योगिता साळवी
रूपाली चंदनशिवे या 23 वर्षांच्या मुलीची तिचा पती इक्बाल मोहम्मद शेख याने गळा चिरून हत्या केली. दि. 26 सप्टेंबर रोजी मुंबईतील चेंबूर येथे झालेल्या रूपालीच्या हत्येने ‘लव्ह जिहाद’ आणि ‘तन सर से जुदा’च्या विकृत मानसिकतेचे भीषण सत्य पुन्हा समोर आले आहे. रूपाली चंदनशिवेच्या हत्येने महाराष्ट्रात एकच खळबळ माजली आहे. त्या अनुषंगाने या सगळ्या दुर्देवी घटनेचा घेतलेला हा मागोवा...
रूपाली चंदनशिवेची चूक काय होती? तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन ती व्यक्तिस्वातंत्र्य मानत होती. हीच होती का तिची चूक? धम्माने दिलेले जन्मजात मिळालेले संस्कार, रितीरीवाज ती पाळत होती, ही तिची चूक होती का? की तिने वयाने दुप्पट असलेल्या इक्बाल मोहम्मद शेखवर आंधळं प्रेम आणि तितकाच आंधळा विश्वास ठेवला, ही चूक? की तिने भ्रम बाळगला की, इक्बाल आपल्यासाठी पागल आहे तो आपल्यावर प्रेम करतो, ही तिची चूक?
इक्बालच्या मुलाची आई आहोत, इक्बाल कसाही असला तरी आपल्याला जीवे मारणार नाही, हा खोटा विश्वास तिने इक्बालवर ठेवला, ही तिची चूक? नागवाडी-चेंबूरच नव्हे, तर राज्याच्या, देशाच्या शहरी आणि ग्रामीण भागांतही वसलेल्या अशा कित्येक वस्त्यांमध्ये अशा किती तरी ‘रूपाली’ आहेत, ज्यांना भ्रम असतो की, त्यांचा ‘इक्बाल’ त्यांच्या प्रेमासाठी ठार वेडा आहे, त्यांच्यावर खरे प्रेम करतो आणि त्यांच्यासाठी काहीही करू शकतो. हा भ्रम कधी संपेल? रूपाली जाळ्यात फसताच इक्बालने रूपालीवर त्याच्या संस्कृतीचे नियम, रितीरिवाज थोपवायला सुरुवात केली होती. रूपालीसाठी त्याने काहीएक सोडले नव्हते, तर रूपालीने मात्र त्याच्यासाठी सगळेच मागे सोडावे, यासाठी त्याने अखेर तिचा जीवही घेतला.
काही दिवसांपूर्वीच रूपालीच्या माहेरी नागवाडी-चेंबूरच्या घरी गेले. तिथून काही अंतरावरच्या गल्लीमध्येच रूपालीचा खून झाला होता. चंदनशिवे कुटुंबाला चार मुली. नागवाडी- चेंबूरसारख्या झोपडपट्टीत जिथे जायला साध्या पायवाटाही नाहीत, अशा ठिकाणी त्यांचे घर. हातावरचे पोट असलेले कुटुंब. तिच्या आईच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. तिची आई सांगत होती, ”ती ‘त्यांच्यात’ गेली आणि मी तिच्याशी बोलणं सोडलं होतं. पण, किती बी केलं तरी शेवटी पोटचा गोळा हाय. तिला त्यान गुराढोरासारखं कापलं. परमेश्वरा, असं मराण वैर्यालाही येऊ नये. माझ्या लेकीचा गळा कापला त्यानं! किती तडफडली असेल ती...” असं सांगून रूपाली चंदनशिवेच्या आईचा अश्रूंचा बांध फुटला.
