आप्पासाहेब जगन्नाथ शिंदे : फार्मास्युटिकल क्षेत्रातील ‘जगन्नाथ’!

    दिनांक : 29-Jan-2022
Total Views |
‘आपला हात जगन्नाथ’ अशी मराठीत म्हण आहे. नेमका याचा अर्थ आणि त्याच्याशी साधर्म्य असलेलं व्यक्तिमत्त्व तसं क्वचितच! मात्र अशा नावाची व्यक्ती आणि त्याच आशयाचं काम करणारं नाव म्हणजे आप्पासाहेब जगन्नाथ सखाराम शिंदे. नावानेच नाही तर आपल्या कर्तृत्व आणि दातृत्वानं समाजापुढं आदर्श निर्माण करणारे जगन्नाथ शिंदे एक वेगळं रसायन आहे. एकाच शब्दात त्यांच्या संपूर्ण कार्याची ओळख करून घ्यायची असेल, तर त्यांचं नावच पुरेसं आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. अशा या व्यक्तिमत्त्वाचा आज ७२ वा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वावर हा दृष्टिक्षेप...
 

Appasaheb Jagannath Shinde1
 
आयुष्यात येणार्‍या प्रत्येक संकटासमोर आपण स्वतःच दत्त म्हणून उभं ठाकायची धमक आणि त्याचबरोबर आपल्यातील विधायक सदसद्विवेकावर असलेला ठाम विश्वास, माणसामाणसामधील चांगुलपणाची तेजस्वी ज्योत चेतवण्याची पारदर्शी हातोटी आणि संघटित लोकशक्तीच्या पाठबळावर उत्तुंग झेप घेण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, सर्वांचं भलं व्हावं ही निर्मळ भावना आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडीचा सतत कानोसा घेणारं सजग समाजभान अशा अनेकानेक गुणांचा समुच्चय ज्यांच्या व्यक्तिमत्त्वात शिगोशीग भरला आहे, असे केमिस्ट बांधवांच्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील संघटनांचे अष्टपैलू आणि द्रष्टे नेते म्हणजे अप्पासाहेब मा. श्री. जगन्नाथ शिंदे.
 
आप्पांच्या यशाचा, लोकसंग्रहाचा, माणुसकीचा आणि त्यांनी उभ्या केलेल्या प्रचंड विधायक साम्राज्याचा सर्वांनाच अभिमान वाटतो. त्यांचा स्नेह, आशीर्वाद, विश्वास आपल्यावर असावा असं सगळ्यांना मनापासून वाटते, यातच आप्पांच्या व्यक्तित्वाचं मोठेपण दडलेलं आहे.
 
जगन्नाथ सखाराम शिंदे या नावानं आज राष्ट्रीय पातळीवर आपल्या कार्यकर्तृत्वाची मोहोर उमटवली आहे. प्रशासनातील अनेक आडमुठी धोरणं सकारात्मक भूमिका घेत बदलायला भाग पाडून ती लोकहिताच्या बाजूनं फिरवण्यासाठी त्यांनी द्रष्टेपणानं केलेलं काम उद्याचं सुवर्णपानं असणार आहे.
 
नैसर्गिक, सामाजिक, जागतिक, आर्थिक अशा सर्व प्रकारच्या बदलांबरोबर आपण आपल्यामध्येही रोज सकारात्मक बदल घडवत गेलं पाहिजे. पण हे करताना आपल्याला इथल्या मातीचं, संस्कारांचं विस्मरण होता कामा नये. समाज प्रगत होण्यासाठी आपल्यातील अंधश्रद्धा गळून गेल्या पाहिजे, पण आपल्या श्रद्धा आपण डोळसपणे जपल्या पाहिजेत, अशी आप्पांची धारणा आहे.
 
कल्याणसारख्या मुंबईजवळच्या शहरात राहणार्‍या या सर्वसामान्य माणसानं हे सर्वांच्या कल्याणाचं साम्राज्य कसं उभं केलं असेल, याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला, तर एक गोष्ट प्रकर्षानं पुढं येते की, संकट किंवा समस्येला सामोरं जाण्यासाठी आप्पांनी आपल्या अनुभवातून साकार केलेली सूत्रबद्ध जीवनशैली. आपण जे काम करतो ते शंभर टक्केच करायचं हा त्यांचा ध्यास असतो आणि त्यासाठी तन- मन-धनानं ते प्रयत्नरत असतात.
 
