नागपूर : भंडारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचार संपल्यानंतर नाना पटोले यांनी मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे संपूर्ण देशभर याचे पडसाद उमटेल असून वेगवेगळ्या स्तरावरून प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. नंतर नाना पटोलेंनी यूटर्न घेत मी देशाच्या पंतप्रधानांविषयी बोललॊ नाही तर मोदी नावाच्या गावगुंडाविषयी बोललो असल्याचा दावा केला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उल्लेख केलेला मोदी नावाचा गावगुंड अखेर प्रकटला आहे. त्याचे म्हणणे आहे कि, माझी पत्नी सोडून गेली. म्हणून गावातले लोक मला मोदी म्हणतात. मी दारुचा व्यवसाय करतो. मी गावगुंड आहे, असं या व्यक्तीने म्हटलं आहे. या मोदीचं मूळ नाव उमेश घरडे ऊर्फ मोदी असं आहे. आपण नाना पटोले यांना दारूच्या नशेत शिव्या दिल्या आणि विरोधात प्रचार केला, असंही त्याने सांगितलं.
मोदी म्हणून ओळख, एकही गुन्हा नाही
त्याची चौकशी पोलीस करीत असून पोलिसांनी टोपण नाव असलेल्या मोदीची विचारपूस केली आहे. लाखनी तालुक्यातही उमेश प्रेमचंद घरडे या व्यक्तीला मोदी या नावाने ओळखले जाते. याला दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी व संपूर्ण परिवार नागपूर येथे राहतो. उमेश दोन वर्षांपासून गावातच एकटाच राहतो. दारू पिऊन गावकऱ्यांना शिवीगाळ करतो. मात्र त्याच्या विरुद्ध पोलिसात अजूनही कुठलीही तक्रार दाखल नाही. तो गावगुंड नाही, पालांदूर पोलिसांनी उमेश घरडे यांची चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविला आहे.
नार्को टेस्ट करा
दरम्यान, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेश घरडे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. हे खोटं आहे, आम्ही नाना पटोले यांना सोडणार नाही. न्यायालयात जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्यासाठी नाना पटोले संघटना तयार करत आहेत. हा राजकीय तमाशा काँग्रेसने सुरु केला, तो नाना पटोले यांनी संपवावा, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.