रूपालीच्या आत्या सुवर्णा कांबळे म्हणाल्या, “भाजी चिरताना थोडा चाकू लागला तर आपल्याला किती वेदना व्हतात. तिचा तर त्याने सुरीनं गळा चिरून टाकला. त्याला फाशीची सजा द्या! आमच्या लेकीला जशा येदना दिल्या, तशा येदना त्याला व्हायला पाहिजेत! आम्हाला न्याय द्या! आतापर्यंत त्यानं तिच्यावर खूप जुलूम केलं!” रूपाली चंदनशिवेची आई, आत्या आणि बहिणी एकच आकांत-आक्रोश करत होत्या. त्यांचे दुःख, त्यांचे अश्रू सगळे सगळे मनाला अगदी विषण्ण करणारे होते.
तिच्या बहिणींच्या सांगण्यानुसार, 2019 साली रूपाली 16 वर्षांची होती. त्यावेळी इक्बालच्या सोबत ती घरातून निघून गेली. इक्बाल हा तिच्यापेक्षा वयाने दुप्पट. त्याची आधी दोन लग्न झालेली. पहिल्या पत्नीला मूल होत नाही म्हणून त्याने मारून झोडून तिला सोडून दिले होते, तर दुसर्या पत्नीला एक मुलगी होती. गरीब घरच्या सुंदर रूपालीवर त्याची नजर पडली. त्या परिसरात त्याची काही घरं... अर्थात, नागवाडी कशी वसली आणि तिथली किती घरं अधिकृत की अनधिकृत, याची शहानिशा केली, तर कळेलच की, त्याने ती घरं कशी मिळवली असतील... तर त्या परिसरात त्याचा दबदबा. माझी इतकी संपत्ती आहे, तितकी संपत्ती आहे, या भाईशी संबंध आहेत, त्या भाईशी संबंध (भाई म्हणजे इथे गुंड!) आहेत असे तो नेहमीच म्हणे. त्याचे राहणीमान अगदी ‘टापटीप.’ बोलण्यात खास चित्रपटातल्या खान मंडळींची लकब.
तर अशा या इक्बालने रूपालीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून भुलवले. जेव्हा तिच्या बहिणीला रूपाली आणि इक्बालच्या प्रेम प्रकरणाबद्दल कळले, तेव्हा तिने रूपालीला खूप समजावले. तेव्हा रूपाली म्हणे म्हणाली होती की, “इक्बाल माझ्यासाठी खूप पागल आहे, वेडा आहे. तो माझ्यासाठी काहीही करू शकतो. त्याचे माझ्यावर खूप प्रेम आहे. तो माझ्यासाठी सारे काही सोडू शकतो.” याच विश्वासात रूपाली इक्बालसोबत पळून गेली. वेडं वय. त्यात समजही कमी. जगाचा-माणसांचा अनुभव नाही. तिच्या आई-वडिलांनी पोलीस स्टेशनच्या चकराही मारल्या. पण, तिच्या पालकांनी सांगितले की, त्यावेळी पोलीस त्यांना म्हणाले, “ती तिच्या मर्जीने गेली. ती आता येत नाही.” पोलिसांनी साधी फिर्यादही घेतली नाही. रूपालीचे पालक हतबल होऊन परतले. पुढे रूपाली आणि इक्बाल सहा महिने एकत्र राहिले. त्यानंतर त्याचे आई-वडील आणि इतर नातेवाईकही सोबत राहायला आले.
आता इथे मुद्दा असा की, ‘इक्बालसोबत जाऊ नकोस’ असे बहीण सांगत असतानाही रूपाली म्हणाली होती की, “इक्बाल माझ्यासाठी घरच्यांना सोडणार आहे. तो सगळे सोडणार आहे.” पण, त्यापैकी काहीएक झाले नाही. इक्बालने तर रूपालीचे नावही बदलले. तिचे नाव ‘झारा’ ठेवले. याचाच अर्थ इक्बालने काहीही सोडले नव्हते, जे काही सोडावे लागले ते रूपालीलाच! तिचे नाव, तिचा धर्म, तिचे संस्कार आणि सगळे सारे काही... आता तर इक्बालचे नातेवाईकही त्यांच्यासोबत राहू लागले. रूपालीच्या बहिणीने एका इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या प्रतिनिधीला याविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “रूपाली मुस्लिमांसारखी हिंदी बोलत नाही, रितीरिवाज पाळत नाही, मुख्यतः बुरखा घालत नाही म्हणून तिची सासू तिचा छळ करी. त्यातच रूपालीला मुलगा झाला.
