मुंबई : महाराष्ट्रासह देशामध्ये ओमिक्रोन आणि वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे अनेक चित्रपट निर्मात्यांनी आपल्या चित्रपटांची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आधी शहीद कपूरचा 'जर्सी' हा चित्रपट ३१ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, कोविडची वाढती रुग्णसंख्या पाहता हा चित्रपट पुढे ढकलण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर 'बाहुबली'चे दिग्दर्शक राजा मौली यांचा बहुचर्चित 'आरआरआर' हा चित्रपटदेखील अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला गेला. तर नुकतेच सुपरस्टार प्रभासचा 'राधेश्याम' हादेखील पुढे ढकलण्यात आला आहे.
हिंदी चित्रपट सृष्टीत चर्चेत असलेला अभिनेता अक्षय कुमारचा 'पृथ्वीराज' हा चित्रपटदेखील पुढे ढकलण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर एकीकडे हॉलीवूड चित्रपट 'स्पायडरमॅन - नो वे होम' रेकॉर्डब्रेक कमाई करत असताना दुसरीकडे अनेक हॉलीवूड चित्रपटांची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. यामध्ये 'मॉर्बियस' तसेच 'मूनफॉल' अशा अनेक चित्रपटांची भारतीय तारीख पुढे ढकलण्यात आली.
'आरआरआर'च्या कमाईत तब्बल १०० कोटींचा फटका
नुकतेच भारतामध्ये सर्व चित्रपटगृह सुरु करण्यात आले होते. तसेच, अनेक चित्रपट प्रदर्शित केल्यानंतर हळूहळू निर्मात्यांची गाडी रुळावर येत होती. मात्र, पुन्हा एकदा नव्या वायरसच्या चर्चा सुरु झाल्यानंतर अनेकांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचे निर्णय घेतले. यामध्ये 'आरआरआर'ला तब्बल १०० कोटींचे नुकसान सहन करावे लागले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला जेवढा उशीर होईल तितका व्याजाचा खर्चही वाढेल. टेलिव्हिजन आणि सोशल मीडियावरील प्रमोशन असे एकत्र करून निर्मात्यांनी आतापर्यंत २० कोटींहून अधिक खर्च केला आहे. तसेच, देशासह देशाबाहेरही या चित्रपटासाठी अंदाजे १० कोटींपेक्षा अधिक रुपयांचे परी-बुकिंग झाले आहे. त्यामुळे आता या रक्कमेचादेखील परतावा त्यांना करावा लागू शकतो.