‘सॉलोमान ग्रँडे बॉर्न ऑन मंडे...’ अशी सामान्य माणसाची एक इंग्रजी कविता पाचवीच्या वर्गात शिकवली जायची. ती शिकत असताना जगन्नाथ शिंदे नावाचा स्कॉलर विद्यार्थी मात्र अस्वस्थ व्हायचा. माणसाचं आयुष्य इतकं सामान्य, इतकं सपक, इतकं निरुपयोगी असता कामा नये असं त्या 10-11 वर्षांच्या मुलाला ती कविता शिकताना वाटायचं आणि या अस्वस्थतेतूनच जीवनात आपण काही तरी एक्स्ट्राऑर्डिनरी काम करायचंच असं त्याने ठरवलं.
 
त्यातूनच चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत ते गुणवत्ता यादीत आले. प्रतिकूल परिस्थिती असली तरीही मुलांनी शिकावं असा द्रष्टेपणा असलेले आई-वडील पाठीशी होते. त्यांना वाचनाची गोडी लागली. परिकथा वाचताना आपणच त्या गोष्टीचे नायक आहोत असं वाटायचं. वाचनाचा मोठा प्रभाव त्यांच्या बालमनावर होता. राष्ट सेवादलाचे संस्कार होते. साने गुरुजींच्या विचारांचाही प्रभाव होता. त्यांच्या साहित्यानं नितीमत्तेचा वारसा त्यांना मिळाला आणि विधायक नेतृत्वाचं बाळकडूही...
 
जगन्नाथ यांचा वरदहस्त औषध निर्मिती, पर्यावरण संवर्धन, राजकारण आणि आरोग्य अशा अनेक क्षेत्रांत आहे. नोकरी सोडल्यानंतर इंजिनिअर फॅब्रिकेटर्सच्या व्यवसायापासून सुरुवात करीत विविध क्षेत्रामध्ये भरीव योगदान आपल्या सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्वाचा परिचय जगाला दिला. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील शिंदेवाडी येथे त्यांचे आजोबा सहकुटुंब वास्तव्य करायचे. 1853 मध्ये ठाणे ते मुंबई अशी पहिली रेल्वे धावल्यानंतर रेल्वेच्या विस्ताराचं काम सुरू झालं. तेव्हा सुतारकामासाठी ते कल्याणला आले. त्यांनी कल्याण पोस्टातही नोकरी केली आणि येथेच कायमस्वरूपी राहिले. कल्याण पूर्व येथे ज्या चाळीमध्ये शिंदे कुटुंबीय राहायचे त्याच्या बाजूला सिटिझन क्लब होता. तिथं बरेच ब्रिटिश खेळ खेळले जायचे. टेबल टेनिस, क्रिकेट आदी. त्यांचे वडील क्लबमध्ये लहान-मोठी कामं करीत. सतत तेथे असल्याने क्लबमध्ये चालणार्‍या सर्व खेळांमध्ये ते पारंगत झाले. अगदी घोडेस्वारीचीही त्यांना आवड होती.
 
1952 ते 55 दरम्यान शिंदे कुटुंबीय कल्याण पूर्वमधील कोळसेवाडी येथे राहायला गेले. तेथे सखाराम शिंदे यांनी मराठा कोळसेवाडीत जळाऊ लाकूड आणि कोळशाचा व्यवसाय सरू केला. त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाईंचाही चांगला हातभार होता. थोरल्या दोन मुली कमल आणि लीला आणि नंतरची दोन मुलं शिवाजी आणि तानाजी. त्यातच 29 जानेवारी 1950 रोजी कल्याण पूर्वच्या नेने हॉस्पिटलमध्ये पाचवं अपत्य जन्माला आलं. ते म्हणजे जगन्नाथ शिंदे. आप्पांच्या पाठीवर पुढं चार भावंडं झाली- सुमन, कलाबाई, सुशिला आणि बाळकृष्ण. पण वयाच्या दहाव्या वर्षापासूनच अंगात पुढारीपण असलेला जगन्नाथ घराचा कारभारी असल्यासारखा बोलायचा. काही वेळा वडिलांच्या चुकाही निडरपणे त्यांच्या निदर्शनाला आणून द्यायचा.
 