आता रूपाली कुठे जाणार? तसेही इक्बालसारख्या व्यक्तीसोबत गेली म्हणून माहेरच्यांनी तिच्यासाठी दरवाजे बंदच केले होते. त्यामुळे मुलगा झाल्यावर इक्बालचा जाच वाढला. तो तिला क्रूरपणे मारहाण करू लागला. आपल्यासाठी वेडा असणारा आणि पूर्वी आपले सगळेच म्हणणे ऐकणारा हाच इक्बाल का? असा प्रश्न रूपालीला पडला. कारण, रूपाली तिच्या माहेरी खुल्या संस्कारात वाढलेली. राहणीमानही आधुनिक. अचानक बंदिस्त जगणे आणि बुरखा परिधान करणे तिला जड जाऊ लागले. दोन पत्नींचे जीवन आपल्या मर्जीने खराब केलेल्या इक्बालसाठी हे पचणे अवघडच होते की, एक गरीब घरची, वयाने अर्धी असलेली मुलगी त्याच्या धर्माचे नियम पाळायला नकार देते? तो तिला भरपूर मारहाण करू लागला. सासू आणि घरातले लोकही तिला मारहाण करू लागले.
एकदा तर रस्त्यातच इक्बालने रूपालीला गुराढोरासारखे मारायला सुरुवात केली. हे रूपालीच्या बहिणीने पाहिले. अर्थात, त्यांनी रूपालीशी संबंध तोडले होते. पण, बाहुलीसारख्या रूपालीचा आक्रोश पाहून ती धावत रूपालीकडे गेली. रूपालीला घेऊन ती पोलीस स्टेशनमध्ये गेली. तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये रूपालीशी गोड बोलून इक्बाल तिला घेऊन पुन्हा घरी आला. पण, रूपालीचा नरकवास संपला नाही. रात्री-बेरात्री तिला मारून घराबाहेर काढले जायचे. मग ती याच्या-त्याच्या घरात लपून राही. पुन्हा मग मुलाच्या ओढीने इक्बालच्या घरी परत येई. इक्बालच्या जाचापासून सुटण्यासाठी तिने इक्बालपासून घटस्फोट घेण्याचे ठरवले. हे ऐकताच इक्बालच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने तिला प्रचंड मारहाण केली.
रूपालीने पोलिसात तक्रार केली आणि जानेवारी 2022 मध्ये पोलिसात अदखलपात्र गुन्हा म्हणून इक्बालवर गुन्हाही दाखल झाला. यानंतर रूपाली मुलाला घेऊन इक्बालपासून वेगळी राहू लागली. कोण म्हणते ती दादरला कोणत्या तरी चर्चमध्ये राहायची. कोण म्हणते, ती एका संस्थेत राहायची, तर ती इक्बालपासून दूर गेली. मात्र, केव्हा ना केव्हा तरी इक्बाल सुधारेल या आशेवर तिने त्याच्याशी संपर्क कायम ठेवला. तो तिच्यावर कायम दबाव टाके की, “मुलाचा ताबा मला दे, आमच्या रितीरिवाजाप्रमाणे राहा.” पण, रूपाली या सगळ्याला तयार नव्हती. ती म्हणे “मुलाचा हिस्सा दे, मीच त्याला वाढवेन.” याच रागातून त्याने तिची हत्या केली. कसायाने मुक्या प्राण्यांचा गळा चिरावा तसा त्याने तिचा गळा चिरला. त्याने चाकूने हल्ला केला तेव्हा काही लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, चाकू नाचवत त्याने सगळ्यांना धमकावले. तिच्यावर खुनी हल्ला करून तो नंतर पळून गेला. पोलिसांनी त्याला पकडले. पण, त्या निष्पाप मुलीचा जीव हकनाक गेला होता.
