संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना ‘नाम' चा मदतीचा हात

    दिनांक : 17-Jan-2022
Total Views |
धुळे – राज्य शासनात राज्य परिवहन विभागाचे विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागील अडीच महिन्यापासून संपावर आहेत. संपामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन मिळालेले नसल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या ‘नाम फाउंडेशन’च्यावतीने अशा कर्मचाऱ्यांना मदत व्हावी यासाठी धुळ्यातील २५० संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.
 

Naam Foundation 
 
ही मदत नाम फाउंडेशनचे धुळे जिल्हा समन्वयक प्रदीप पानपाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आली. या किटमध्ये कर्मचाऱ्यांना एक महिना पुरेल एवढी साखर, चहा पावडर, तांदूळ, मिरची, हळद, चटणी, साबण, पेस्ट, डाळ इत्यादी वस्तू देण्यात आल्या. प्रदीप पानपाटील यांनी यावेळी भूमिका मांडताना सांगितले की, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिल कामगारांप्रमाणे चिघळला असल्यामुळेच आम्ही मदतीचा हात पुढे करत आहोत. त्याचबरोबर राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने योग्य ती भूमिका जाहीर करुन कामगारांना न्याय देणे गरजेचे आहे. संपामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावत आहे. नैराश्य येत आहे. या प्रश्नाकडे राज्य सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही पानपाटील म्हणाले.