सखाराम शिंदे यांचा लाकडाच्या वखारीचा धंदा त्या काळात चांगला चालत होता. कारण 1962 पर्यंत कल्याणमध्ये वीज नव्हती. सखाराम शिंदे उद्योगाबरोबरच राजकारणातही सक्रिय होते. काटेमानवलीचे सरपंचपद त्यांनी भूषवले होते.
 
सॉलोमन ग्रँडेनं आप्पांच्या बालमनावर भव्य दिव्य स्वप्नांचा जसा यज्ञ पेटवला, तसंच नुकतंच स्वातंत्र्य मिळालेल्या त्या काळातल्या वातावरणानं, उत्तुंग माणसांच्या विचारप्रणालीनं त्यांच्या मनातील समाजोन्नतीची जाणीव अधिकच प्रगल्भ बनली. संत-महात्मे मरणानंतरही आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वानं जिवंत असतात. अशी सुभाषितं शाळेच्या फळ्यावर कुणी तरी लिहावीत आणि नंतर पुसून टाकावीत असं न घडता या संवेदनशील मुलाच्या बालमनावर ती शिल्पासारखी कोरली गेली. यातूनच फक्त आपल्यापुरतं न जगता सर्वांसाठी जगलं पाहिजे, ही व्यापक जाणीव कार्यरत राहिली. केमिस्टांच्या संघटनेपुढं जी-जी आव्हानं आली ती यशस्वीपणे पेलण्याचं बळ आप्पांच्या या आत्मप्रेरणेनं सर्वांना दिल.
माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी मुंबईतील घाटकोपरमधील झुनझुनवाला कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. मात्र, येथे अपयश आल्यावर वडिलांनी सरळ ‘चौगुले इंजिनिअर्स’मध्ये त्यांना नोकरीला लावलं. तेथे ते परचेस क्लार्क होते. मात्र, मुळातच व्यवसायामध्ये रस असलेल्या जगन्नाथ यांचं मन नोकरीत रमलं नाही. मराठा कोळसेवाडीत वडिलांनी त्यांच्या जागेत एक मेडिकल दुकान भाड्यानं दिलं होतं. काही कारणामुळं त्या जागेच्या मालकानं ते दुकान दुसर्‍या व्यक्तीस 18000 रुपये पागडीनं देण्याचं ठरवलं होतं. त्या वेळी पुढाकार घेऊन ते दुकान स्वतःच घेतलं व लक्ष्मी मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स नावाने 2 नोव्हेंबर 1976 रोजी औषध दुकान सुरू केलं. हा दिवस खर्‍या अर्थानं आप्पांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. त्यांच्या फार्मसी उद्योगाचा श्रीगणेशा झाला. याच दरम्यान त्यांनी बीए पॉलिटिक्सची पदवी घेतली. त्यानंतर त्यांच्या मोठ्या भावाच्या चुलत सासर्‍यांच्या राजकारणातील ओळखीच्या साहाय्यानं, डोंबिवली एमआयडीसीमध्ये 1200 चौरस फुटांची जागा घेतली. त्या जागेच्या भाड्याचा पहिला हप्ता 5000 रु. होता. तेवढे पैसेही त्यांच्याकडे नव्हते म्हणून वडिलांकडून मदत घेतली. काही कर्ज घेतलं आणि 11 नाव्हेंबर 1979 रोजी, आपल्या बंधू आणि काही सहकार्‍यांसोबत त्यानी प्रवीण इंजिनिअर्स अँड फॅब्रिकेटर्स ही कंपनी स्थापन केली. ही कंपनी एमएसईबीला लागणारे पार्ट्स, लहान मोठ्या कंपन्यांना लागणारे साहित्य पुरवायची.
 
1980 मध्ये जगन्नाथ शिंदे चाळीसगावच्या भास्करराव देशमुखांची कन्या स्नेहलता यांच्याशी विवाहबद्ध झाले- आणि एकाचवेळी संसार, कंपनी आणि मेडिकलची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. मेडिकल स्टोअर सुरू केलं खरं; पण या उद्योगाचा कसलाही अनुभव त्यांच्या गाठीशी नव्हता. त्यामुळं त्यांनी रितसर फार्मसीचा कोर्स केला. रोज मेडिकलचं दुकान सकाळी आठ वाजता उघडायचं. दुपारी फक्त जेवणापुरता आराम, नंतर परत दुपारी तीन ते अकरापर्यंत दुकान. त्यात प्रवीण इंजिनिअर्ससाठी ऑर्डर्सही मिळवायच्या. त्यावेळी मुंबईलगतच्या सर्व भागांसाठी औषधं मिळण्याचं एकमेव होलसेल मार्केट म्हणजे पिन्सेस स्टीटचं मार्केट. तेथे जाण्यासाठी सव्वा तास लागायचा. तेथून जड वजनाच्या औषधांच्या पिशव्या घेऊन प्रवास करायचा. कारण टॅक्सी परवडणारी नव्हती. त्यामुळे औषधांच्या पिशव्या हातात घेऊन पायपीट करावी लागे. या दगदगीमुळे त्यांना खांदेदुखी सुरु झाली, परंतु त्यांनी हार मानली नाही.
 