रूपालीच्या क्रूर हत्येमुळे आता या क्षणी मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र वाङ्मयातील खंड-8 मधील पान क्र. 230-231 मध्ये लिहिलेला विचार आठवतो. बाबासाहेब लिहितात, ”हिंदूंप्रमाणे मुस्लिमांतही सर्व वाईट चाली आहेत आणि काही हिंदूंपेक्षाही अधिक वाईट आहेत. अधिकच्या वाईट चालींपैकी एक म्हणजे ‘बुरखा.’ रस्त्यावर चालणार्या बुरखाधारी स्त्रिया हे भारतातील एक भीषण आणि गलिच्छ दृश्य आहे. ‘बुरख्या’चे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात. ‘बुरख्या’ची कारणे लैंगिक साशंकतेत आहेत. त्याचे मुस्लीम स्त्रिया आणि पुरुषांवर गंभीर परिणाम झाले आहेत. मुस्लीम पुरुषांचा घराबाहेरील स्त्रियांशी स्वच्छ मोकळा संपर्क बाधित झाला आहे. अशाप्रकारची बंधने पुरुषांच्याही नीतिमत्तेवर घातक परिणाम करतात. स्त्री-पुरुषांचा संपर्क तोडणारी अशी समाजव्यवस्था वाईट प्रवृत्तीस जन्म देते, हे सांगायला कोणा मानसशास्त्रज्ञाची गरज नाही.”डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर प्राणापलीकडे श्रद्धा असलेल्या रूपालीला डॉ. बाबासाहेबांचे हे विचार माहिती असतील का? नक्कीच नाही. तिलाच काय, आज समाजाच्या कित्येक घरात बाबासाहेबांचे हे विचार माहिती नाहीत, ही शोकांतिकाच!
या सगळ्या घटनाक्रमात एक लक्षणीय गोष्ट अशी की, या गुन्ह्याची चौकशी करणारे टिळक नगरचे पोलीस अधिकारी विलास राठोड यांंनीही म्हंटले आहे की, फिर्यादीने तक्रारीत म्हंटले आहे की, रूपाली बुरखा घालत नव्हती, या रागामुळे तिला इक्बाल मारहाण करत असे. त्यातूनच भांडण वाढले. मात्र, दि. 29 सप्टेंबरला रूपालीच्या नातेवाईकांनी सांगितले की, ”रूपाली ‘बुरखा’ घालत नव्हती. मुस्लीम रितीप्रमाणे वागत नव्हती म्हणून तिचा खून झाला, अशा बातम्या चॅनेलवाले देतात. ते खोटे बोलतात. तिला बुरखा घाल किंवा मुस्लीम रिवाजाप्रमाणे वागण्याचे बंधन नव्हते.” रूपालीचे नातेवाईक असे का म्हणाले असतील?
कारण, याआधी काही चॅनेलवर त्यांनी मुलाखत देताना म्हंटले होते की, रूपाली बुरखा घालत नाही, मुस्लीम रितीने राहत नाही म्हणून तिला इक्बाल त्रास द्यायचा. सासरचे मारायचे. मग आज अचानक ‘युटर्न’ का बरे? तर जरा लक्ष दिल्यावर मला लक्षात आले की, आम्ही ज्यावेळी रूपालीच्या घरी गेलो, त्याचवेळी काही मुस्लीम महिलाही तिथे आल्या होत्या. रूपाली कशी रात्रीबेरात्री यायची आणि आम्ही कशी तिला मदत करायचो, हे त्या सारख्या सांगत होत्या. पण, इक्बाल तिला का माारहाण करे, हे त्या सांगायला तयार नव्हत्या. इतक्यात तिथे उपस्थित असलेले ‘जय भीम आर्मी’चे अध्यक्ष नितीन मोरे म्हणाले की, “आपली मुलगी त्यांचे रितीरिवाज पाळत असेल का? बुरखा घालणं तिला आवडत असेल का?” त्यांनी असे म्हंटले आणि तिथे आलेल्या त्या मुस्लीम महिला पाय आपटत तिथून निघून गेल्या.
