औरंगाबादः शहरातील क्रांती चौक येथे नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे (Shivaji Maharaj Statue) आज अनावरण होत आहे. 18 फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील सर्वात उंच असा हा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आहे. त्यामुळे या शिल्पामुळे मराठवाड्याची राजधानी आणि पर्यटन नगरी औरंगाबादच्या (Aurangabad City) शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून क्रांती चौकातील या नव्या पुतळ्याची प्रतिष्ठापना व्हावी, यासाठी शिवप्रेमींची प्रतीक्षा सुरु होती. जानेवारी महिन्यात औरंगाबाद शहरात हा पुतळा दाखल झाल्यानंतर कधी एकदा महाराजांच्या दिमाखदार पुतळ्याचं दर्शन होईल, याची वाट प्रत्येक औरंगाबादकर पहात होता. पुतळ्याचे अनावरण कधी करायचे, याबद्दल अनेक दिवस निर्णय होऊ शकला नाही. अखेर उद्या 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला रात्री दहा वाजता या पुतळ्याचे लोकार्पण आयोजित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ऑनलाइन पद्धतीनं या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत. तसेच शहरातील सर्वपक्षीय नेत्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
कसा असेल सोहळा?
शहरातील क्रांती चौकात उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण आज रात्री दहा वाजता केले जाईल. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन पद्धतीने तर पालकमंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रत्यक्षरित्या सोहळ्यात सहभागी होतील. या कार्यक्रमासाठी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ढोल-ताशा, डीजे आणि आतिषबाजीला परवानगी देण्यात आली आहे. मध्यरात्रीच्या अनावरणामुळे हजारो महिला व लहान मुले या ऐतिहासिक क्षणाला मुकणार आहे, या बद्दल खंत व्यक्त केली जात आहे.
शिवरायांच्या पुतळ्याची वैशिष्ट्ये
औरंगाबादेत दिमाखात उभ्या असलेला शिवरायांच्या पुतळा हा देशातील सर्वोच्च अश्वारुढ पुतळा आहे.
– पुतळ्याची चौथऱ्यासहित उंची 52 फूट आहे.
– फक्त पुतळ्याची उंची 21 फूट आहे.
– शिवरायांच्या पुतळ्याचे वजन 07 मेट्रिक टन एवढे आहे.
– शिवरायांचे हे शिल्प घडवण्यासाठी 98 लाख रुपये खर्च करण्यात आला.
– चौथऱ्याच्या सुशोभिकरणासाठी 2.55 कोटी रुपये खर्च झाला.
– अशा प्रकारे शिवरायांचा पुतळा आणि चौथऱ्याचे सुशोभिकरणासाठी अंदाजे 3.53 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
– पुतळ्याभोवती वापरलेला धातू ब्राँझ आहे.
– चौथऱ्याचे सुशोभिकरण करताना प्रतापगडावरून प्रेरणा घेण्यात आली आहे. चौथऱ्याभोवतीच्या कमानीत 24 मावळ्यांच्या मूर्ती आहेत. तसेच हत्तींच्या सोंडेतून पाण्याचे कारंजे सोडण्यात आले आहेत.