औषध विक्रेत्यांच्या अडचणी स्वतः अनुभवल्या असल्याने त्या दूर करण्यासाठी 1981-82 मध्ये ते कल्याण केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे सहसचिव झाले. 1983 मध्ये तालुका सचिव तर 1984 ला ठाणे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो.चे सचिव झाले. तेव्हापासून त्यांनी औषध विक्रेत्यांसाठी जवळ होलसेल मार्केटसाठी आवाज उठवला. 1989 ला ते महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो.चे जनरल सेक्रेटरी बनले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे ठाणे, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली येथे औषध पुरवठ्याचे पाच होलसेल मार्केट सुरू झाले. क्रेडिट फॅसिलिटी मिळू लागली. ब्रेकेज, लिकेज, एक्स्पायरी झालेली औषधं बदलून मिळण्यासाठी नियमावली तयार झाली. त्याची अंमलबजावणी सुरू झाली. याच काळात शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाव्दारे होणार्‍या जाचक कायद्यांवर आणि अधिकार्‍यांच्या मनमानीविरुद्ध विविध संघटनांतून यशस्वी लढे देण्यात आले. ठाणे जिल्हा सचिव असल्यामुळे राज्य संघटनेच्या कार्यकारिणीचं सदस्यत्वही त्यांना मिळालं. 1985 मध्ये नियुक्त सदस्य म्हणून ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट या संघटनेच्या कार्यकारिणीवर तत्कालीन राज्य संघटनेचे अध्यक्ष किशोरभाई शहा यांनी आप्पांची निवड केली. 1989 ला असो.चे सचिव टी.जी. शेलाट यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या रिक्त जागी आप्पांना नियुक्त करण्यात आलं. 1991 मध्ये औरंगाबाद येथे राज्य संघटनेच्या पहिल्या निवडणुकीत आप्पांची सेक्रेटरी म्हणून बिनविरोध निवड झाली. तेव्हापासून 2003 पर्यंत आप्पा संघटनेचे जागरूक, कर्तबगार, तत्पर सचिव म्हणून कार्यरत राहिले. या काळात संघटनेची बांधणी करण्यात, संघटनेला तळागाळातील सामान्य केमिस्टपर्यंत पोहोचवण्यासाठी आप्पांनी जिवाचं रान केलं. 2001 मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेच्या ऑर्गनायझिंग सेक्रेटरीपदी त्यांची निवड झाली. 2003 ला धुळे येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत एकमतानं राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा बहुमान आप्पांना मिळाला आणि दोन टर्म त्याची पुनरावृत्ती झाली. यातच आप्पांनी केलेल्या व्यापक कामगिरीची पावती मिळते. 2004 ला या राष्ट्रीय संघटनेच्या चेन्नई येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत आप्पांना अध्यक्षपदाचा बहुमान प्राप्त झाला. आप्पांनी राज्य पातळीवरील संघटनेच्या नेतृत्वासोबतच राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वही अत्यंत जबाबदारीनं, संघटन कुशलतेनं आणि पारदर्शकतेनं निभावलं. म्हणूनच, समस्त केमिस्ट बांधवांच्या हृदयात आप्पांसाठी श्रद्धेचा एक वेगळाच कप्पा निर्माण झाला आहे.
 
