औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे औरंगाबादमध्ये अनावरण करण्यात आले. छत्रपती शिवरायांचा हा पुतळा देशातील सर्वात उंच आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. औरंगाबादमधील क्रांती चौक परिसरात हा पुतळा बसवण्यात आला आहे. ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि विद्युत रोषणाई या पुतळा अनावरणाच्या वेळी पहायला मिळाली. जय जय जय भवानी, जय जय जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मशाल पेटवण्यात आली आणि मग फटाक्यांची आतषबाजी, रोशणाई पहायला मिळाली.
महाराजांच्या पुतळ्याचे वैशिष्ट्य
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची 21 फूट
- पुतळ्याचे वजन 7 मेट्रिक टन
- ब्राँझ धातूपासून महाराजांच्या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे
- पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची 21 फूट इतकी आहे
- चौथऱ्यासह पुतळ्याची एकूण उंची 52 फूट आहे
- चौथऱ्याच्याभोवती 24 कमानीत 24 मावळ्यांच्या प्रतिकृती
- चौथऱ्याभोवती कारंजे तयार करण्यात आले