नवापूर : वाचनाची माध्यमं वाढली पण वाचकांची संख्या वाढली नाही. व्हाटस्ऍप बघण्यापेक्षा ग्रांथिक वाचन फार महत्त्वाचे असते. देशाचा इतिहास आणि भूगोल जर बदलायचा असेल तर आपण वाचन केले पाहिजे, असे मत शिरपूर येथील एस.पी.डी.एम. महाविद्यालयाचे उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख प्रोफेसर डॉ.फुला बागुल यांनी पिंपळनेरच्या महाविद्यालयात व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.टी. सोनवणे, उद्घाटक प्रा. डॉ. सचीन नांद्रे (दहिवेल) व प्रमुख अतिथी म्हणून सी.गों.पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र अहिरे हे उपस्थित होते.
कर्म. आ.मा.पाटील कला, वाणिज्य व कै. अण्णासाहेब एन.के.पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय पिंपळनेर येथे मराठी भाषा विभागाच्या व विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’दिन साजरा करण्यात आला. उद्घाटनपर मार्गदर्शन करताना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे नवनियुक्त संचालक प्रा.डॉ.सचिन नांद्रे यांनी मराठी भाषेचा इतिहास प्राचीन आहे. तिच्या मध्ये प्रचंड गोडवा आहे. मराठी भाषेचा इतिहास वैभवशाली आणि संपन्न असा आहे. तो प्रत्येकानं जतन केला पाहिजे, असे प्रतिपादन केले. त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ.आर.आर.अहिरे यांनी वाचनसंस्कृती बरोबरच श्रवणशक्ती वाढविणे गरजेचे आहे. बोलणारा वक्ता अनेक पुस्तकं वाचून ज्ञान देण्याचे काम करत असतो. ते आपण चांगले ग्रहण केले तर आपल्याला ज्ञान मिळत असते. अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.टी.सोनवणे म्हणाले की, ग्रंथांमध्ये खूप ताकत असते. वाचनाने विद्यार्थी व प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व घडत असते म्हणजेच व्यक्तिमत्व विकास होत असतो. भाषेमुळे परिवर्तन होत असते. यावेळी कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल प्रा डॉ. सचीन नांद्रे यांचे महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
सूत्रसंचलन व प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.सतीश मस्के यांनी केले. उद्घाटक प्रा.डॉ. सचिन नांद्रे यांचा परिचय विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.एस.पी. खोडके यांनी केला. प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ.आर.आर.अहिरे यांचा परिचय मराठी विभागाचे प्रा.एल.जे.गवळी यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार प्रा.एल.जे.गवळी यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.