पूर्वी औषधांच्या बाटल्या किंवा पाकिटांवर छापील किंमत नसल्याने दुकानदार लोकल टॅक्सच्या नावाखाली जास्त पैसे उकळायचे. हा गैरप्रकार आप्पांनी थांबवला. सध्या औषधांवर ज्या छापील किंमती आढळतात, त्याचं श्रेय आप्पांनाच जातं. औषधांवरील सेल्स टॅक्स 4 टक्के इतका कमी करण्याची कामगिरीही आप्पांचीच. इतर राज्ये औषध विक्रेत्यांकडून व्हॅट टॅक्स वसूल करायचे, महाराष्ट्रातील औषध विक्रेते मात्र त्रासमुक्त आहेत ते केवळ आप्पांनी राज्य सरकारचं मन वळवलं म्हणून. औषधांवरील जीएसटी 12 टक्के इतका करण्यासाठीही त्यांनीच प्रयत्न केले.
 
बदलत्या काळानुसार स्वतःलाही कॉर्पोरेट बनवण्यासाठी असोसिएशननं व्यावसायिक कंपनी बनवावी म्हणून ऑल इंडिया ओरिजिन केमिस्ट अ‍ॅण्ड डिस्टिब्युटर्स लिमिटेड कंपनीची स्थापना केली. संपूर्ण भारतात औषधी व्यवसाय 30 हजार कोटींहून अधिक आहे. त्यातही आप्पा व त्यांच्या माध्यमातून होणार्‍या औषध पुरवठ्याचं प्रमाण 90 टक्के आहे. असो.च्या सदस्यांमधून राज्यस्तरीय कंपन्याही बनवल्या. 20 कोटींहून अधिक भागभांडवल उभं केलं. संपूर्ण भारतात औषध विक्रीची एकच पद्धत असावी यासाठी ही प्रक्रिया तयार केली. आप्पांच्या मते, आत्तापर्यंत विखुरलो होतो, पण या पद्धतीमुळं ऑर्गनायझेशन प्रोसेस तयार झाली. महाराष्ट्रातही महाराष्ट्र सेफ केमिस्ट अ‍ॅण्ड डिस्ट्रिब्युटर्स अलायन्स लिमिटेड ही कंपनी बनवली. 12 कोटींची प्रॉपर्टी चेंबूरला घेतली. जागतिक पातळीचे कन्सल्टंट निर्माण केले. जगात अशा कंपन्या तयार होतात - ज्या आधी तयार होतात आणि त्या होलसेल, रिटेल कंपन्या बनवतात. पण ही कंपनी पाच लाख लोकांनी बनवली- हे जगातलं आठवं आश्चर्य.
 
सध्या दोन लिमिटेड कंपन्या असो.व्दारे ते चालवतात. 38 हजार रिटेलर केमिस्टना सोबत घेऊन 55 कोटींचं भांडवल उभं करून सायन येथे कॉर्पोरेट हाऊस त्यांनी उभं केलं. ‘पतंजली’ रिटेल स्टोअर्सना महिन्याकाठी 5 कोटींचा बिझनेस या कंपनीकडून मिळतो. आरोग्य सेतूमधील ई फार्मसीविरोधात आप्पा दिल्ली हायकोर्टात लढले. याचा फायदा सर्व औषध विक्रेत्यांना झाला.
 
फार्मसी क्षेत्रातील योगदानासोबतच आप्पा समाजकार्यामध्येही तितकेच सहभागी असतात. कारगिल युद्धाच्यावेळी 1 कोटी 33 लाख रुपये जमा करून, त्या रकमेचा चेक तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांच्याकडं त्यांनी सुपूर्त केला होता. राजकारणाच्या माध्यमातून समाजकार्य करण्याच्या उद्देशानं 1972 ते 1980 पर्यंत कल्याण पूर्व युवक काँग्रेसचं जनरल सेक्रेटरीपद, त्यानंतर 1980 ते 82 उपाध्यक्ष, 1982 ते 86 कल्याण शहर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष, 1986-89 दरम्यान कल्याण शहर जिल्हा काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष, 1990-92 ब्लॉक काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष, 1982-1998 कल्याण डोंबिवली काँग्रेस आयचे जिल्हा उपाध्यक्ष, 1990-2006 दरम्यान कल्याण डोंबिवली राष्ट्रवादी उपाध्यक्ष, तर 2006 पासून ते जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत होते. 1988 पासून समांतर काँग्रेसच्या काळापासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अनेक पदं आप्पांनी भूषविली. नागपूर येथे केमिस्ट संमेलनात शरद पवार यांच्यासह नितीन गडकरीही उपस्थित होते. सुमारे 11000 केमिस्ट सहभागी होते. तेव्हा शरद पवार यांच्या एक गोष्ट लक्षात आली की, देशातील साडेआठ लाख औषधी व्यापार्‍यांचे बिनविरोध नेतृत्व करणारा माणूस या राज्यातील आहे. याचा फायदा होवून शरद पवार यांनी त्यांना 2014 मध्ये विधान परिषदेवर पाठविले. जून 2014 मध्ये आमदारपदी विराजमान झाल्यावर आपल्या कामाचा सभागृहात वेगळा ठसा उमटवणार्‍या आप्पांना तालिका सभापती म्हणून काम करण्याचा योगदेखील आला. जून 2014 ते जून 2020 या कालावधीत ते महाराष्ट्र विधान परिषद आमदार होते.
 