मुस्लीमबहुल वस्ती असलेल्या नागवाडीमध्ये चंदनशिवे कुटुंंब सत्य सांगावे की सांगू नये, यासाठी दडपणात आले असेल का? आम्ही जिथे जिथे जात होतो, तिथे तिथे आमच्या पाठी टोपी दाढीधारी लोक येतच होते. एक अदृश्य दबाव आणि तणाव. बौद्ध समाजाच्या रूपालीचा खून मुस्लीम रितीरिवाज पाळत नव्हती म्हणून नाही, तर तिचा खून वैयक्तिक कारणांमुळे झाला, असे दर्शवण्याचा प्रयत्न हे लेाक करत होते. या सगळ्यावरून एकच वाटले की, रूपालीच्या खून प्रकरणात आपल्या बुरखा पद्धतीचा कुठेही उल्लेख होऊ नये, यासाठी ते प्रयत्न करत होते. गैरमुस्लीम मुलीचा विवाह मुस्लीम व्यक्तीशी झाल्यावर त्याचे कट्टर धार्मिक रिवाज तिला कसेही करून पाळावेच लागतात, हे सांगणार्या या घटनेतले सत्यच ही मंडळी नाकारात होती. थोडक्यात कौमच्या बाबतीत वावगे काही उच्चारले जाऊ नये, अशी याही प्रकरणात यांची मानसिकता होती. असो.
दि. 30 सप्टेंबर रोजी रूपालीच्या बहिणीने बबलीने इक्बालवर ‘अॅट्रोसिटी’चा गुन्हा दाखल केला. त्यावेळी म्हणे तिथले पोलीस अधिकारी म्हणाले की, “रूपाली दोन वर्षांपासून नवर्यापासून दूर राहायची, त्याला जेवण पण देत नव्हती. तुम्ही काय सांगत बसलात?” आता हे अधिकारी असे खरेच म्हणाले असतील, तर मग कठीण आहे. असो. या पार्श्वभूमीवर ‘जय भीम आर्मी’, ‘भीमकन्या महिला मंडळ’, ‘सिद्धी महिला कल्याणकारी संस्था’, ‘आधार महिला संस्था’, ‘स्वयंम महिला मंडळ’, ‘दिशा ज्योत फाऊंडेशन’, ‘वैष्णवी महिला मंडळ’आणि इतर अनेक संस्थांनी या दुर्दैवी घटनेविरोधात आवाज उठवला आहे. खटला ‘फास्ट टॅ्रक’वर चालावा आणि गुन्हेगार इक्बालला फाशीची शिक्षा व्हावी. तसेच, इक्बाल सोबतच ज्या कुणी तिच्यावर अत्याचार केले, त्या सगळ्यांना शासन व्हावे, अशा मागण्या या संस्थांनी केल्या आहेत.
या घटनेबद्दल वाटत राहते की, “रूपाली अल्पवयीन असताना ती इक्बालबरोबर गेली. अल्पवयीन असतानाच तिला बाळ झाले. तिचे तथाकथित धर्मपरिवर्तनही करण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्या गोष्टींवर त्याचवेळी कायदेशीर कारवाई झाली असती तर? किंवा इक्बालबरोबर गेल्यावर आपल्याला पुढे काय भोगावे लागेल, याबाबतची जागृती रूपालीला असती तर? अर्थात जर तरला किंमत नाही. पण, रूपालीसारख्या कितीतरी मुली ‘लव्ह जिहाद’च्या बळी ठरत आहेत. त्या बहुसंख्य मुलींच्या आयुष्याची जी परवड होते, त्यांना जो नरकवास भोगावा लागतो, तो शब्दातीत! परमेश्वरा, पुन्हा कुणी रूपाली होऊ नये!!