टी -२० मध्ये पुजाराने ठोकलंय शतक

हिणवला जात होता टेस्ट प्लेयर म्हणून

    दिनांक : 25-Jan-2022
Total Views |
नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याची कामगिरी फारशी खास नव्हती. यानंतर त्याच्या परफॉर्मन्सवर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्याचं संघातील स्थान अनिश्चित आहे. परंतु मागील दोन-तीन मालिका वगळता पुजाराची कामगिरी नेहमीच सरस राहिली आहे. त्याला टीम इंडियाची नवीन भिंत म्हटले जाऊ लागले होते.
 

cheteshwar 
 
चेतेश्वर पुजाराने केवळ कसोटीतच नव्हे तर मर्यादित षटकांच्या क्रिकेट फॉरमॅटमध्येही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्‍याने टी-20 मध्‍येही शतक झळकावले आहे. आपल्या संथ फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पुजाराने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2019 मध्ये केवळ 61 चेंडूत शतक झळकावले होते. सय्यद मुश्ताक अली टी-20 करंडक स्पर्धेत 21 फेब्रुवारी 2019 रोजी सौराष्ट्र विरुद्ध रेल्वे यांच्या खेळवण्यात आलेल्या सामन्यात पुजाराने सौराष्ट्रकडून खेळताना सलामीला येऊन 61 चेंडूत शतक ठोकलं होतं. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 1 षटकार ठोकला होता. प्रथम फलंदाजी करताना सौराष्ट्रने या सामन्यात 3 बाद 188 धावा केल्या होत्या. मात्र रेल्वेने हे आव्हान 19.4 षटकात 5 गडी राखून पूर्ण केलं. रेल्वेकडून या डावात मृणाल देवधरने 20 चेंडूत 49 धावांची खेळी केली होती.
पुजाराची व्हाईट बॉल आणि रेड बॉल क्रिकेटमधील आजवरची कामगिरी पाहती त्याची फलंदाजी क्षमता स्पष्टपणे दिसून येते. त्याच्यासारख्या खेळाडूला कसोटी क्रिकेटमध्ये पर्याय नाही. जमिनीवर भिंत उभी असल्याप्रमाणे तो क्रीजवर चिकटून राहतो. या कारणास्तव त्याला वॉल ऑफ टेस्ट्स असेही म्हणतात.
 
एका डावात सर्वाधिक चेंडूंचा सामना
 
पुजारा हा कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारा भारतीय फलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या रांची कसोटीत त्याने 202 धावांची खेळी केली होती. त्यासाठी त्याने तब्बल 525 चेंडूंचा सामना केला होता. त्याच्या आधी हा विक्रम दिग्गज भरतील क्रिकेटपटू राहुल द्रविडच्या नावावावर होता. द्रविडने 2004 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 495 चेंडूत 270 धावांची खेळी केली होती.
 
कसोटीत 6,000 धावा करणारा 11 वा भारतीय
 
सिडनी येथे खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पुजाराने आपल्या कसोटी क्रिकेटमधील 6,000 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो 11 वा भारतीय फलंदाज ठरला आहे. पुजाराने आपल्या 134 व्या कसोटी डावात ही कामगिरी केली. सुनील गावसकर, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांचाही या यादीत समावेश आहे.
 
पुजाराची कसोटी कारकीर्द
 
पुजाराने 2010 मध्ये भारताकडून कसोटी पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 95 कसोटी सामन्यांमध्ये 43.9 च्या सरासरीने 6,713 धावा केल्या आहेत. दरम्यान, त्याने 18 शतके आणि 32 अर्धशतकेही आपल्या नावावर केली आहेत. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये तीन द्विशतकेही आहेत.