जालना ते जळगाव 174 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग लवकरच होणार तयार ; जालना ते जळगाव रुटच्या रेल्वेमार्ग सर्वेक्षणाला मंजुरी

    दिनांक : 10-Feb-2022
Total Views |

औरंगाबादः
मराठवाड्यातील उद्योग विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या जालना ते जळगाव रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे  यांनी यासंदर्भातली माहिती दिली. या परिसरातील ज्या रेल्वेमार्गाची कामं पूर्वी झाली आहेत, ती जशीच्या तशी ठेवत, इतर कोणत्याही मार्गात हस्तक्षेप न करता जालना आणि मराठवाड्यातील नागरिकांच्या सोयीसाठी जालना ते जळगाव हा 174 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार करण्यात येईल, अशी माहिती दानवे यांनी मुंबई येथे ही माहिती दिली. रेल्वेच्या 8 फेब्रुवारी रोजीच्या बैठकीत या मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली असून काम लवकरच सुरु करण्यात येईल, असेही ते म्हणाले. त्यामुळे या मार्गावर जगप्रसिद्ध अजिंठा लेणीचे ठिकाण आणि मराठवाड्याचे आराध्य दैवत राजूरचा गणपती हेदेखील रेल्वेशी जोडले जाणार आहे.
 

jalana 
 
 
मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग!
 
जालना ते जळगाव हा रेल्वेमार्ग जालना, पिंपळगाव, पांगरी, राजूर, भोकरदन, सिल्लोडमार्गे गोळेगाव, अजिंठा, फर्दापूर, जळगाव पर्यंत जाणार आहे. 174 किलोमीटरच्या या मार्गाद्वारे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी असलेले अजिंठा हे ठिकाण रेल्वे मार्गाला जोडले जाईल. तसेच मराठवाड्याचे आराध्य दैवत अससलेले राजूरचे महागणपती हे स्थळदेखील रेल्वे मार्गावर येईल. त्यामुळे राज्यातील अनेक भाविक आणि जगभरातून येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत सोयीचा ठरणार आहे. विशेष म्हणजे यापैकी 70 टक्के मार्ग जालना लोकसभा मतदार संघातून जात आहे. याचा फायदा पुढे सुरत, गुजरात, राजस्थानच्या गाड्यांना आंध्रप्रदेश, दक्षिण भारताकडे जाण्यासाठी छोटा मार्ग म्हणून होणार आहे.
 
मराठवाड्याच्या विकासाला चालना
 
जालना ते जळगाव या 174 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे फायनल लोकेशन सर्वेक्षण केले जाईल. यासाठी साडे चार कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. यामुळे मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील औद्योगिक विकासासह, व्यापार, दळणवळण, शेती, लघुउद्योग आणि पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.