राप्त झाली होती तरी ती नाकारून त्यांनी मातृप्रेरणेतूून कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणला.त्यांच्या कार्यसंस्कृतीतून कृषीसंस्कृतीमध्ये बदल झाला. नवतंत्रज्ञानाची रूजवात झाली आणि भूमिपुत्रांच्या आर्थिक सुबत्तेची पहाट होण्यास सुरुवात झाली. कोणतेही मोठे कार्य कठोर मेहनतीनेच पूर्ण होते, फक्त विचार केल्याने नव्हे हे त्यांनी जाणले. कृतज्ञतेच्या जाणिवेतून जैन हिल्सच्या माळरानावर जलव्यवस्थापनासह मृदसंधारणाचे कार्य करून आदर्शव्रत कृषी पंढरी उभी केली. या कृषी पंढरीच्या दर्शनासाठी लाखो भूमिपुत्र येतात आणि आधुनिक कृषीसंस्कृतीचा कानमंत्र घेऊन जातात. शेतकर्यांच्या प्रशिक्षणासाठी विशेष गुरूकूलची व्यवस्थासुद्धा करण्यात आली.वर्षभर हजारो शेतकरी कृषीपंढरीला भेट देऊन आधुनिक शेतीमधील तंत्र आत्मसात करतात व आपल्या शेतात प्रत्यक्ष रूजवतात. यातून शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर समृद्धी साधली आहे.
व्यक्ती म्हणून मोठेभाऊ जगलेच, त्यासोबतच गुणवंत आणि प्रज्ञावंत व्यक्तींना सोबत घेऊन प्रचंड कार्य त्यांनी उभे केले. व्यक्ती कधी ना कधी काळाच्या पडद्याआड जातो, परंतु त्याचे कार्य मात्र अमर ठरते. मोठ्याभाऊंचे विचार, कृतिशील कार्यही असेच सर्वांच्या चिरकाल स्मरणात राहणार आहे. या वृत्तीनेच विश्वकल्याणाचे पसायदान त्यांनी दिले. त्यांचे प्रेरणा देणारे विचार आज, उद्या आणि भविष्यातही शाश्वत राहतील. मोठ्याभाऊंच्या विचारधारेतूनच जैन इरिगेशन ही समाज कल्याणाची विचारधारा बनली असून कृषी कल्याण आणि शेतकरीहिताच्या मार्गावरुन यशस्वी वाटचाल करीत आहे. काही मार्ग कठिण असतात मात्र, ’ध्येयवेड्या व्यक्तीच अद्वितीय कलाकृती निर्माण करू शकतात’ - याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे भंवरलालजी जैन उपाख्य मोठेभाऊ. त्यांच्या संस्कारशील वचनांचाच परिणाम की, जैन हिल्सवरील माणुसकीची हिरवाई, तेथील दगड, माती, फुलं, पानं, झाडं प्रत्येकाशी विश्वासाचा, आपुलकीचा संवाद साधतात. आपुलकीच्या संवादातून विश्वासाचे नाते निर्माण होते. जगात सर्वात सुंदर रोपटे कोणते असेल तर ते विश्वासाचे असते आणि ते जमिनीवर नाही तर आपल्या मनात रूजवावे लागते. कोणाच्याही सावलीखाली हे रोपटे जगू शकत नाही. त्यासाठी स्वतः उन्हात उभं राहावं लागतं. यातून आपल्यासोबतच्या सहकार्यांमध्ये विश्वास निर्माण होतो. प्रत्येक सहकार्याशी आपुलकीचा संवाद, संवादातून जगण्याची प्रेरणा त्यांच्या विचारांमध्ये मिळत गेली.
अवघ्या सात हजार बीज भांडवलावरून नऊ हजार कोटींची उलाढाल जैन इरिगेशन कंपनी करू लागली. कृषी वैभवाचा निर्धार करून आज शेती व शेतकर्यांच्या अजोड बांधिलकीसाठी जगभर ३३ कारखाने, १४६ कार्यालये व डेपो, ११ हजार वितरकांच्या जाळ्यासह १२ हजाराहून अधिक सहकारी कंपनीत कार्यरत आहेत. कृषी पाईपसहित ठिबक सिंचन उत्पादनात प्रथम, केळी व डाळिंबाच्या टिश्यूकल्चर रोप निर्मितीत प्रथम, आंबा फळप्रक्रियेतही प्रथम, कांदा व भाजीपाला प्रक्रियेत दुसर्या स्थानी जैन इरिगेशन कंपनी आहे. आंतरराष्ट्रीय १५, राष्ट्रीय १४६, राज्यस्तरीय गौरवान्वित संस्था ८०, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरांवरील गौरवलेल्या संस्थेद्वारे मानांकन १७, राष्ट्रीय प्रतिष्ठित व्यक्तींद्वारा गौरव ४ - अशा एकूण ३०७ पुरस्कारांनी कंपनी सन्मानित आहे. फॉर्च्युन मासिकाच्या ’चेंज द वर्ल्ड-२०१५’ च्या यादीत जगातील ५१ कंपन्यांमधून सातव्या स्थानाचा बहुमान प्राप्त करणारी ’जैन इरिगेशन’ ही एकमेव भारतीय कंपनी होती. अविस्मरणीय प्रवासातील हा एक प्रेरणादायी व विनयशील क्षण म्हणता येईल.
मोठ्याभाऊंनी खरा आनंद हा कर्मयोगात पाहिला आणि आयुष्य म्हणजे काय हे जाणले. माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला ’नाव’ नसतं पण ’श्वास’ असतो - आणि ज्यावेळी त्याचा मृत्यू होतो तेव्हा फक्त ’नाव’ असते पण ’श्वास’ नसतो. नाव आणि श्वास यामधील अंतर म्हणजे ’आयुष्य’. हे आयुष्य म्हणजे श्रद्धेय मोठ्याभाऊंचे संस्कारशील विचार . या विचारानुसार वाटचाल करीत खर्या आयुष्याची कृतज्ञपणे सुरुवात मोठ्याभाऊंच्या श्रद्धावंदन दिनी करूया..
देवेंद्र पंढरीनाथ पाटील
मीडीया विभाग,
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव
९४०४९५५२४५