आप्पांना खेळाबद्दलही विशेष प्रेम आहे. प्रियदर्शनी यूथ क्लब कल्याण, तलवारबाजी असो, ठाणे या संघटनांचे ते अध्यक्ष आहेत. आट्यापाट्यासारख्या असो.चे उपाध्यक्ष तर कबड्डी असो.चे ते अध्यक्ष होते. जयशंकर क्रीडा मंडळ, कल्याण या संस्थेचे ते संस्थापक आहेत. ‘कबड्डी’ची पंच पदाची परीक्षा देऊन राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये अनेकदा पंच म्हणून त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.
आप्पा यांना विक्रांत आणि कुलदीपक अशी दोन मुलं असून, विक्रांत इंजिनिअर, तर धाकटा कुलदीपक डॉक्टर आहे. विक्रांत आणि त्याची पत्नी राजेश्वरी हे दाोघे वडिलांचा फार्मसीचा उद्योग सांभाळतात. त्यांना धनुष नावाचा मुलगा आहे. कुलदीपक हा ऑर्थोपेडिक डॉक्टर असून त्याची पत्नी रेणू पॅथॉलॉजिस्ट आहे. त्यांना रेयांश आणि इशान्या ही दोन मुलं आहेत. मी एवढं सगळं करू शकलो, कारण माझ्या पत्नीनं खंबीरपणे घर सांभाळलं - अशा शब्दांत आप्पा आपल्या पत्नीचं कौतुक करतात. आपल्या वडिलांचे संस्कार कुटुंबात प्रत्यक्षात उतरवल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर असतो.
 
आप्पांच्या दातृत्व गुणाचाही सर्वांना अनुभव आला आहे. त्यांच्या दारी आलेला याचक कधीही रिक्तहस्ते परतत नाही, अशी त्यांची ख्याती आहे. अनेक मार्गाने त्यांचा दानधर्म सुरू असतो. आनंद दिघे ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी 30 एकर जागेत एज्युकेशन कॉम्पलेक्स स्थापन केलं असून तेथे सैनिकी विद्यालयाची स्थापना केली. तेथे त्यात पाचवी ते बारावीपर्यंत 300 मुलं शिकतात. भविष्यात आयटी, नर्सिंग व मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. कोल्हापूर आणि जळगावला आप्पा असो.मार्फत दोन फार्मसी कॉलेज चालतात. येथे गोरगरिबांच्या मुलांना फार्मासिस्ट बनवून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सहकार्य केलं जातं.
 
कलाकारांना संधी मिळण्यासाठी ‘वझे कला प्रतिष्ठान’तर्फे आप्पा कार्यरत आहेत. या सर्व क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्यामुळे आप्पा हे अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेत. त्यांच्यावर दोन पुस्तकही लिहिली आहेत. आणि त्यांच्यावरील माहितीपट ‘साम टीव्ही’वर दाखवण्यात आला. त्यांचं सर्व कार्य बघता, केंद्र सरकारनं त्यांना फार्मसी काऊन्सिल ऑफ इंडिया या संघटनेवर सदस्य म्हणून नियुक्त केलं. सर्व क्षेत्रांमध्ये लीलया वावरणारी ही महान हस्ती खर्‍या अर्थानं ‘जगन्नाथ’च आहे.
 
आपल्या कर्तृत्वाने ‘महाराष्ट्राचं भूषण’ ठरलेल्या समाजशिल आप्पासाहेबांना 72 व्या वाढदिवसानिमित्त पुढील कार्यासाठी अनेकोत्तम शुभेच्छा! ‘जीवेत् शरद: शतम्’
 
सुनील भंगाळे
 
अध्यक्ष, जळगाव जिल्हा केमिस्ट असोसिएशन, जळगाव
9422775693