सभापती पदाची बैठकीत नगराध्यक्ष, उनगराध्यक्षा व सत्ताधारी सदस्यांची गैरहजेरी

बांधकाम सभापती पदी हितेंद्र क्षत्रिय तर महिला बालकल्याण सभापती पदी सूनयना उदासी

    दिनांक : 13-Jan-2022
Total Views |
तळोदा : येथील नगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्य व विषय समित्यांच्या सभापती पदाची मुदत १२ जानेवारी २०२२ ला संपत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये १२ रोजी पालिका सभागृहात विशेष सभा झाली. पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार गिरीश वखारे उपस्थित होते.
 
taloda 
 
मुख्याधिकारी सपना बसावा यांच्याकडे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली. सभेत काँग्रेसचे प्रतोद संजय माळी, गटनेते गौरव वाणी, नगरसेवक सुभाष चौधरी, हितेंद्र क्षत्रिय, नगरसेविका अनिता परदेशी, शिवसेनेच्या नगरसेविका प्रतीक्षा ठाकूर, नगरसेविका सुनयना उदासी, कल्पना पाडवी स्वीकृत नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी, भाजपचे गटनेते भास्कर मराठे उपस्थित होते. तर लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, नगरसेविका शोभा भोई, अंबिका शेंडे, बेबीबाई पाडवी, सविता पाडवी, नगरसेवक सुरेश पाडवी, योगेश पाडवी, रामानंद ठाकरे, शेख गैरहजर होते. या सभेत सत्ताधिकारी भाजपचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष व ९ नगरसेवक गैरहजर राहिले. सभेत बांधकाम सभापतीपदी कॉंग्रेसचे नगरसेवक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांचे निकटवर्तीय असलेले हितेंद्र क्षत्रिय तर महिला व बालकल्याण सभापती पदी भाजपच्या सुनयना उदासी यांची निवड जाहीर करण्यात आली. मात्र दोन विषय समिती सभापती पदे रिक्तच राहिली. तसेच सत्ताधारीच गैरहजर राहिल्याने शहराचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांसह सदस्य गैरहजर असल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र सभा रद्द किंवा तहकूब करता येत नसल्याची माहिती पीठासीन अधिकारी तहसीलदार गिरीश वखारे यांनी दिली व सभेचे कामकाज सुरू करण्यात आले. यावेळी गटनेते गौरव वाणी व भास्कर मराठे यांनी समिती सदस्यांसाठी नगरसेवकांची नावे दिली. त्यावेळी बांधकाम सभापती पदासाठी नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व महिला व बालकल्याण सभापती पदासाठी नगरसेविका सूनयना उदासी यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड जाहीर केली तर भाजपने भाजपचे गटनेते यांनी पाणीपुरवठा व आरोग्य सभापती पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले मात्र सभापती पदाचे उमेदवार असलेले भाजपचे नगरसेवक व सूचक अनुमोदक यांच्या सह्या नसल्याने ते अर्ज अवैध ठरविले. त्यामुळे पाणीपुरवठा व आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या समित्यांचे सभापती पद रिक्त राहिली आहे.

आमच्यातील काही सदस्यांना कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने व आमचे गटनेते आमच्या सोबत नसल्याने सदर सभेत गैरहजर राहण्याच्या निर्णय आम्ही घेतला सभा पुन्हा घेण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन करणार आहोत.
अजय परदेसी
नगराध्यक्ष नगरपालिका तळोदा