तीन खेळाडूं बद्दल सुनील गावस्करांचा टीम मॅनेजमेंटला महत्त्वाचा सल्ला

    दिनांक : 27-Jan-2022
Total Views |
मुंबई: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताचा दारुण पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने भारतावर (IND vs SA) 3-0 असा विजय मिळवला. या पराभवानंतर भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर  यांनी टीम मॅनेजमेंटला तीन खेळाडूंबद्दल महत्त्वाचा सल्ला दिला आहे. या तीन खेळाडूंकडे काळजीपूर्वक लक्ष द्या व त्यांना भविष्यासाठी तयार करा, असं गावस्करांनी संघ व्यवस्थापनाला सुचवलं आहे. पार्लच्या पहिल्या दोन वनडेमध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेने सहज पराभव केला पण तिसऱ्या वनडे सामन्यात केपटाऊनमध्ये  भारताच्या कामगिरीत बऱ्यापैकी सुधारणा दिसून आली. भारताला या सामन्यात विजय मिळाला नाही. पण काही खेळाडूंच्या व्यक्तीगत कामगिरीने गावस्करांना प्रभावित केलं. 
 

sunil 
 
 
शेवटची मॅच औपचारिकच
 
शेवटच्या औपचारिकता मात्र असलेल्या सामन्यात भारताने तीन बदल केले होते. कारण पहिल्या दोन वनडेसह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत विजयी आघाडी घेतली होती. भारताने वेंकटेश अय्यरच्या जागी सूर्यकुमार यादवला, भुवनेश्वर कुमारच्या जागी दीपक चहरला व शार्दुल ठाकूरच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संधी दिली होती. ज्या तिघांना संधी दिली, त्यांना बेंच गरम करण्यासाठी बसवू नये, त्यांना जास्तीत जास्त खेळवा असा सल्ला गावस्करांनी दिला. पुढच्या सामन्यात संधी मिळाली पाहिजे, अशा पद्धतीचा तिघांनी खेळ केला, असे गावस्कर म्हणाले. या तिघांवर टीम मॅनेजमेंटने जास्त लक्ष द्याव का? या प्रश्नावर गावस्करांनी हे उत्तर दिलं.
 
“दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा सामना औपचारिकता मात्र होता. पण त्या तिघांसाठी तसं नव्हतं. त्यांच्यासाठी क्षमता दाखवून देण्याची ती एक संधी होती. मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा क्लीन स्वीप विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल, हे त्यांना ठाऊक होते. त्यामुळे त्यांच्यावर दबाव होता. पण त्यांनी योग्य प्रकारे सामना केला. त्यामुळेच त्यांच्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे” असं गावस्कर म्हणाले.
 
सूर्यकुमार दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिला वनडे सामना खेळत होता. त्याने 32 चेंडूत 39 धावा केल्या. त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावला. प्रसिद्धने 59 धावात तीन विकेट घेतल्या. दीपक चहरने 32 धावात दोन विकेट घेतल्याच पण अर्धशतकही झळकावलं. चहरच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारत सामना जिंकेल, अशा स्थितीमध्ये होता.